Tuesday, January 10, 2017

सिग्नल...!

सिग्नल...!




सिग्नलवर गाड़ी थांबली की एकापाठोपाठ समोरच्या गाड्या सूटु लागतात. आपली नजर आपल्या दिशेने तोंड करून असलेल्या रेड लाइट कड़े असते. गर्दीमधुन वाट काढत छोट्या बाइक्स कसरत करत झेब्रा क्रासिंग वर येऊन उभ्या राहतात. मागे वळून पाहतांना त्यांना स्वतःचाच स्वतःवर विश्चास बसत नसेल की, ते आपणच का ? ज्याने एवढ्या कमी जागेतुन मार्ग काढत सर्वात पुढे येऊन उभे राहण्यात यश मिळवले. या यशामधे त्याच्या रोजच्या अनुभवाची फार मोठी कामगिरी असते. हा फ़क्त एका दिवसाच्या कृतिचा विजय नसतो, यात शंकाच् नसावी. ही चिंचोळी वाट भेदण्यात शेवटी आजही यश मिळवलेच, असा अभिमान आणि समाधान चेहऱ्यावर घेऊन गाड़ी बंद करुन सिग्नल चे निरिक्षण सुरु केल्या जाते.

प्रेम आणि युद्धात सर्व काही जायज असते, या न्यायाने काही बाइकर्स डाव्या हाताला जाणाऱ्या गाड्यांच्या मार्गातून आपली गाड़ी काढत झेब्रा क्रासिंग वर येऊन उभे राहण्यात यश मिळवतात. रिक्शा आणि मिनी टेम्पो हे स्वतःची जागा स्वतः निर्माण करणारे जणू काही स्वयंभू वाटतात. ते डाविकडे जाणाऱ्या गाड्याच्या मार्गात आपला तळ ठोकून बसतात आणि सिग्नल सुटायची वाट पाहतात. त्यांची सिग्नलवर; तो सर्वात पाहिले तोडण्यासाठी सुरु असलेली स्पर्धा जिंकण्याची जिद्द पाहून डाविकडे थांबलेल्या रिक्शा ही, अतर्क्य भरलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहत असतात आणि  भीतिचा जराही लवलेश नसलेली व्रत्ती पाहून, डाविकडे जाणाराही शांततेने त्याच्या पाठीमागे उभा राहून संयमाचे सङ्गादित करणारे प्रदर्शन भरवत असतो. डाविकडे जाणाऱ्या गाड्याही मुकाटपने ज्या पद्धतीने त्यांच्या मागे गाड्या बंद करून उभे राहतात, तेंव्हा मला त्या शांततेच्या नोबेलसाठी पात्र वाटायला लागतात.

शेवटचे 15 सेकंद राहिले की गाड़ी फुर्फुरायला लागते, गियर पडतात, 10 सेकंद असताना झेब्रा क्रॉसिंग ओलांडली जाते, 5 वा सेकंद आणि आम्ही रस्त्याच्या मधोमध असतो. जेंव्हा लोक म्हणतात, आम्हाला क्षणा क्षणाचा हिशोब नाही, त्यांना मला सांगावेसे वाटते की किती खोटे आणि वरवरचे आरोप वाटतात ते, या इथे आणि पहा एका एका सेकंदासाठीचा संघर्ष...!

आणि ज्या क्षणाची प्राणात प्राण आणून आम्ही वाट पाहत असतो तो म्हणजे यलो लाइट लागण्याची, तो क्षण प्रत्यक्षात अवतरतो. जसे काही सारा असमंत थबकुन जातो आपले शौर्य, वेग, आणि सर्वात पुढे राहण्याची क्षमता बघण्यासाठी. स्वर्गातील सर्व देव जणू डोळ्यात पाणी आणून आपला हा विजय पाहण्यासाठी आतुर झालेले असतात. हातामधे फुलांच्या पाकळयाचा वर्षाव सर्वात पुढे राहण्याऱ्या वर होणार असतो. सारे काही अदभुतच...!

पोळा फुटलेला असतो....

रास्ता मोकळा श्वास घेतो..

विजेते निघुन गेलेले असतात आणि

एका अनुभवी साधुसारखा, ग्रीन लाइट लागतो जो अजूनही डोळ्यात तेज घेऊन त्याच्या आदेशाची वाट पाहत उभे असतात, त्यांच्यासाठी...!


सचिन दाभाडे
Management & corporate trainer
Director ASK training Solution.
Website- www.sachindabhade.com
Mail - ask@sachindabhade. com
Sachin.14d@gmail.com
8390130362

Saturday, January 7, 2017

आँधीया भी चलती रहे और दिये भी जलते रहे..!




आँधीया भी चलती रहे और दिये भी जलते रहे.


रविवारच्या एक दिवस अगोदर म्हणजे तसा आकर्षक दिवस, काहींना या दिवसाचे प्रचंड आकर्षण तर काहींना या दिवसाचा तिरस्कार. काहींना रुटीन तेच तेच, कामातून मोकळे होण्याचा मार्ग, तर काहींना आपल्या कामात खंड पडण्याची भीती. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. या सर्व प्रवृत्ती निसर्ग नियमांशी आपले नाते जेंव्हा साधर्म्य साधण्यासाठी प्रयत्न करतात तेंव्हा येणाऱ्या पिढ्यांसाठी मुख्य मार्ग बनतात. परंतु आपल्या पूर्वजांना जेंव्हा निसर्ग नियमांचे अन्वयार्थ लावता येत नाहीत तेंव्हा आपण समकालीन असूनही समकालीन होण्याचे सर्व फायदे घेण्यासाठी मुकतो.

जगातील कुठल्याही संस्कृतिने निसर्ग नियमांचे अचूक अंदाज बांधण्यात जेवढे यश मिळवले, तेवधी ती संस्कृती आणि समाज विकासाच्या पायऱ्या चढून गेला. आज भारतीय तरुण हा अर्थ आणि अंदाज लावण्यासाठी सज्जही आहे आणि तो मोठ्या प्रमाणात तसा अर्थ लावतो ही आहे. जर येणाऱ्या काळात आपल्याला आपल्या जागेतून, परिस्थिती आणि स्थितीतून जास्तीत जास्त काही पदरात पाडून घ्यायचे असेल तर एकमेकांसोबत संवादाची प्रक्रिया आणि घटनांचे अन्वयार्थ काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि शास्त्रशुद्ध बनवावी लागेल. देशाच्या विकासाबरोबरच आपल्याला आपल्या मेंदूचा विकासावरही तेवढाच जोर द्यावा लागणार आहे. एका वर्गात शिक्षक आपला पाठ मुलानां शिकवत असतात. शिकवणे झाल्यावर ते मुलांना सांगतात आज घरी गेल्यावर सर्व आपापल्या पालकांना त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनेविषयी विचारा आणि त्या घटनेचे तात्पर्य काय हेही विचारा. आणि उद्या तुम्हाला ते मला आणि सगळ्या शाळेला सांगायचे आहे.मुले घरी जातात आणि दुसऱ्या दिवशी आपली एकएक कथा घेऊन येतात. शाळेत आल्यावर प्रत्येक विद्यार्थी कुतुहलाने एकदुसर्याकडे पाहत असतात, कोणी कोणी, काय काय आणले असेल याबद्दल उत्सुकता शिगेला पोहचते. प्रत्येकजण आपापली गोष्ट सांगण्यास सिद्ध होतात. शिक्षक वर्गात येतात आणि प्रत्येक मुलाला विचारु लागतात. 'अभिजित तू सांग तुझ्या पालकांनी काय अनुभव सांगीतला', 'सर, माझे वडील शेतकरी आहेत, एकदा मी त्यांच्यासोबत बाजारामध्ये अंडी विकायला जात होतो. अचानक रस्त्यामधे एक मोठा खड्डा येतो आणि एका खोक्यामधे ठेवलेले सर्व अंडे उधळली जातात आणि सर्व अंडी फुटून जातात'. शिक्षकाने विचारले यातून तुला तुझ्या पालकांनी काय तात्पर्य घ्यायला सांगितले, 'सर, माझे वडील मला म्हणाले, क़ी यापुढे लक्षात ठेव की प्रवास करत असतांना सर्व अंडी ही एकाच खेक्यामधे ठेवायचे नाही'.

शिक्षकांनी दुसऱ्या मुलाकडे मोर्चा वळविला. दूसरा मुलगा म्हणाला, सर, माझे वडीलही शेतकरी आहे. आम्हाला अंड्या मधून कोंबड्या हव्या होत्या म्हणून आम्ही २० अंडी आणली आणि ते कोंबडीला उबवायला लावली. आम्ही असे गृहीत धरले होते कि आम्हाला वीस कोंबड्याची पिल्ले मिळतील, जेंव्हा प्रत्यक्षात कोंबड्याची पिल्ले बाहेर आली तर ती दहाच आली. यातून माझ्या वडिलांनी तात्पर्य सांगितले कि कोंबडी अंड्यातून बाहेर येण्याअगोदर तिला मोजू नये.

आता शिक्षक तिसऱ्या मुलाकडे वळाले. तिसरा मुलगा म्हणाला, 'सर, माझ्या वडिलांनी मला माझ्या एका दूरच्या मावशीची कथा सांगितली, ती सैन्यात होती, एकदा शत्रूच्या प्रदेशात असतांना तिचे हेलिकॅप्टर एकदम शत्रूच्या गराड्यात येऊन सापडले तिने तेंव्हा इमर्जन्सी लँडिंग करायचे ठरवले. तिच्याकडे हेलिकॅप्टर मध्ये तेंव्हा ३ गोष्टी दिसल्या एक होती मोठी रायफल, दुसरी होती छोटीशी तलवार आणि तिसरी होती एक व्हिस्कीची बॉटल. हेलिकॅप्टर क्रॅश होत असतांना तिने व्हिस्की पिऊन घेतली. खाली आल्यावर ती शंभराच्या आसपास शत्रूच्या वेढ्यात वेढली गेली, तिने आपल्याकडील रायफलने शत्रूंशी झुंज देत ६० लोकांना कंठस्नान घातले, नंतर तिने आपल्याकडील तलवार काढली आणि तिने तलवारीने २० लोकांना संपवले. आता तलवार निकामी झाल्यावर ती हाताने लढू लागली. राहिलेले दहा जण तिने आपल्या हाताने संपवले' .मुलाने स्टोरी संपवली आणि तो सरांकडे शांततेने बघू लागला. संपूर्ण वर्ग कथा ऐकून स्तब्ध झाला होता. काही चेहरे भेदरलेले तर काही गोंधळलेले. शिक्षक हलक्या आवाजात मुलाला म्हणाले 'तुला तुझ्या पालकांनी या कथेचे तात्पर्य नाही का सांगितले '. मुलगा म्हणाला हो सांगितले. तो म्हणाला 'सर, माझ्या वडिलांनी मला सक्त ताकीद दिलीय, कि जेंव्हा तुझी मावशी व्हिस्की पिऊन येईल, तेंव्हा तिच्या समोर जाऊ नकोस'

तन मन एकत्र करून परिस्थितीचा आवाका लक्षात घेऊन स्वतःला सिद्ध करण्यासाठी मागील एक पिढी लढली. त्यांच्या परीने त्यांनी अर्थ लावले आणि घटना घडत गेल्या. येणाऱ्या काळात आपलेही तेच भविष्य असणार आहे जो अन्वयार्थ आपण आपल्या आजूबाजूच्या घटनांचा लावणार आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवाण्यास हरकत नाही, चहात माशी पडल्यास चहा फेकून दिल्या जातो आणि तुपामध्ये माशी पडल्यास माशी फेकून दिली जाते.

सचिन दाभाडे
Management & corporate trainer
Director ASK training Solution.
Website- www.sachindabhade.com
Mail - ask@sachindabhade.com
Sachin.14d@gmail.com
8390130362














Friday, January 6, 2017

डर ' ना ' मना हे...!



डर ' ना ' मना हे...!

यशाच्या उंच शिखरावर गेल्यावर हा आपल्यामधूनच मोठा झालेला आहे असे सांगण्यासाठी किती लोकांची इच्छा होत असेल. अर्थात यात  नवीन असे काही नाही, पण; त्याऐवजी, खरंच एक सर्जनशील आणि क्षमता असलेला माणूस आपल्यामध्ये होता असे म्हणायला लावणारे काम आणि ऊर्जा तुमच्याकडे असण्यासाठी किती जण धडपडतात हा खरा प्रश्न आहे. लहानपणापासून अनेक गोष्टीची छायाचित्रे आपल्या मनावर बिंबलेली असतात त्यात काही वातावरणानुसार आपण  ते मनावर बिंबवून घेतो, तर काही आपले वातावरण आपल्यावर नकळत बिंबवते. मोठे होत असतांना या सर्व कल्पना ज्या कळत नकळत आपल्या विचारांचा भाग झालेल्या असतात त्या ही आपल्यासोबत मोठ्या होत असतात आणि आपले अस्तित्व आपल्या व्यक्तिमत्वात कायम करत असतात.

सुशिक्षित होऊन शाळा कॉलेजातून आपण बाहेर पडतो आणि नोकरीच्या ठिकाणी आपला जम बसवतोही, पण आपला खरा कस लागणे आणखी बाकी असते, बऱ्याच मुख्य परीक्षा आणखीही बाकी असतात. या परीक्षा ३ तासाच्या वेळेत पेपरवर, मिळालेले ज्ञान लिहण्याच्या नसून, त्या स्वतःच्या अपेक्षांचे नियोजन करता करता लोकांच्या अपेक्षेचे नियोजन करण्याच्या असतात.

अशी बरीच कामे आहेत की जी करण्यासाठी शाळा महाविद्यालयातून आपण "स्किल्ड" होऊन बाहेर पाडतो. महाविद्यालयीन शिक्षण हे एक प्रकारचे सिम्युलेशनच (simulation) आहे, या ठिकाणी वास्तव परिस्थितीचा आभास तयार करून त्याद्वारे कुठल्या स्किल्स त्यासाठी उपयुक्त असतील, याचे नियोजन केले जाते. मॅनेजमेंट च्या शिक्षणातही थोड्या फार फरकाने हाच पाढा गिरवला जातो, अर्थात हे शिक्षण थोडे पुढारलेले असल्याने यातील सिम्युलेशन थोडे वास्तवाच्या जवळ जाणारे जरी असेल, तरीही ते एकप्रकारचे सिम्युलेशनच...! मुख़्य अनुभावापासून दुरच ! हे अनुभव म्हणजे गैरसमजुतीचे, विसंवादाचे, असहनशीलतेचे.  

शैक्षणिक तंत्राच्या आधारावर विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि नोकऱ्यांसाठी आणि कामासाठी सिद्ध होतात. कामाच्या ठिकाणी असलेल्या 'Real time situation' या प्रकारचा एवढा बोलबाला आता झालेला असतानाही ते हाताळण्यासाठीची कुठलीही तयारी आपल्याकडून शिक्षण घेत असतांना होते का हा प्रश्न प्रत्येक शिक्षण  घेत असलेल्या विद्यार्थ्याने स्वतःला विचारायला हवा. वर्कप्लेस माँनजमेंट मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणून "अँगर माँनजमेंट" (Anger Management) पुढे येत आहे. किती हि उच्च शिक्षण घेतलेले असले तरी याबद्दलचे शिक्षण आपल्याकडेही युनिव्हर्सिटी मधून मिळत नाही. बऱ्याच वेळेला अश्या real time situations सांभाळता न आल्याने व्यवहारिक आयुष्यात ब्लॉकेज राहून जाण्याची खूप शक्यता असते. मागे काही दिवसापूर्वी मी कुठेतरी वाचले की तुमच्या रागाच्या पाठीमागे तुमची भीती ही मुख्यत्वे करून काम करत असते. अनुभवानंतर मला ते सिद्धही झाले.

भीती, अस्वस्थता हि रागाला जन्म देते. म्हणजे रागावर नियंत्रण मिळवायचे असल्यास भीतीवर आधी नियंत्रण मिळवावे लागेल.  काम करत असतांना, नातेसंबंध प्रस्थापित करत असताना, स्वतःची प्रतिमा समाजात घडवत असतांना, वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जरी ठेवला, तरी बऱ्याच वेळेला आपल्या जडणघडणीतून येणाऱ्या संकल्पना, या आपली स्वतःची एखाद्या घटनेबद्दलची प्रतिक्रिया तयार करत असते. उदाहरण म्हणून घ्यायचे झाले तर बऱ्याच दिवसापासून ज्यांच्या नेतृत्वात आपल्याला मान मिळाला किंवा चांगले काम मिळाले ते जर मिळणे मध्येच खंडित झाले, तर अपरिपक्व मनामध्ये येणारी पहिली भावना म्हणजे अस्वस्थता, मग त्यातून भीतीही जन्म घेते. बघायला गेले तर ती आपल्या सर्वांची फारच सामान्य प्रतिक्रिया असेलही पण यामागे लहानपणापासुन ज्यापद्धतीने आपले "माईंड कल्टिव्हेट" झालेले असते त्याचा फार मोठा भाग असतो. शिक्षणाची पद्धतही यामध्ये मोलाचा वाट उचलते.

आता वरील घटने ला योग्य प्रतिक्रिया काय असावी याचा विचार करून बघू...!

- इतक्या दीवस मला माझ्या बॉसकडून किंवा नेतृत्वाकडून मान आणि जागा मिळाली याचे खरे कारण काय ?
.
- मला प्राप्त होणाऱ्या सर्व गोष्टीना माझ्या सहकार्याची अधिमान्यता होती अथवा नाही..!
.
- मध्यंतरी माझ्यामध्ये किती गुणांचा विकास झाला ?
.
- आता असे काय घडले जेणेकरून तुमच्याप्रती बघण्याचा दृष्टिकोन बदलला?

असे  महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर मिळवणे व त्यानुसार पुढील प्लॅन ठरवणे, हा या अश्या समस्येतून बाहेर पडण्याचा खरा आणि योग्य मार्ग. पण ऑफिसमध्ये असो किंवा वयक्तिक आयुष्यात असो हा मार्ग तोच निवडू शकतो, जो काम करण्यासंबंधीचे आयुध विकसित करून यासंबंधीची योजना करतो. हा मार्ग निवडला गेला नाही तर दुसरा मार्ग शिल्लक उरतो तो म्हणजे... अस्वस्थता आणि मग नंतर येणारी भीती. या दोन्ही  गोष्टी फक्त आणि फक्त आणखी अस्वस्थता आणि आणखी भीतीच निर्माण करता, तर यातून मार्ग नाही...!

भीती ही तुम्हाला खाली पाहायला लावते, तर प्रत्येक गोष्टीतला स्वानुभवातून पाहण्याच्या सकारात्मक क्षमता, येणारा पुढचा क्षण, त्याला सामोरे जाण्यासाठी सिद्धता करायला लावतो. प्रत्येक टप्यावर, महत्वाच्या ठिकाणी, स्वतःच्या क्षमता जोखून पहा, विदयार्थ्यांनी शेवटच्या अशा कुठल्या परीक्षेचीच फक्त वाट पाहू नका, तर शिकत असतांना, डोळे आणि मन उघडे ठेऊन, प्रत्येक घटनेत स्वतःला अजमावून पहा. स्वतःवर प्रयोग करण्यास घाबरू नका. स्वतःची रँकिंग स्वतः करायला शिका. म्हणजे स्वतःबद्दलचा फाजील आत्मविश्वास ही राहणार नाही आणि आत्मविश्वासाची कमीही राहणार नाही. याचा फायदा कठीण समयी तुम्हाला होईल आणि ज्या वेळेला लोक घाबरलेले आणि अस्वस्थ असतील तेंव्हा तुम्ही स्वतःमधील संधी शोधण्यात गुंग असाल आणि लोक झोपलेल्या अवस्थेत तुमचा सूयोदय होईल .... !



सचिन दाभाडे