Thursday, November 16, 2017

भीती आणि आपण..!





भीती कशाने जाते हा प्रश्न किती जणांना पडतो ? सकाळी उठल्यावर पायाखाली काहीतरी थंड लागले तर काय विचार येईल, जर तुम्हाला लगेच आठवले की रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही पाण्याची बॉटल ठेवली होती तर ठीक; अन्यथा, काहीतरी भयंकर पायाजवळ आहे असे समजून भंभेरी उडायला क्षणाचाही वेळ पुरेसा. म्हणजे भीतीमधून येणाऱ्या अनुभवापासून तुम्हाला वाचवले ते तुम्हाला कालच्या; मीच पायाजवळ पाण्याची बाटली ठेवली आहे, या झालेल्या ज्ञानाने. आणि समजा हे ज्ञान वेळेवर झाले नसते तर सुरवातीला 'शंका' आणि मग उत्तर नाही मिळाले तर 'भीती'.

आशा जेवढ्या प्रकारच्या भीती आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर वाहून नेल्या जात असतात याचे एकमेव कारण म्हणजे अज्ञान. माझ्या भविष्याचे काय होईल?, माझ्या करिअर चे काय होईल? माझ्या कुटुंबचे काय होईल ? उद्या काय होईल ? या अन अश्या अनेक भीतींचे गारुड तुमच्या क्षमतेवर कायम प्रश्न चिन्ह उपस्थीत करत राहतात. या प्रश्नांची काहीच उत्तरे मुळातच नाहीयेत. याचे कारण, हे प्रश्नच मुळात प्रश्न नाहीये तर भीतीमुळे तयार झालेली वाळवंटातील ओयसिसे आहेत. ज्ञानाचा एक किरण याला भेदून जाऊ शकतो पण भीतीमुळे हे अदृश्य रूप जवळ जाऊन पाहण्याची मनाची तयारी नसते, अन्यथा ते नष्ट करण्यासाठी ज्ञानाची एक लकेर पुरेशी आहे. म्हणजे वास्तवाची जाणीव होणे हे भीती घालवण्याची प्रथम पायरी आणि ही जाणीव सतत प्रगल्भ  करत जाणे म्हणजे ज्ञानाच्या दिशेने केलेला प्रवास. गीते मध्ये सत्य (सत) आणि असत्य (असत) याची साधी व्याख्या आहे. जे वास्तवात आहे ते सत्य आणि जे वास्तवात नाही ते असत्य. म्हणून वास्तव आणि अवास्तव यात फरक करता यायला लागला की आपण भीती निर्माण करणाऱ्या यंत्राणेशी दोन हात करायला लायक झालो, असा त्याचा अर्थ आणि ज्ञान म्हणजे 'वास्तवाची स्पष्ट जाणीव'.

जेंव्हा आपण वास्तववादी व्हा असे म्हणत असतो तेंव्हा आपण ज्ञानी व्हा असेच एक अर्थाने म्हणत असतो. भीतीपासून दूर नेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या विषयात मिळवलेले ज्ञान. काही लोकांना स्टेजची भीती वाटते याच कारण ज्या  विषयावर बोलायचे आहे त्या विषयांमधे असलेले अज्ञान. जर तुम्हाला विषयाची पूर्ण माहिती असेल तर तुम्हाला कुठल्याही स्टेजवर कुणासमोरही जाऊन बोलायची कधीच भीती वाटणार नाही, मग भले ही तुमची भाषा चुकीची असेल, किंवा तुमचा टोन  चुकीचा असेल, किंवा फार इम्प्रेसिव तुमचा आवाजही नसेल.

वास्तववादी व्हा असे म्हणणे म्हणजे मुळात कुणाला चूक ठरवले असे नाही किंवा कुणाला बरोबर ठरवणे असेही नाही तर तुम्हाला जे वाटते ते वास्तवात आणने होय. नवीन शहरात गेल्यानंतर तिथल्या नियमांची, तिथल्या सिग्नल्सची आपल्याला माहिती नसते, म्हणून तिथे आयुष्य रूटीनवर येईपर्यंत सतत एक अस्वस्थता जाणवत असते. एकदा का आपण त्या शहरांसोबत मॅच झालो, म्हणजे आपण सहजासहजी कॉन्फिडंट होत जातो आणि हळूहळू भीती नाहीशी होत जाते. इथे नेमकं हेच होतं, जशी नवीन शहरातल्या वास्तवाची जाणीव झाली की, आपल्यातल्या असणाऱ्या अवास्तव भीतीची मुळं नाहीशी होतात. हेच नवीन मोबाइल घेतल्यावर, नवीन कॉम्प्युटर घेतल्यावर, किंवा मग नवीन कुठे तरी एखादा जॉब जॉईन केल्यावर सुरवातीच्या दिवसांत होते. पण जसं जसं आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींसोबत मॅच होत जातो आणि त्याच्यासाठी कराव्या लागणाऱ्या कृतीची जाणीव होत जाते तशी तशी भीतीही नाहीशी होत जाते. म्हणजे; भीती असेल तर एक लक्षात ठेवावं की त्या घटनेबद्दल किंवा गोष्टींबद्दल तुमच्या ज्ञानात वाढ करण्याची गरज आहे आणि ज्ञानी होण्यासाठी विचारांना कृतीत उतरवण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही आता करत असलेल्या कुठल्याही कृतीमध्ये तुम्हाला भीती किंवा अस्वस्थता वाटत असेल तर थांबू नका , चालत रहा, कारण तुमची कृती आणि तिचे सातत्य हीच तुमच्यातल्या भीतीला सुरुंग लावेल व तुमच्यात आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तीचा उदय होईल..!

.....…...................

सचिन दाभाडे



No comments:

Post a Comment