माकडे आणि आनंद
काल एका माकडाची गोष्ट वाचनात आली, एका अरुंद तोंड असलेल्या घागरीमधून माकड काही पदार्थ काढायला लागते, पण घागरीचे तोंड अरुंद असल्याने त्याचे हात आणि दोन्ही वस्तू एकाच वेळेला बाहेर येणे अशक्य होऊन बसते. अर्थात माकडाला हे लक्षात न आल्याने माकडाने हातातील वस्तू सोडत नाही आणि ते तिथेच अडकून राहते. काही वेळाने डोंबारी येऊन त्याला पकडतो. अर्थात हा डोंबाऱ्याचा सापळा माकडाच्या लक्षात न येण्यापाठीमागे 'फक्त हाताला लागलेले काहीही करून पाहिजेच आणि हाताला लागले ते आपलेच'. अशी अपेक्षा, जी त्याला आहे त्या परिस्थितीत सुरक्षा ही देत नाही, व हाताला लागलेले आपले तेवढे काढून बाहेर पडणे ही जमू देत नाही. आशा परिस्थितीत माणसे माकड बनण्याची प्रक्रिया फार वेगात होत राहते.
एखाद्या घटनेतून आनंद किती घ्यावा व किती सोडावे हे कळणे खूप गरजे आहे, ते न समजल्याने आपले अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. असे हे माकड बनण्यापासून वाचण्यासाठी, एखाद्या गोष्टीचा "महत्तम सामायिक आनंद" आपल्याला कळणे म्हणूनच खूप गरजेचे आहे. आनंदाच्या कल्पना आणि आपल्यासोबत घडणाऱ्या घटना यांच्यात खूप फरक झाल्याने नेहमीच निराशावादी राहणे हे बऱ्याच व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनून जाते. बरं आनंद आयुष्यात आणायचा तरी, तो कुठल्यातरी विशिष्ट अशा धोरणातूनच येईल अशी अपेक्षा निश्चितपणे चुकीचा प्लॅटफॉर्म तयार करते. उदा. "मी तेंव्हा आनंदी होईन जेंव्हा ...!" अशा अटींवर आनंद अवलंबून ठेवल्या जातो आणि मग तो जेंव्हा आलाय असे ठामपणे वाटते, तेंव्हा कोणीच कुठलीही तडजोड करायला तयार नसतो. आता हाताला लागलेले सर्व आपलेच आहे आणि यातील काही सोडणे म्हणजे आपण आपल्या आनंदासाठी सुरवातीला ठेवलेली अट मोडणे असे वाटल्याने त्यावर आपलाच अधिकार आहे असे ठामपणे अहममिका तयार होते आणि यामुळे, एखादा दुसराही याच घटनेतून तेवढाच आनंद घेणार असतो जेवढा तुम्ही, ही गंमत आपण सहजपणे विसरतो, असे केल्याने येणाऱ्या सर्व विसंवादामधून बाहेर पडण्याच्या शक्यता धूसर होत जातात.
घटनेतून येणारा आनंद ओरबाडण्याच्या नादात आपण हे विसरतो की या मडक्याचे तोंड अरुंद आहे याच्या बाहेर येण्यासाठी तेवढेच हातात ठेवावे लागेल ज्याद्वारे या नातेरूपी माडक्याच्या तोंडातून कुठल्याही प्रतिरोधाशिवाय बाहेर पडता येईल, अन्यथा पूर्ण एकटाच बाहेर काढण्याच्या नादात एकतर हात आतमध्ये अडकून पडेल, नाहीतर मडक्याचे तोंड फोडावे लागेल, अन्यथा कुणीतरी डोंबारी येऊन पकडेल आणि मग आयुष्यभर त्याच्या तालावर नाचावे लागेल. काही लोक हे समंजसपणे ओळखून, प्रत्येक घटनेतून आपला असलेला आनंद तेवढा काढून, दुसऱ्याचा आनंदी राहण्याचा अधिकार आणि त्याच्या अस्तित्वाची स्वीकृती मडक्यात ठेऊन बाहेर पडतात व पुढील आनंदासाठी सज्ज होतात.
आनंद हा तुमच्या आयुष्यात या प्रकारे येणार नाही ज्याप्रकारे एखादी बस बसस्टॉपवर येते, तर तुम्ही ठरवले तिथे तो सुरु होईल, त्यासाठी कुठल्याही अटी ठेवू नका आनंदाची वाट बघत बसू नका,कारण वाट बघत असताना भूतकाळातील नकार आणि भविष्यातील अनिश्चितता तुम्हाला अस्वस्थ करेल
"एका कुठल्या गुरु ने आपल्या शिष्याला सांगितले कि तुला तुला आनंद मिळवण्याचे सिक्रेट सांगतो ते म्हणजे
"आनंदी रहा "
कारण आनंदी राहणे ही घटना नाही तर सवय आहे.
सचिन दाभाडे
Management & Corporate trainer
Director – ASK Training Solution
Phone:- 8390130362
Mail:-ask@sachindabhade.com