आपल्याला अस्वस्थ होण्यापाठीमागे आणि दुखावण्यामध्ये आमुक व्यक्तीचा प्रभाव आहे किंवा कुणाचा हात आहे, असे म्हंटल्यावर डोक्यात येणारी पहिली गोष्ट म्हणजे "एक व्यक्ती माझ्यासोबत अशी वागली किंवा मग तमुक एखादी व्यक्ती माझ्यासोबत तशी वागल्यामुळे मी दुखावलो". कुणाच्याही कृतिमुळे आपण दुखावल्या जात नसतो तर समोरच्यांच्या भूमिकेला आणि क्रियेला आपण दिलेला प्रतिसाद व निवडलेली "प्रतिक्रिया" च भावनिक आणि मानसिकरित्या आपल्याला जास्त अडचणीत आणत असते. एलिनार रुझ्झवेल्ट ने म्हंटल्याप्रमाणे "तुमच्या परवानगीशिवाय कुणीही तुम्हाला दुखावू शकत नाही" हे यातील वास्तव आहे.
या प्रतिक्रियावादाच्या बाहेर या..! यात आपण वर्षानुवर्षे अडकून पडलोय, आपल्या प्रतिक्रिया आपण स्वतः निवडा, ती स्थलकालाच्या बंधनात येणार नाही याची काळजी घ्या ...! कुणी एक व्यक्ती, संस्था,घटना ही तुमच्या विचार प्रक्रियेच्या मुळाशी येऊ न देता सकारात्मक विचारधाराच जेवढ्या येतील ते पहा आणि आपल्या इच्छा त्याचा बळी न ठरू देण्यासाठी प्रयत्नशीलशील रहा. प्रतिक्रियेऐवजी क्रियावादी व्हा.
स्वतःचे नियम आखा, ते वैश्विक ऊर्जेच्या आणि प्रेरणेच्या तत्वाशी मिळते जुळते आहे याचा सतत मागोवा घेत रहा. नियमांच्या, मानसिक बंधनाच्या आणि भावनिक अवलंबनाच्या चौकटी तोडा, कुणी बोलले म्हणून बोलू नका, कुणी केले म्हणून करू नका, कुणी रागावले म्हणून रागावू नका, कुणी हसले म्हणून फसू नका, आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही म्हणून रुसू नका, जे काय करायचे ते करा, पण ते फक्त स्वतःच्या क्रियेतून करा प्रतिक्रियेतून नाही. डोक्यातील विचार फार काळ डोक्यात राहत नाही म्हणून त्याला कृतिकार्यक्रमाची जोड द्या, सोबत कुणी आहे ही अपेक्षा ठेऊन कृतिकार्यक्रम परावलंबी बनवू नका. त्याला मूलभूत विचारांची बैठक द्या. उद्या नावाची संकल्पना आळशी लोकांच्या डोक्यातून आलेलं पीक आहे त्याला बाजारात केंव्हाच विकता येणार नाही हे पक्के लक्षात ठेवा.
एवढे सगळे माहित असूनही मनात भीती असतेच, पाय अडखळताच शेवटी, कुणाचेतरी चित्र डोळ्यासमोर येतेच शेवटी, प्रेरणेच्या ओढ्यावर बांध आपण घालतोच शेवटी, भीतीचा प्रभाव वाहण्याच्या स्वभावाला भारी पडतोच शेवटी.
एक कराच ! बाहेर या घराच्या, आकाशाकडे बघा...! ते अनंत आहे, वाऱ्याकडे बघा...! ते संथ आहे, जमिनीकडे बघा...! ती विशाल आहे, वेळेकडे बघा...! ती चल आहे, यातून काही समजते का तेही बघा. हे जर नाही बघता आले तर एक करा, तुमच्या समोर असलेल्या व्यक्तींकडे बघा, ज्या तुमच्या प्रभावापासून मुक्त आहे आणि आता स्वतःकडे बघा, किती भीती, किती गोंधळ, किती संकुचितता, आणि अस्वस्थता आणि अभूतपूर्व असा विरोधाभास तुमच्या अंतरंगात, चाक एकीकडे आणि वासे एकीकडे हे शक्य नाही, म्हणूनच स्वतःला एकाच प्रश्न विचारा...
हे आणखी किती दिवस ?
उत्तर सापडले तर ठीक, नाही तर मी आहेच .......
सचिन दाभाडे
ASK Training Solution
ASK Training Solution
No comments:
Post a Comment