'माझ्यावर पुस्तक कृपया लिहू नकोस तर माझ्यामुळे पुस्तक लिही'. नेटफ्लिक्स वरील 'फ्राईड' या सिग्मड फ्राईड च्या जीवनावर आधारित सुरवातीच्या कालखंडातील प्लॉट असलेली या सिरीजमधील हे फ्राईडच्या पेशंटच्या तोंडून आलेले वाक्य पूर्ण सिरीज कशी समजून घ्यायचीय याचा दृष्टिकोनच देऊन जाते. पूर्ण सिरीजमध्ये ही केस सोडवताना शेवटी त्यामध्ये भावनिकरित्या गुंतलेला फ्राईड त्याच्या पेशंटला म्हणतो, तुझा फोटो सरकारने पेपरमध्ये छापून तुला अटक करण्याचे सांगितलंय, तर आता तू काय करशील, तेंव्हा पेशंट म्हणते, की आता मला लोक ओळखतील त्यामुळे मी आता खरी फ्री झालीय, आता कुठलाही नकारात्मक विचार मला ड्राईव्ह करू शकणार नाही कारण तो विचार आता माझी शक्ती झालाय, कारण तो विचार नकारात्मक आहे हे मी ओळखलंय आणि हे झालय तुझ्यामुळेच. मी एक केस म्हणून तुझ्या आयुष्यासाठी आता संपली पाहिजे त्यामुळे तू दुसऱ्या केससाठी तयार रहा.
सगळ्या भागांपैकी शेवट मला खूपच आवडला आणि अनेक अर्थाने प्रेरणा देणारा वाटला. घरी येत असतांना फ्राईडच्या डोक्यात असलेला विचार स्पष्ट होत जातात. जे काँशिअस आणि सबकाँशिअस विचारांचे सुंदर असे स्पष्टीकरण आहे. माणसाच्या सबकाँशिअस मेंदूमध्ये त्यांच्या न बोलल्या गेल्याला अव्यक्त अश्या अनेक इच्छा, आकांशा, विचार असतात आणि त्या तुम्हाला तुमच्या नकळत आकार देत असतात. अंधाऱ्या खोलीत तुम्हाला काही दिसत नाही म्हणजे तिथे काहीच नाही असे होत नाही फक्त त्या तुम्हाला अंधारात दिसत नाही एवढेच. तसेच तुमच्या उघड्या डोळ्यांनी प्रकाशात दिसत असलेला भाग हा तुमचा काँशिअस भाग आहे. तर अंधारात न दिसणारा हा अनकाँशिअस भाग. हाच न दिसणारा भाग मोठया प्रमाणावर तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असतो. तुमच्या अनेक कृतीवर प्रभाव पाडत असतो. जर या अंधाऱ्या भागाला आपल्याला बघता आले किंवा ओळखता आले, तर आपल्याला आपल्यातील कमकुवत बाबींचे स्पष्टीकरणे मिळतील.
मानसशास्त्राचा इतिहास हा तसा फार जुना असा नाही साधारणतः 200 वर्षाची शास्त्रीय पार्श्वभूमी असलेली ही विद्याशाखा फ्राईड ने 360 डिग्री मध्ये बदलवली आहे. भानामती, जादूटोणा, भुताचा प्रभाव यासारख्या सागळ्या अज्ञानी कल्पनांच्या चौकटीत मानसिक रोग्यांचे निदान व उपचार अडकलेले असतांना एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी मध्य युरोपात त्यांच्यावर होणारे उपचारही अतिशय क्रूर अशा स्वरूपाचेच होते आणि अश्याच कालखंडाचे बरचसं चित्रण या सिरीजमध्ये आपल्याला दिसते.
सिगमंड फ्राईड ने सुरवातीला हिप्नॉसिसच्या वापराकडून (फ्राईड करिअरच्या सुरवातीला हिप्नॉसिसच्या प्रभावात आला होता पण नंतर त्याला या अभ्यासात शास्त्रीयता वाटली नाही) सबकाँशिअस माईंडच्या विश्लेषणाकडे वळवलेला मोर्चा हा मानसशास्त्रीय अभ्यासाच्या इतिहासात क्रांतिकारक ठरणार होता आणि त्यातून अभ्यासकांची एक मोठी परंपरा उभी राहिली. फ्राईडच्या हिप्नॉसिसच्या अभ्यासाच्या मध्यावर कुठेतरी एका घटनेवर आधारलेली ही कथा संपते. ज्यात फ्राईडच्या वैयक्तिक आयुष्याचे काही तथ्ये ही दाखवण्यात आलीय. या क्रांतिकारक मानसशास्त्रज्ञाच्या सुरुवातीच्या आयुष्यातील भागावर आधारित असलेली ही वेब सिरीज बघावी अशीच आहे.
.....................
सचिन दाभाडे
No comments:
Post a Comment