Tuesday, July 2, 2019

कोल्हापूर आणि शब्दपंढरीची वारी



27, 28 जुनला कोल्हापुरात होतो साधारणत ट्रेनिंग म्हंटल्यावर ज्या ठिकाणी जातो त्याठिकाणचे फारसे काही बघण्याचा योग शक्यतो कामीच येतो कारण बराचसा वेळ आणि मानसिकता ट्रेनिंगच्या नियोजनात घालवावी लागत असते. पण यावेळी मी दोन दिवस कोल्हापुरात होतो आणि फुलडे workshop करण्याआधीही माझ्याकडे बराच वेळ होता, किंबहुना तसे मनात नियोजनच करून गेले होतो. कोल्हापूर हे शहर माझ्यासाठी बऱ्याच भावनांना उजाळा देणारे शहर. महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व स्पर्धेसाठी आम्ही सर्व वक्त्यांची आणि कवींची टोळी पावसाळ्याच्या ऐन सुरवातीच्या दिवसातच कोल्हापूरच्या दिशेने रवाना व्हायची. औरंगाबादच्या दोन तीन महाविद्यालयातील जिवलग वक्ते आणि कवी मित्र आम्ही सर्व सोबतच प्रवास करायचो. निमित्त असायचे स्पर्धेचे, पण स्पर्धा कमी आणि वक्त्याच्या वारीत सामील होण्याचा आनंदच जास्त असायचा. असे हे सर्व स्पर्धक स्पर्धेच्या ठिकाणी वैष्णवांचा मेळा भरवत. कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील घाळी महाविद्यालयात दरवर्षी ही स्पर्धा भरत. औरंगाबादमधून महाविद्यालयातील स्पर्धेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी जात मी एस बी  कॉलेजकडून प्रतिनिधित्व करायचो. एकाच ठिकाणी स्पर्धेला जायचे असल्यामुळे सगळे सोबतच निघायचो.

रात्री दहाच्या सुमारास बसमध्ये बसलो की रात्रभर याच्या खांद्यावर किंवा त्याच्या मांडीवर अवघडत, वाकड होत प्रवास असायचा. या प्रवासात गाडी जिथे जिथे थांबत तिथे तिथे गाढ झोपेतून कसेही उठून चहा प्यायची धडपड असायची, या चहात रात्रीच्या थंडीचा आणि सोबत झालेल्या चर्चेचा गोडवा असायचा. एका एका घोटासोबत जगातले सगळे विषय चर्चून घ्यायचे, मग थोड हलक वाटायचं आणि मग पुन्हा बस मध्ये बसायची गडबड. लाल डब्याच्या हा प्रवास तसा फारसा सुखकारक नव्हताच रात्रभर त्या आवघडलेल्या सीटवरचा प्रवास पाठीत आणि मानेत कळ आणणारा. एका सिटवर 4 जण बसलेले असायचे, कधीकधी दुसरीकडे बसायला जागा असली तरी तिच्यावर कोणी बसत नव्हते कारण रात्रभर चालणाऱ्या मुख्य चर्चेच्या प्रवाहात भाग घेता येणार नाही..!आणि पूर्ण प्रवासभर आपणच वेगळे पडू म्हणून कसेतरी दाटीवाटी करून एका सीटच्या आसपास सगळे चीपकून बसत. पहाटे तीनच्या चारच्या सुमारास भयंकर चर्चा, वाद, नव्या जुन्या कविता अस सगळा निचरा झाल्यावर डोळ्यावर झोपेची चाहूल हळूच यायला सुरवात व्हायची. पण शरीर हलवायला ही जागा नसल्याने फक्त मान आणि पाय याच्या त्याच्या अंगावर टाकून कसेबसे डोळे लागायचे. पहटेच्या गार झोपेत खिडकीतून आलेली थंडगार हवा कानात आणि नाकात शिरायला लागली की हलकेच डोळे मिणमिणते करून खिडकीतून बाहेर बघायचं. खिडकीवरील जमा झालेले धुक बोटाने थोड पुसून काय दिसतंय हे पाहण्याचा प्रयत्न व्हायचा. बाहेर हिरवीगार ऊसाची शेते धुक्यात अर्धी बुडालेली दिसायची आणि अर्धवट झोपेतच गालात स्मित यायचं. तशाही परिस्थतीत आपल्या खांद्यावर ज्याच डोकं असेल त्याच्या कानात हळूच कोल्हापूर आल वाटतं, अस सहज पुटपुटत दिसेल ते दृश्य डोळ्यात मान ताणून बघत राहायचं. इथून पुढे हळू हळू सर्वांचे डोळे उघडायला लागायचे. पुढचा दोन तासाचा प्रवास एका आनंदाने भरलेल्या जगात प्रवेशतोय अशा आविर्भावात सगळे असायचे.

यापुढील दोन ते तीन दिवस वेगळ्याच जगात असल्यासारखे आम्ही सगळेच. गाडी कोल्हापुरात आली की बस स्टँडवर चहा, नाष्टा व बाजूला कुठेतरी आवराआवर आणि मग पुन्हा गडहिंग्लजकडे जाणाऱ्या गाडीचा शोध. एव्हाना सर्व जण जागतिक गप्पा वरून कोल्हापूरच्या गप्पा वर शिफ्ट झालेले, मध्ये मध्ये साहित्य, समाज, राजकारण थोड फार गरजेनुसार. कोल्हापूर ते गडहिंग्लज हा प्रवासही बेफाम आनंद देणारा. घाळी कॉलेजचे सर्व आयोजक व प्राध्यापक मंडळी हे स्पर्धा घेण्यापेक्षा आम्हा सर्व शब्द पंढरीच्या वारकऱ्यांच्या प्रेमात न्हाऊन निघण्यासाठीच हे सर्व आयोजन करायची असे मला पक्के वाटायचे. इथे कुणीही जिंकणे किंवा हरणे हे महत्त्वाचे होते असे मला वैयक्तिक कधी वाटलेच नाही, फक्त तू गडहिंग्लजला गेला होता का यावर्षी ?, या प्रश्नाचे उत्तर "हो"  असेच रहावे म्हणून आम्हा सगळ्यांचा आटापिटा चाललेल्या असायचा. या स्पर्धेला हजर राहणेही एक प्रकारची अचिवमेंट वाटायची .

आनंदाचं विस्फोट घडवणाऱ्या अनेक घटना या भागात महाविद्यालयीन जीवनात असताना मनावर कोरल्या गेल्याय. काल जेंव्हा workshop च्या निमित्ताने कोल्हापूर मधील ही ठिकाणं बघत होतो तेंव्हा 17 ते 18 वर्षापूर्वी मित्रांच्या घोळक्यात असताना बघितलेल्या सर्व जागा आणि त्यातून आलेला सुगंध आजही तसाच्या तसा मनाच्या खोल गभाऱ्यातून दरवळत बाहेर आला, काल जेंव्हा ती ठिकाणं बघत होतो तेंव्हा पुन्हा पुन्हा ते मित्रांसोबत अनुभवलेले जूने कोल्हापूर मनात भव्य दिव्य होत होते, "मित्रांचे कोल्हापूर", हो हे शहरच मुळात मित्रांच्या सहवासात पाहिलेले, त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या आनंदात त्याचाच प्रभाव जास्त. हा आनंद त्यांच्या प्रभावातून मुक्त होणे या जन्मात तरी शक्य नाही. यावेळच्या भेटीत कोल्हापूरच्या पत्रकारितेत एक आदरणीय नाव आणि जूने स्नेही ताज मुलाणी माझ्या हॉटेल वर रात्री ९ ला कामाच्या व्यस्ततेतूनही वेळ कडून येऊन भेटले, गप्पांचा चांगला फड रंगला, कोल्हापूरची माझी मनातील दुसरी ओळख म्हणजे हेच ताज भाई..!.
शब्दात या आठवणींना मांडता येणे अशक्यच, एका एका घटनेत आणि क्षणात शब्दातीत आनंद देणारे हे शहर मित्रांशीवाय बघणे म्हणजे वारी शिवाय पांडुरंग बघणे.

सचिन दाभाडे
8390130362