Sunday, April 19, 2020


प्राचीन काळात राज्याच्या सैन्यासाठी काम करणाऱ्या लोहाराकडे दोन प्रकारचे साहित्य बनवण्याचे काम असायचे. पाहिले म्हणजे तलवारी आणि भाले बनवणे आणि दुसरे म्हणजे हातकड्या आणि साखळदंड बनवणे. पहिल्या प्रकारचे, म्हणजे तलवारी व भले बनवण्याचे काम, तेंव्हाच जास्त जोरात असायचे जेंव्हा, राज्य हे युध्दाच्या व विस्तारीकरण्याच्या धोरणात असायचे. राज्याच्या विस्तारासाठी होणारे युध्ये ही अश्या हत्यारे निर्मितीसाठी मुख्य प्रेरणा असायची.

आणि हातकड्या व साखळदंड या सारख्या दुसऱ्या प्रकारच्या साहित्य निर्मितीचे काम लोहार तेंव्हाच करायचा जेंव्हा राज्य आपल्या विस्तारीकरणाच्या क्षमतेच्या अत्युच्य टोकावर आहे व राज्याला आता फक्त जे मिळवलं आहे किंवा ताब्यात आहे, ते व्यवस्थित टिकवायचे आहे. अशा अवस्थेत त्यावेळेला शासन करण्यासाठी राज्याला तलवारीची नाही तर हातकड्या आणि साखळदंडाची जास्त गरज भासे. रोमन साम्राज्यातील बऱ्याच घटना उदाहरणादाखल घेता येतील. जेव्हा रोमन साम्राज्य आपल्या यश आणि वाढीच्या सर्वोच्च स्थानावर होते, त्यावेळी लोखंडापासून हत्यारे बनवणाऱ्या कारागिरवर अधिकाऱ्यांची प्रचंड करडी नजर असे आणि त्यांना अतिशय स्पष्टपणे लढण्यासाठी लागणारी हत्यारे बनवायला बंदी होती. कुणीही लोहार आपल्या मनाप्रमाणे तलवारी भाले शासनाच्या अधिकृत मागणीशिवाय बनवू शकत नसे.

लोहाराच्या वर्कशॉपमधील या दोन प्रकारच्या साहित्याच्या उत्पादनावरून त्या त्या साम्राज्याच्या परिस्थितीतीची जाणीव येऊ शकते. पहिल्या प्रकारचे उत्पादन हे हिंमत, ऊर्जा, प्रेरणा या गोष्टींना दर्शवतेय, तर दुसऱ्याप्रकारचे उत्पादन हे अडवणूक, दबाव, नियम, बंधन या गोष्टीला दर्शवतेय.

एखाद्या संस्था, समाज किंवा व्यक्तीमध्ये कुठल्या प्रकारच्या प्रेरणा काम करताय. पहिल्या प्रकारच्या की दुसऱ्या प्रकारच्या ?
यापैकी ज्यामध्ये अडवणूक, दबाव, नियम व बंधन या संबंधीच्या भावना वेगाने काम करताय असे आढळले, तर त्या संस्थेचे, समाजाचे किंवा व्यक्तीचे विविध अर्थाने विस्तारण्याचे प्रयोजन संपले आहे असे समजायला काही हरकत नाही. याउलट हिंमत, ऊर्जा, प्रेरणा या भावना कुठल्याही संस्थेत, समाजात, किंवा व्यक्तीमध्ये वेगाने काम करताय असे लक्षात आले, तर वाढ होण्यासाठीची सर्वात सुपीक जागा ती आहे असे मानून चला.

तुम्ही जिथे आहात तिथे यापैकी काय होते..?

............................
सचिन दाभाडे

No comments:

Post a Comment