आपल्याला माहिती असलेले दुसर्यांना सांगण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे माहिती देत असतांना "ही माहिती माझ्याकडे आहे बघा जर तुम्हाला तिचा उपयोग झाला तर" ही एक पध्दत आणि दुसरी म्हणजे "तुम्हाला ही गोष्ट माहित कशी नाही; आश्चर्य आहे, तुम्ही या मार्गाने जायला हवे ". पहिल्या पद्धतीत समोरच्या व्यक्तीच्या क्षमतेला आव्हान न करता आपल्याकडे जे काही आहे ते विवेकवादी पद्धतीने समोर ठेवलेले असते, त्यात समोरच्याच्या वाक्याशी आपण केलेल्या वाक्याची बरोबरी नसते आणि ते स्वीकारले गेलेच पाहिजे असा अट्टाहास नसतो. कारण समोरच्याच्या मेंदूने घटना आणि माहिती वेगळ्या प्रकारे आत्मसात केलेली असणार आणि तिचे प्रक्षेपण ही वेगळ्या प्रकारे होत असणार किंवा होऊ शकते हे अभिप्रेत असते. यातून होणारे मुद्द्याचे आदानप्रदान (content transaction) हे चर्चा च्या माध्यमातून सुरु होऊन संवादाच्या दिशेने प्रवास करत राहते आणि याद्वारेच व्यक्ती शिकण्याची प्रक्रियेत येतात ते शिकतात(learning), समोरच्याला काय म्हणायचे आहे हे समजूनही (understanding) घ्येतात. दुसऱ्या व्यक्त होण्याच्या पद्धतीत कळत नकळत, अप्रत्यक्षरित्या, किंवा कधी कधी जाणूनबुजून समोरच्याच्या माहिती संकलित करण्याच्या किवा घटना समजून घ्येण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे करण्यात येते, अश्या वेळी माहितीचे आदानप्रदान चर्चेत रुपांतरीत होत नाही त्यामुळे अर्थात ते संवादापासूनही कोसो दूर असते.
आता अश्या प्रक्रियेतून शिकण्याची गरज कुठल्याच स्थरावर निर्माण होणार नाही हे वेगळ सांगायची गरज नाही. आपण आपले मत मांडत असतांना (ज्याला आपण बऱ्याच वेळा चर्चा असे स्वतःच संबोधतो) आपल्या बोलण्याच्या पद्धतीत वरील दोनपैकी कुठले भाव असतात याचे परीक्षण करून बघा; पहिला की दुसरा ? आपण बोलत असलेल्या मुद्यातून समोरच्याने समजून घ्यावे की शिकून घ्यावे की मग फक्तच ऐकून घ्यावे हा आपला उद्देशच आपली पद्धत कुठली असली पाहिजे याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करेल, जे शिक्षक मुलांना शिकवतात, जे प्राध्यापक मुलांशी ज्ञानाचा व्यवहार करतात, जे विद्वान चर्चेत आपले म्हणणे मांडत असतात या सर्वांचा हेतू जर बघितला तर साधारणपणे पहिल्या पद्धतीने आपले म्हणणे मांडणे अपेक्षित आहे, परंतु बऱ्याच वेळेला आपला विचार मांडताना किंवा एखाद्याला मार्गदर्शन करतांना जेव्हा व्यक्ती दुसरया पद्धतीने आपले म्हणणे मांडत असेल तेव्हा अस्वस्थता, तुलना,वाद, द्वेष, यांची बीजे पेरली जाणे अपरिहार्य, याउप्परही काही आक्रमक होऊन ज्ञान प्रसार करतांना दिसतात.एकाच वेळी मी लोकांना ज्ञान व माहिती पुरवतोय आणि दुसरीकडे आक्रमक होतोय हेच मुळात परस्पर विरोधी आहे. त्यामुळे लोकांना काही देण्याआगोदर आपला हेतू तपासा कारण तो काहीही असला तरी पद्धत चुकली कि तुम्ही नाकारले जाणार,आणि नाकारले च जाणार असाल तर पद्धत बदलायला काय हरकत आहे, लओत्से म्हणतो "दुसर्यांना ओळखणे हि विद्वत्ता आहे पण स्वताला ओळखणे हे ज्ञान". अर्थात मलाही हे जे वाटले ते ही पटलेच पाहिजे असे नाही, फक्त मला असे वाटते, एवढेच …!
सचिन दाभाडे …
No comments:
Post a Comment