Thursday, February 9, 2017

मार्काची परीक्षा..!





१०, १२ वी च्या विद्यार्थ्यांनी परीक्षेतील मार्क आणि तिथल्या प्रमाणपत्राचा विचार नक्की करा, पण फार ओझे मनावर घेण्याची गरज नाही. व्यक्तीच्या विकासासाठी आणि खरया अर्थाने सक्षम बनण्यासाठी त्याला शारीरिक (फिजिकल), मानसिक (मेंटल), भावनिक (इमोशनल) आणि आध्यात्मिक (स्पिरिच्युअल) अश्या चार  प्रकारच्या ज्ञानाची गरज असते आणि शालेय जीवनात विध्यार्थी फक्त मानसिकरित्या तयार होतो. त्याच्या भावनिक आणि अध्यात्मिक ज्ञानाची  गरज पूर्ण करण्यासाठी शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणात तशी फारशी व्यवस्था नाही.ती गरज तुमच्या वेळोवेळच्या निरीक्षणातून आणि रिस्क घेण्याच्या क्षमतेतून सिद्ध होणार.

म्हणजे शालेय जीवनातील मिळालेले ज्ञान तुम्हाला नोकरीला लागण्यासाठीची मानसिक तयारी पूर्ण करणार, पण बाकीच्या ३ म्हणजे फिजिकल,इमोशनल, स्पिरिच्युअल प्रकार हे प्रत्येकाला वयक्तिक पातळीवर विकसित करायचे आहे आणि हे शाळा कॉलेज मध्ये नाही तर दैनंदिन जीवनाच्या अनुभवातून, नवीन शिकण्याच्या इच्छेतून मिळते, अर्थात याची परीक्षाही तिथल्या तिथेच  होणार व तिथल्या तिथेच रिझल्ट ही मिळणार. काहींना हे ३ ज्ञानाचे प्रकार आपल्यामध्ये आहेत की नाही याची माहिती असते, तर काहीं या ज्ञानाबद्दलच शेवटपर्यंत अनभिज्ञ..! म्हणून १०, १२ वी सारख्या परीक्षेला कसौटी समजून गोंधळात पडू नका, हा फक्त एंट्री फॉर्म आहे, कसौटी आहे ती पुढे आणि त्या कसौटीची गंम्मत ही की, ती तुम्हाला जिंकावण्यासाठीच तुमच्या समोर येणार, ना की तुम्हाला अज्ञानी ठरवण्यासाठी किंवा तुम्हाला चूक किंवा बरोबर ठरवण्यासाठी. म्हणजे घटना घडली आणि तुम्हीं अडखळले, गोंधळले, आपटले, किंवा तुटले तरी तुमच्या खात्यात गुण  जमा होणार. म्हणजे प्रत्येक घटना तुम्हाला 'गुण'  देऊन 'गुणी' बनवणार. हे गुण सतत मिळत राहणार, वाढत राहणार जो पर्यंत तुम्ही मैदानात आहेत तोपर्यंत आणि तोपर्यंत तुम्ही फेल नाही, जोपर्यंत तुम्ही मैदानात ...!  त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील ८०% यश या ३ हि ज्ञानाने व्यापले आहे.

१० आणि १२ वी च्या विद्यार्थ्यानी परीक्षेचा अभ्यास करा, बाकी किती मार्क घ्यायचे ?, कोणापेक्ष्या  जास्त  घ्यायचे ? याचा  विचार करून कारण नसताना स्वतःच्या आत्मविश्वासाला सुरुंग लावण्याची, काहीही गरज नाही. कारण जास्त  मार्कवाले  आणि कमी मार्कवाले....! पहिला, दुसरा आणि  शेवटचाही, तुम्ही सगळे…, इथेच…, याच जगात काम करण्यासाठी राहणार आहात. या प्लानेटच्या बाहेर तुम्ही लोक जाणार नाहीत, एवढे तर  नक्की आहे.

पास झाल्यावर कामाला तुम्ही सगळेच लागणार, हे ही तितकेच खरे. महत्वाचे हे की तिथे काम करताना 80% परिस्थितीमध्ये तुम्हाला शाळेतील शिक्षण व परीक्षेतील मार्क कामी येणार नाही.  ते हाताळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न व अनुभवाच्या कठोर चौकटीतून जावे लागणार आहे आणि ते तुम्हाला खरया मैदानात आल्याशिवाय कळणार नाही. सोबतच सक्षम असण्याऱ्या व्यक्तीचा सहवास, अनुभवी लोकांचे मार्गदर्शन, यशस्वी लोकांचे विचार तुमचे ज्ञान वाढवणार, ते स्वीकारण्यासाठी भविष्यात तुम्ही कसे तयार होता हा महत्वाचा प्रश्न आहे.

शालेय जीवनातील यश जरी महत्वाचे असले तरी इमोशनल आणि स्पिरिच्युअल योग्यता नसेल किंवा निर्माण झाली नाही, तर तुम्हाला मिळालेले यश टिकवणे आणि वाढवणे शक्य होणार नाही. त्यामुळे परीक्षा आणि त्यातील मार्क हेच सर्व नाही, तर ती एक छोटीशी पायरी आहे. "ओप्रा विन्फ्रे" ही अशी स्त्री आहे, जिचे लहानपण अतिशय खडतर वातावरणातून आणि अनुभवातून गेले. एका ब्लॅक कुटुंबात जन्म झाल्यावर  ९ ते १४ वर्षाच्या अतिशय कोवळ्या वयात शारीरिक शोषणातून तिला जावे लागले, त्यानंतर १४ व्या वर्षीच तिच कुमारी माता होणे, हे दुर्दैवी होत. ही दाहकता समजण्यापलीकडची होती, पण हे एवढ्यावरच थांबणारे नव्हते, आणखी इतिहास घडायाचा बाकी होता. सूर्याच्या प्रकाशाला आव्हान देणारी व्यक्ती होण्यासाठीचे सर्व झगडे पूर्ण करायचे होते. एखादया व्यक्तीला आयुष्यातून उठण्यासाठी एवढा संघर्ष खूप आहे... पण संपेल ती ओप्रा कसली, आपल्या दुःखाला आणि संघर्षाला जगण्याची ढाल करून, रडत न बसता, ती तिला आवडणाऱ्या कामात सतत झोकून देत राहिली, पडत पडत उभी राहिली आणि वयाच्या ३२ व्या वर्षी जगातील सगळ्यात मोठ्या मीडिया शो ची होस्ट बनली, दैदिप्यमान यश मिळवले, कर्तुत्वाला ही लाजवेल असे काही मिळवले. जगातल्या सर्व क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वाना तिच्या शोमध्ये जाणे हे प्रतिष्ठेचे झाले, मुख्य देशातल्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांपासून ते प्रसिद्ध कलाकार सामाजिक कार्यकर्ते हे या प्रोग्राममध्ये सहभाग घेण्यास आतुर व्हायला लागले. त्या प्रोग्रॅमचे नाव होते "द ओप्रा विन्फ्रे शो". आजच्या घडीला जगातला सगळ्यात प्रसिद्ध शो.

उच्च शिक्षणातनंतरही बरेच लोक अडचणीच्या क्षणी ढासाळतात आणि कमावलेले सर्व क्षणात गमावून बसतात, त्यामुळे मानसिकरीत्या उच्च शिक्षित जरी झालात, पण भावनिक रित्या तयार नसाल, तर भीती ही तुम्हाला ते करण्यापासून नेहमी थांबवेल जे तुम्ही यशस्वी होण्यासाठी केलेच पाहिजे. ओप्राची भावनिक साक्षरता, अतिशय पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगातूनही उठून उभे राहण्याची तिची भावनिक क्षमता, हीच तिच्या यशाची शिल्पकार ठरली.

शिक्षणानंतर मानसिकरित्या एखाद्या जॉब साठी स्वतःला तयार करतांना राहिलेल्या तीन महत्वाच्या ज्ञानाला गवसणी घालायला विसरू नका, कारण या चार चाकांवरच तुमच्या  भविष्यातील यशाचा प्रवास श्यक्य आहे, एक चाकावर नाही .


सचिन दाभाडे
Management & corporate trainer
Director ASK training Solution.
Website- www.sachindabhade.com
Mail - ask@sachindabhade. com
Sachin.14d@gmail.com
8390130362