स्वतःला काय हवंय हे स्वतःलाच ठाऊक नसलेल्या असमाधानी देवापेक्षा अधिक धोकादायक काय असू शकते ? या प्रश्नाने युव्हाल नोआ हरारीचे सेपियन्स हे साधारणतः ४०० पानांचे पुस्तक वाचकाच्या डोक्यात व्यक्ती म्हणून आत्मपरीक्षणाचे सत्र सुरु करूनच थांबते. आपल्या इच्छा आकांशांची दिशा कोणती असावी अशी आपली इच्छा आहे ? या प्रश्नाने जर तुम्हाला धास्ती भरली नसेल तर तुम्ही २१व्या शतकात येणाऱ्या मूळ प्रश्नाला आणखी हात घातलाच नाही असेच म्हणावे लागेल. युव्हाल नोआ हरारी चे सेपियन्स म्हणजे, माणूस कोण आहे आणि कुठून आलाय याचा मानववंशशास्त्रीय अभ्यासाच्या आधाराने सुरु झालेला नाविन्यपूर्ण प्रवास, जो भौतिकशाश्त्र, रसायनशाश्त्रच्या मार्गे इतिहासाच्या विश्लेषण पद्धतीपर्यंत येऊन थांबताना दिसतो. हे पुस्तक हातात घेताना रुक्ष अश्या प्राचीन अष्मयुगीन कालखंडातील न समाजणाऱ्या संकल्पनातून जावे लागेल असे वाटत असतांनाच हरारी आपल्या रंजक शैलीने आपला गैरसमज दूर करतात. अर्थात वाचकाला पुस्तक हातात घेण्याअगोदर एक महत्वाची सूचना करेल, की सुरवात झाल्यावर अतिशय समजदारीने क्लिष्ट वाटणाऱ्या काही संकल्पना तुम्हाला आपल्याशा कराव्या लागतील. पहिल्या एकदोन प्रकरणात त्यांच्याशी एकदा गट्टी जमली की मग पुढचा प्रवास सोपा होतो आणि हरारी यांचे समग्र आकलन समजायला लागल्यावर चकित होण्याची मालिकाच सुरु होते. हरारी यांच्या नजरेतील उत्क्रांतीची ही गंमत समजून घेण्यासारखी आहे ज्यातून आपल्या म्हणजेच आपले पूर्वज सेपियन्स मानव यांचा भूतकाळापासून उत्क्रांत होत आलेल्या वर्तनाचा आणि त्याद्वारे आजचा मानव निर्माण करीत असलेल्या भविष्याचा धक्कादायक खुलासा आपल्यासमोर रंजक पद्धतीने समोर येईल.
हरारी ३ स्टेप मध्ये मानवाची उत्क्रांती झाल्याचे दाखवतात १ बोधात्मक क्रांती, २ कृषी क्रांती,३ वैज्ञानिक क्रांती. भूतकाळात मानव उत्क्रांत होत असताना फक्त सेपियन्स हीच मानवाची जात विकसित झाली आणि तिच्या द्वारेच आजचा माणूस निर्माण झाला पण हे होत असतांना होमो इरेक्टस, होमो नियांडरथल,या इतर मानवी आणि वैषिठ्यपुर्ण जमाती नामशेष झाल्या. हरारी मानववंशशाश्त्राचे दाखले देत मानवी उत्क्रांतीची मुख्य नस दाबतात पण तीही कौशल्य आणि ज्ञान यांच्या बेमालूम मिश्रणातून. १२ हजार वर्षांपूर्वी कृषी क्रांती झाली यापूर्वी मानव कसा होता त्याच्या श्रद्धा, नातेसंबंधाची चौकट या आणि आणखी अनेक गोष्टीबद्दल कुठलाही परिपूर्ण असा पुरावा नसल्याने मानववंशशास्त्राकडून हा भाग मोठ्या प्रमाणावर गृहीतावरच उभा आहे. बऱ्याच मांडण्याबद्दल शाश्त्रज्ञांमध्ये वाद आहे.. हररी म्हणतात २५ लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानवाची जात अस्तित्वात आल्यापासून ते ७० हजार वर्षेपर्यंत होमो कुळातील सर्व मानवी जाती एकमेकांशी व निसर्गाशी जगण्याचा संघर्ष करत अस्तित्व टिकवून होत्या पण ७० हजार वर्षांपूर्वी सेपियन्स यांनी स्वतःमध्ये असे काही विकसित केले ज्यामुळे त्यांनी यासृष्टीवर आपला ताबा मिळवण्यात इरेक्टस आणि नियांडरथल या आपल्या प्रतिस्पर्ध्याला मागे सोडले व ती होती सेपियन्स मानवाला मिळालेली सर्वोच्च देणगी, कल्पना करू शकण्याची त्याची अद्भुत शक्ती. या कल्पनेतूनच सेपियन्सनि पुराणकथा निर्मिल्या या कल्पित कथांमुळे ७० हजार वर्षांपासून सेपियन्स यांनी अनेक अवास्तव सत्ये, मिथ्स उभी केली ज्याच्या आधारावर त्याने कुटुंबाला, समाजाला, देशाला 'विश्वास' ठेवायला भाग पाडले. हा कथा निर्मितीचा उद्योग आजपर्यंत सुरूय आणि तीच आपली खरी ओळख आहे असे ते म्हणतात यासाठीच सेपियन्स ने भाषेचा शोध कसा लावला हे हरारी सांगतात.
समाजशास्त्राच्या नियमानुसार एक मानव साधारणतः १५० च्या आसपास व्यक्तीसोबत आपले नातेसंबंध निर्माण करू शकतो व ते टिकावू शकतो, पण त्या पुढे जायचे म्हणजे शक्य नाही. ही अडचण मानवी समाजनिर्मितीच्या कामातील मोठा अडथळा होती. पण यावर एक उपाय सेपियन्स यांना सापडला तो म्हणजे समान पुराणकथा निर्मिती. यासाठी त्यांनी भाषेचा शोध लावला. सेपियन्स त्या कथा आधारे एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांसोबत सहकार्य करू लागले. आणि या सहकार्याच्या जोरावर त्याने बाकी प्रजातीचा संहार केला. आजही ज्या जगात आपण जगतो त्यामध्ये आपला धर्म, सांस्कृतिक कल्पना, कॉर्पोरेट कंपन्या, कायदे, समानतेची कल्पना, राष्ट्रवाद अगदी आपण कंपन्यांना करून देत असलेली वेगळी ओळख. या एकप्रकारच्या पुराणकथाच आहेत, ज्या आपल्याला आपले पूर्वज सेपियनस यांच्या कडून मिळालेल्या आहेत. त्या कल्पना शक्तीच्या देणगीचा आपण प्रचंड विकास केला आहे.
हरारी असंख्य उदाहरणे देत जातात. आदिवासि लोक आणी त्यांच्या कल्पित कथां यापासून ते ख्रिश्चन धर्मातील विचार या सर्व काल्पनिक गृहीतकांच्या आधारे मोठा समूह एक येतो. एकसारखा विचार व कृती ही करतो. यावरच हजारो वर्षपूर्वीचा आदिवासी आणि आताचा ख्रिश्चन व्यक्ती यांचा समूह एकत्र बांधलेला असतो. तेच वेगळ्या प्रकारे आजच्या आधुनिक सेपियन्सच्या कोर्पोरेट कंपन्या आणि वकील करताना दिसतात. तेही कायद्याचे ज्ञान उभे करून राज्याच्या कल्पनेआधारे कंपनी नावाची कथा उभी करून त्यावर सामान्य लोकांनाच विश्वास निर्माण करतात व या विश्वासातून हजारो लोक एका ध्येयसाठीच त्वेषाने काम करायला लागतात. ७० हजार वर्षांपूर्वीचा आपला पूर्वज ही अशाच प्रकारे वास्तवावर (म्हणजे झाडे दगड प्राणी यावर) न बोलता कल्पनेवर बोलायला लागला. ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्याची कलपना करायला लागला.त्या द्वारे कल्पित कथा उभ्या करायला लागला.ज्यातून सेपियन्स एकत्र आला. कथेतून त्याने चिन्ह व्यवस्था निर्माण केली आणि त्याच्याशी बाकीच्या सेपियन्सची भावना जोडली. आजही समाज बांधणीच्या ध्येयासाठी अशाच कथा उभ्या केल्या जातात. धर्म बांधणीच्या ध्येयासाठी अश्याच पुराणकथा उभ्या केल्या जातात, राष्ट्र ही तर २०० वर्षा पूर्वी निर्माण झालेली अगदी अलीकडची कथा. काळाच्या ओघात कथांचे सादरीकरण विलक्षण क्लिष्ट झाले. त्याच्या अनेक उपपत्ती ही त्यामुळे निर्माण झाल्याय. या सर्व प्रक्रियेला हरारी मानवी उत्क्रांतीतील बोधात्मक क्रांती असे म्हणतात व हीच मांडणी सेपियन्स या पुस्तकाचा आत्मा आहे.
हरारीचे विशलेषण पुढे पुढे म्हणजेच, इसवी सनानंतरच्या काळातील दाखले देतांना आणखी सर्वव्यापी होत जाते आणि वाचक म्हणून आपले डोके गरगरते. ते म्हणतात क्रांती झाल्यापासूम सेपियन्स अश्या दुहेरी वास्तवात जगत आहे. एका बाजूला झाड, सिंह यासारखे वास्तव, तर दुसऱ्या बाजूला देव, राष्ट्र, यांच्यासरखं कल्पित वास्तव जसा जसा काळ लोटला तसे हे कल्पित वास्तव मूळ वास्तवापेक्षा जास्त बलवान झालंय, अशी मांडणी ते विविध अभ्यास आणि संकल्पनांच्या आधारे करतात. मानवी विकासात साधारणतः वर्तन बदल तेंव्हाच घडले जेंव्हा जुनकीय बदल घडले, पण बोधात्मक क्रांती हा असा प्रकार होता जी झाल्यानंतर वर्तन बदल फार झपाट्याने घडले, पण हे घडत असतांना सेपियन्समध्ये मात्र जुनकीय बदल घडले नाहीत. याचा अर्थ हा होता कि सुरुवातीचे सेपियन्स आणि आजचे, आपण यामध्ये जुनकीय असा फार फरक नाही. आपण जेंव्हा एकटे असतो तेंव्हा आपली असणारी भावनिक आणि मानसिक वागणूक ही आपले मूळ सेपियन्स किंवा मोठ्या प्रमाणावर चिंपांझीशी मिळती जुळती आहे हे सिद्ध होते. फक्त आजचे सेपियन्स म्हणजेच आपण जेंव्हा समूहात एकत्र येतो तेंव्हा आपल्या वर्तनात बदल होतो आणि आपण आपल्याशी संबंधित समाजात सांगितलेल्या विविध पुराणकथेप्रमाणे वर्तन करायला लागतो. हेच वर्तन आपल्याला बाकी सगळ्या प्राण्यापासून वेगळे करते आणि अन्नसाखळीच्या सर्वोच्य पदावर मानवाला नेवून बसवते.अनेक कुटुंबांना आणी गटांना एकत्र बांधून ठेवणारा पुराकथांची कला हीच चिंपांझी आणि आपण यामधला फरक आहे. याच कथांनी आपल्याला नवनिर्मितीचा स्वामी बनवलं आहे.
अनेक नोंदीमधून सेपियन्स हे परिस्थितिकीला क्रमाक्रमाने ठार करणाऱ्या मारेकऱ्यासारखे दिसतात आपले पूर्वज निसर्गाशी सुखसंवाद करुन राहत होते. या पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नका असे ते एके ठिकाणी म्हणतात, कारण औद्योगिक क्रांतीच्या कितीतरी पूर्वी सेपियन्सनी बहुसंख्य वनस्पती आणि प्राणी यांच्या प्रजाती नष्ट केल्या आहेत. जीवविज्ञानच्या इतिवृत्तात सर्वात संहारक प्राणी म्हणून आपली नोंद झाली आहे. हे गृहीतक ते ऑस्ट्रेलिया आणि इतर बेटावरील सेपियन्स चे आगमन होऊन प्राणी जाती सेपियन्सने नष्ट करून तेथील अन्न साखळी ४५ हजार वर्षांपूर्वी नष्ट केली व त्या खंडातील अन्नसाखळीतील तो सर्वोच्च पदावर गेला असे मांडताना करतात. सेपियन्सचा हा प्रवास अजूनही थांबलेला नाही. माणसे एका छत्राखाली एका विचाराखाली एका व्यवस्थेखाली आणण्याचा त्याचा प्रयत्न आणखी सुरु आहे. या सर्व प्रक्रिया अस्थित्वात याव्या म्हणून या उत्क्रांतीच्या प्रकियेत सेपियन्सनी पैशाची संकल्पना कशा प्रक्रियेतून निर्माण केली ज्यामुळे महाकाय साम्रज्य उभारणीसाठी पार्श्वभूमी उभी केली गेली, याची मांडणी वाचायला खूप उद्बोधक आहे . यासंदर्भाने मागील ३ हजार वर्षांमध्ये साम्राज्ये बळकट होण्यासाठी धर्माचा आधार आणि त्याअनुषंगाने येणाऱ्या कथेचा पाया कसा उभा राहिला या सर्वांचं विश्लेषण मोठया अभ्यासपूर्ण आणि मनोरंजक शैलीने हरारी करतात व तीच या लेखनाची जमेची बाजू आहे.
मानवाने उत्क्रांत होत असतांना सगळ्यांना एकत्र मात्र केलेय, पण वैयत्तिक सुख समाधानाची उद्दिष्ठे किती प्राप्त केलीय याबद्दल गंभीर प्रश्न वाचकांसमोर ठेवून हरारी आपली लेखणी थांबवतात. सामाजिक शाश्त्राच्या अभ्यासकांना हा हायपोथेसिस तसा अगदीच नवा नाही पण हरारी ज्या सूक्ष्मपणे आणि वैज्ञानिकपणे आपले म्हणणे मानवाच्या उत्क्रांतीच्या सुरवातीच्या टप्यापासून जोडत जोडत आणतात आणि त्याचा शेवट औद्योगिक क्रांतीच्या अत्युच्य म्हणता येईल अशा इंटेलिजंट डिझाईन म्हणजे बौद्धिक संकल्पन या टप्प्यापर्यंत घेवून येतात जिथे सेपियन्स हे जीवविज्ञानच्या घालून दिलेल्या मर्यादा मोडायला ही सिद्ध झालाय असे दिसते हे त्यांचे म्हणणे एक वेगळा विचार देते. माणसाचे (सेपियन्सचे) हे देवत्व त्याला तारेल कि मारेल हे आता बघायचे आहे.
…………………………………..
सचिन दाभाडे
No comments:
Post a Comment