Sunday, April 19, 2020


प्राचीन काळात राज्याच्या सैन्यासाठी काम करणाऱ्या लोहाराकडे दोन प्रकारचे साहित्य बनवण्याचे काम असायचे. पाहिले म्हणजे तलवारी आणि भाले बनवणे आणि दुसरे म्हणजे हातकड्या आणि साखळदंड बनवणे. पहिल्या प्रकारचे, म्हणजे तलवारी व भले बनवण्याचे काम, तेंव्हाच जास्त जोरात असायचे जेंव्हा, राज्य हे युध्दाच्या व विस्तारीकरण्याच्या धोरणात असायचे. राज्याच्या विस्तारासाठी होणारे युध्ये ही अश्या हत्यारे निर्मितीसाठी मुख्य प्रेरणा असायची.

आणि हातकड्या व साखळदंड या सारख्या दुसऱ्या प्रकारच्या साहित्य निर्मितीचे काम लोहार तेंव्हाच करायचा जेंव्हा राज्य आपल्या विस्तारीकरणाच्या क्षमतेच्या अत्युच्य टोकावर आहे व राज्याला आता फक्त जे मिळवलं आहे किंवा ताब्यात आहे, ते व्यवस्थित टिकवायचे आहे. अशा अवस्थेत त्यावेळेला शासन करण्यासाठी राज्याला तलवारीची नाही तर हातकड्या आणि साखळदंडाची जास्त गरज भासे. रोमन साम्राज्यातील बऱ्याच घटना उदाहरणादाखल घेता येतील. जेव्हा रोमन साम्राज्य आपल्या यश आणि वाढीच्या सर्वोच्च स्थानावर होते, त्यावेळी लोखंडापासून हत्यारे बनवणाऱ्या कारागिरवर अधिकाऱ्यांची प्रचंड करडी नजर असे आणि त्यांना अतिशय स्पष्टपणे लढण्यासाठी लागणारी हत्यारे बनवायला बंदी होती. कुणीही लोहार आपल्या मनाप्रमाणे तलवारी भाले शासनाच्या अधिकृत मागणीशिवाय बनवू शकत नसे.

लोहाराच्या वर्कशॉपमधील या दोन प्रकारच्या साहित्याच्या उत्पादनावरून त्या त्या साम्राज्याच्या परिस्थितीतीची जाणीव येऊ शकते. पहिल्या प्रकारचे उत्पादन हे हिंमत, ऊर्जा, प्रेरणा या गोष्टींना दर्शवतेय, तर दुसऱ्याप्रकारचे उत्पादन हे अडवणूक, दबाव, नियम, बंधन या गोष्टीला दर्शवतेय.

एखाद्या संस्था, समाज किंवा व्यक्तीमध्ये कुठल्या प्रकारच्या प्रेरणा काम करताय. पहिल्या प्रकारच्या की दुसऱ्या प्रकारच्या ?
यापैकी ज्यामध्ये अडवणूक, दबाव, नियम व बंधन या संबंधीच्या भावना वेगाने काम करताय असे आढळले, तर त्या संस्थेचे, समाजाचे किंवा व्यक्तीचे विविध अर्थाने विस्तारण्याचे प्रयोजन संपले आहे असे समजायला काही हरकत नाही. याउलट हिंमत, ऊर्जा, प्रेरणा या भावना कुठल्याही संस्थेत, समाजात, किंवा व्यक्तीमध्ये वेगाने काम करताय असे लक्षात आले, तर वाढ होण्यासाठीची सर्वात सुपीक जागा ती आहे असे मानून चला.

तुम्ही जिथे आहात तिथे यापैकी काय होते..?

............................
सचिन दाभाडे

Wednesday, April 15, 2020

युव्हल नोआ हरारीचे सेपियन्स - मानवी उत्क्रांतीची उत्कंठापूर्वक पुनर्रचना


स्वतःला काय हवंय  हे स्वतःलाच ठाऊक नसलेल्या असमाधानी देवापेक्षा अधिक धोकादायक काय असू शकते ? या प्रश्नाने युव्हाल नोआ हरारीचे सेपियन्स हे साधारणतः ४०० पानांचे पुस्तक वाचकाच्या डोक्यात व्यक्ती म्हणून आत्मपरीक्षणाचे सत्र सुरु करूनच थांबते. आपल्या इच्छा आकांशांची दिशा कोणती असावी अशी आपली इच्छा आहे ? या प्रश्नाने जर तुम्हाला धास्ती भरली नसेल तर तुम्ही २१व्या शतकात येणाऱ्या मूळ प्रश्नाला आणखी हात घातलाच नाही असेच म्हणावे लागेल. युव्हाल नोआ हरारी चे सेपियन्स म्हणजे, माणूस कोण आहे आणि कुठून आलाय याचा मानववंशशास्त्रीय अभ्यासाच्या आधाराने सुरु झालेला नाविन्यपूर्ण प्रवास, जो भौतिकशाश्त्र, रसायनशाश्त्रच्या मार्गे इतिहासाच्या विश्लेषण पद्धतीपर्यंत येऊन थांबताना दिसतो. हे पुस्तक हातात घेताना रुक्ष अश्या प्राचीन अष्मयुगीन कालखंडातील न समाजणाऱ्या संकल्पनातून जावे लागेल असे वाटत असतांनाच हरारी आपल्या रंजक शैलीने आपला गैरसमज दूर करतात. अर्थात वाचकाला पुस्तक हातात घेण्याअगोदर एक महत्वाची सूचना करेल, की सुरवात झाल्यावर अतिशय समजदारीने क्लिष्ट वाटणाऱ्या काही संकल्पना तुम्हाला आपल्याशा कराव्या लागतील. पहिल्या एकदोन प्रकरणात त्यांच्याशी एकदा गट्टी जमली की मग पुढचा प्रवास सोपा होतो आणि हरारी यांचे समग्र आकलन समजायला लागल्यावर चकित होण्याची मालिकाच सुरु होते. हरारी यांच्या नजरेतील उत्क्रांतीची ही गंमत समजून घेण्यासारखी आहे ज्यातून आपल्या म्हणजेच आपले पूर्वज सेपियन्स मानव यांचा भूतकाळापासून उत्क्रांत होत आलेल्या वर्तनाचा आणि त्याद्वारे आजचा मानव निर्माण करीत असलेल्या भविष्याचा धक्कादायक खुलासा आपल्यासमोर रंजक पद्धतीने समोर येईल.  

हरारी ३ स्टेप मध्ये मानवाची उत्क्रांती झाल्याचे दाखवतात १ बोधात्मक क्रांती, २ कृषी क्रांती,३ वैज्ञानिक क्रांती.  भूतकाळात मानव उत्क्रांत होत असताना फक्त सेपियन्स हीच मानवाची जात विकसित झाली आणि तिच्या द्वारेच आजचा माणूस निर्माण झाला पण हे होत असतांना  होमो इरेक्टस, होमो नियांडरथल,या इतर मानवी आणि वैषिठ्यपुर्ण जमाती नामशेष झाल्या. हरारी मानववंशशाश्त्राचे दाखले देत मानवी उत्क्रांतीची मुख्य नस दाबतात पण तीही कौशल्य आणि ज्ञान यांच्या बेमालूम मिश्रणातून. १२ हजार वर्षांपूर्वी कृषी क्रांती झाली यापूर्वी मानव कसा होता त्याच्या श्रद्धा, नातेसंबंधाची चौकट या आणि आणखी अनेक गोष्टीबद्दल कुठलाही परिपूर्ण असा पुरावा नसल्याने मानववंशशास्त्राकडून हा भाग मोठ्या प्रमाणावर गृहीतावरच  उभा आहे. बऱ्याच मांडण्याबद्दल शाश्त्रज्ञांमध्ये वाद आहे.. हररी म्हणतात २५ लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानवाची जात अस्तित्वात आल्यापासून ते ७० हजार वर्षेपर्यंत होमो कुळातील सर्व मानवी जाती एकमेकांशी व निसर्गाशी जगण्याचा संघर्ष करत अस्तित्व  टिकवून  होत्या पण ७० हजार वर्षांपूर्वी सेपियन्स यांनी स्वतःमध्ये असे काही विकसित केले ज्यामुळे त्यांनी यासृष्टीवर आपला ताबा मिळवण्यात  इरेक्टस आणि  नियांडरथल या आपल्या प्रतिस्पर्ध्याला मागे सोडले व ती होती सेपियन्स मानवाला मिळालेली सर्वोच्च देणगी,  कल्पना करू शकण्याची त्याची अद्भुत शक्ती. या कल्पनेतूनच सेपियन्सनि पुराणकथा निर्मिल्या या कल्पित कथांमुळे ७० हजार वर्षांपासून सेपियन्स यांनी अनेक अवास्तव सत्ये, मिथ्स उभी केली ज्याच्या आधारावर त्याने कुटुंबाला, समाजाला, देशाला 'विश्वास'  ठेवायला भाग पाडले. हा कथा निर्मितीचा उद्योग आजपर्यंत सुरूय आणि तीच आपली खरी ओळख आहे असे ते म्हणतात यासाठीच सेपियन्स ने भाषेचा शोध कसा लावला हे हरारी  सांगतात.

समाजशास्त्राच्या नियमानुसार एक मानव साधारणतः १५० च्या आसपास व्यक्तीसोबत आपले नातेसंबंध निर्माण करू शकतो व ते टिकावू शकतो, पण त्या पुढे जायचे म्हणजे शक्य नाही. ही अडचण मानवी समाजनिर्मितीच्या कामातील मोठा अडथळा होती. पण यावर एक उपाय सेपियन्स यांना  सापडला तो म्हणजे समान पुराणकथा निर्मिती. यासाठी त्यांनी भाषेचा शोध लावला. सेपियन्स त्या कथा आधारे एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांसोबत सहकार्य करू लागले. आणि या सहकार्याच्या जोरावर त्याने बाकी प्रजातीचा संहार केला. आजही ज्या जगात आपण जगतो त्यामध्ये आपला धर्म, सांस्कृतिक कल्पना, कॉर्पोरेट कंपन्या, कायदे, समानतेची कल्पना, राष्ट्रवाद अगदी आपण कंपन्यांना करून देत असलेली वेगळी ओळख. या एकप्रकारच्या पुराणकथाच आहेत, ज्या आपल्याला आपले पूर्वज सेपियनस यांच्या कडून  मिळालेल्या आहेत. त्या कल्पना शक्तीच्या देणगीचा आपण प्रचंड विकास केला आहे.

हरारी असंख्य उदाहरणे देत जातात. आदिवासि लोक आणी त्यांच्या कल्पित कथां यापासून ते ख्रिश्चन धर्मातील विचार या सर्व काल्पनिक गृहीतकांच्या आधारे मोठा समूह एक येतो. एकसारखा विचार व कृती ही करतो.   यावरच हजारो वर्षपूर्वीचा आदिवासी आणि आताचा ख्रिश्चन व्यक्ती यांचा समूह एकत्र बांधलेला असतो. तेच वेगळ्या प्रकारे आजच्या आधुनिक सेपियन्सच्या  कोर्पोरेट  कंपन्या आणि वकील करताना दिसतात. तेही कायद्याचे ज्ञान उभे करून राज्याच्या कल्पनेआधारे कंपनी नावाची कथा उभी करून त्यावर सामान्य लोकांनाच विश्वास निर्माण करतात व या विश्वासातून हजारो लोक एका ध्येयसाठीच त्वेषाने काम करायला लागतात. ७० हजार वर्षांपूर्वीचा आपला पूर्वज ही अशाच प्रकारे वास्तवावर (म्हणजे झाडे दगड प्राणी यावर) न बोलता कल्पनेवर बोलायला लागला. ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्याची कलपना करायला लागला.त्या द्वारे कल्पित कथा उभ्या करायला लागला.ज्यातून सेपियन्स एकत्र आला. कथेतून त्याने चिन्ह व्यवस्था निर्माण केली आणि त्याच्याशी बाकीच्या सेपियन्सची भावना जोडली. आजही समाज बांधणीच्या ध्येयासाठी अशाच कथा उभ्या केल्या जातात. धर्म बांधणीच्या ध्येयासाठी अश्याच पुराणकथा उभ्या केल्या जातात, राष्ट्र ही तर २००  वर्षा पूर्वी निर्माण  झालेली अगदी अलीकडची कथा. काळाच्या ओघात कथांचे सादरीकरण विलक्षण क्लिष्ट झाले. त्याच्या अनेक उपपत्ती ही त्यामुळे निर्माण झाल्याय. या सर्व प्रक्रियेला हरारी  मानवी उत्क्रांतीतील बोधात्मक क्रांती असे म्हणतात व हीच मांडणी सेपियन्स या पुस्तकाचा आत्मा आहे. 

हरारीचे विशलेषण पुढे पुढे म्हणजेच, इसवी सनानंतरच्या  काळातील दाखले देतांना  आणखी सर्वव्यापी होत जाते आणि वाचक म्हणून आपले डोके गरगरते. ते म्हणतात क्रांती झाल्यापासूम सेपियन्स अश्या दुहेरी वास्तवात जगत आहे. एका बाजूला झाड, सिंह यासारखे वास्तव, तर दुसऱ्या बाजूला देव, राष्ट्र, यांच्यासरखं कल्पित वास्तव जसा जसा काळ लोटला तसे हे कल्पित वास्तव मूळ वास्तवापेक्षा जास्त  बलवान झालंय, अशी मांडणी ते विविध अभ्यास आणि संकल्पनांच्या आधारे करतात. मानवी विकासात साधारणतः  वर्तन बदल तेंव्हाच घडले जेंव्हा जुनकीय बदल घडले, पण बोधात्मक क्रांती हा असा प्रकार होता जी  झाल्यानंतर  वर्तन बदल फार झपाट्याने घडले, पण हे घडत असतांना  सेपियन्समध्ये मात्र जुनकीय बदल घडले नाहीत. याचा अर्थ हा होता कि सुरुवातीचे सेपियन्स आणि आजचे, आपण यामध्ये जुनकीय असा फार फरक नाही. आपण जेंव्हा एकटे असतो तेंव्हा आपली असणारी भावनिक आणि मानसिक वागणूक ही आपले मूळ  सेपियन्स किंवा मोठ्या प्रमाणावर चिंपांझीशी मिळती जुळती आहे हे सिद्ध होते. फक्त आजचे सेपियन्स म्हणजेच आपण जेंव्हा समूहात एकत्र येतो तेंव्हा आपल्या वर्तनात बदल होतो आणि आपण आपल्याशी संबंधित समाजात सांगितलेल्या विविध पुराणकथेप्रमाणे वर्तन करायला लागतो. हेच वर्तन आपल्याला बाकी सगळ्या प्राण्यापासून वेगळे करते आणि अन्नसाखळीच्या सर्वोच्य पदावर मानवाला नेवून बसवते.अनेक कुटुंबांना आणी गटांना एकत्र  बांधून ठेवणारा पुराकथांची कला  हीच  चिंपांझी आणि आपण यामधला फरक आहे.  याच कथांनी आपल्याला नवनिर्मितीचा स्वामी बनवलं आहे.

अनेक नोंदीमधून सेपियन्स हे परिस्थितिकीला क्रमाक्रमाने ठार करणाऱ्या मारेकऱ्यासारखे दिसतात आपले पूर्वज निसर्गाशी सुखसंवाद करुन राहत होते. या  पर्यावरणप्रेमींच्या   म्हणण्यावर   विश्वास  ठेवू नका असे ते एके ठिकाणी म्हणतात, कारण औद्योगिक  क्रांतीच्या कितीतरी पूर्वी सेपियन्सनी बहुसंख्य वनस्पती आणि प्राणी यांच्या प्रजाती नष्ट केल्या आहेत. जीवविज्ञानच्या इतिवृत्तात सर्वात संहारक प्राणी म्हणून आपली नोंद झाली आहे. हे गृहीतक ते ऑस्ट्रेलिया आणि इतर बेटावरील सेपियन्स चे आगमन होऊन  प्राणी जाती सेपियन्सने नष्ट करून तेथील अन्न  साखळी ४५ हजार वर्षांपूर्वी नष्ट केली व त्या खंडातील अन्नसाखळीतील तो सर्वोच्च पदावर गेला असे मांडताना  करतात. सेपियन्सचा  हा प्रवास अजूनही थांबलेला नाही. माणसे एका छत्राखाली एका विचाराखाली एका व्यवस्थेखाली आणण्याचा त्याचा प्रयत्न आणखी सुरु आहे. या सर्व प्रक्रिया अस्थित्वात याव्या म्हणून या उत्क्रांतीच्या प्रकियेत सेपियन्सनी  पैशाची संकल्पना कशा प्रक्रियेतून निर्माण केली ज्यामुळे महाकाय साम्रज्य उभारणीसाठी पार्श्वभूमी उभी केली गेली, याची मांडणी वाचायला खूप उद्बोधक आहे . यासंदर्भाने मागील ३ हजार वर्षांमध्ये साम्राज्ये बळकट होण्यासाठी धर्माचा आधार आणि त्याअनुषंगाने येणाऱ्या कथेचा पाया कसा उभा राहिला या सर्वांचं विश्लेषण मोठया अभ्यासपूर्ण आणि मनोरंजक शैलीने हरारी करतात व तीच या लेखनाची जमेची बाजू आहे.

मानवाने उत्क्रांत होत असतांना  सगळ्यांना एकत्र मात्र केलेय, पण वैयत्तिक सुख समाधानाची उद्दिष्ठे किती प्राप्त केलीय याबद्दल गंभीर प्रश्न वाचकांसमोर ठेवून हरारी आपली लेखणी थांबवतात. सामाजिक शाश्त्राच्या अभ्यासकांना हा हायपोथेसिस तसा अगदीच नवा नाही पण हरारी ज्या सूक्ष्मपणे आणि वैज्ञानिकपणे आपले म्हणणे मानवाच्या उत्क्रांतीच्या सुरवातीच्या टप्यापासून जोडत जोडत आणतात आणि त्याचा शेवट औद्योगिक क्रांतीच्या अत्युच्य म्हणता येईल अशा इंटेलिजंट डिझाईन म्हणजे बौद्धिक संकल्पन या टप्प्यापर्यंत घेवून येतात जिथे सेपियन्स हे जीवविज्ञानच्या घालून दिलेल्या मर्यादा मोडायला ही सिद्ध झालाय असे दिसते हे त्यांचे म्हणणे एक वेगळा विचार देते. माणसाचे (सेपियन्सचे) हे देवत्व त्याला तारेल कि मारेल हे आता बघायचे आहे. 

 

…………………………………..

सचिन दाभाडे

Friday, April 10, 2020

'फ्राईड'


'माझ्यावर पुस्तक कृपया लिहू नकोस तर माझ्यामुळे पुस्तक लिही'. नेटफ्लिक्स वरील 'फ्राईड' या सिग्मड फ्राईड च्या जीवनावर आधारित सुरवातीच्या कालखंडातील प्लॉट असलेली या सिरीजमधील हे फ्राईडच्या पेशंटच्या तोंडून आलेले वाक्य पूर्ण सिरीज कशी समजून घ्यायचीय याचा दृष्टिकोनच देऊन जाते. पूर्ण सिरीजमध्ये ही केस सोडवताना शेवटी त्यामध्ये भावनिकरित्या गुंतलेला फ्राईड त्याच्या पेशंटला म्हणतो, तुझा फोटो सरकारने पेपरमध्ये छापून तुला अटक करण्याचे सांगितलंय, तर आता तू काय करशील, तेंव्हा पेशंट म्हणते, की आता मला लोक ओळखतील त्यामुळे मी आता खरी फ्री झालीय, आता कुठलाही नकारात्मक विचार मला ड्राईव्ह करू शकणार नाही कारण तो विचार आता माझी शक्ती झालाय, कारण तो विचार नकारात्मक आहे हे मी ओळखलंय आणि हे झालय तुझ्यामुळेच. मी एक केस म्हणून तुझ्या आयुष्यासाठी आता संपली पाहिजे त्यामुळे तू दुसऱ्या केससाठी तयार रहा.



सगळ्या भागांपैकी शेवट मला खूपच आवडला आणि अनेक अर्थाने प्रेरणा देणारा वाटला. घरी येत असतांना फ्राईडच्या डोक्यात असलेला विचार स्पष्ट होत जातात. जे काँशिअस आणि सबकाँशिअस विचारांचे सुंदर असे स्पष्टीकरण आहे. माणसाच्या सबकाँशिअस मेंदूमध्ये त्यांच्या न बोलल्या गेल्याला अव्यक्त अश्या अनेक इच्छा, आकांशा, विचार असतात आणि त्या तुम्हाला तुमच्या नकळत आकार देत असतात. अंधाऱ्या खोलीत तुम्हाला काही दिसत नाही म्हणजे तिथे काहीच नाही असे होत नाही फक्त त्या तुम्हाला अंधारात दिसत नाही एवढेच. तसेच तुमच्या उघड्या डोळ्यांनी प्रकाशात दिसत असलेला भाग हा तुमचा काँशिअस भाग आहे. तर अंधारात न दिसणारा हा अनकाँशिअस भाग. हाच न दिसणारा भाग मोठया प्रमाणावर तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असतो. तुमच्या अनेक कृतीवर प्रभाव पाडत असतो. जर या अंधाऱ्या भागाला आपल्याला बघता आले किंवा ओळखता आले, तर आपल्याला आपल्यातील कमकुवत बाबींचे स्पष्टीकरणे मिळतील.

मानसशास्त्राचा इतिहास हा तसा फार जुना असा नाही साधारणतः 200 वर्षाची शास्त्रीय पार्श्वभूमी असलेली ही विद्याशाखा फ्राईड ने 360 डिग्री मध्ये बदलवली आहे. भानामती, जादूटोणा, भुताचा प्रभाव यासारख्या सागळ्या अज्ञानी कल्पनांच्या चौकटीत मानसिक रोग्यांचे निदान व उपचार अडकलेले असतांना एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी मध्य युरोपात त्यांच्यावर होणारे उपचारही अतिशय क्रूर अशा स्वरूपाचेच होते आणि अश्याच कालखंडाचे बरचसं चित्रण या सिरीजमध्ये आपल्याला दिसते.

सिगमंड फ्राईड ने सुरवातीला हिप्नॉसिसच्या वापराकडून (फ्राईड करिअरच्या सुरवातीला हिप्नॉसिसच्या प्रभावात आला होता पण नंतर त्याला या अभ्यासात शास्त्रीयता वाटली नाही) सबकाँशिअस माईंडच्या विश्लेषणाकडे वळवलेला मोर्चा हा मानसशास्त्रीय अभ्यासाच्या इतिहासात क्रांतिकारक ठरणार होता आणि त्यातून अभ्यासकांची एक मोठी परंपरा उभी राहिली. फ्राईडच्या हिप्नॉसिसच्या अभ्यासाच्या मध्यावर कुठेतरी एका घटनेवर आधारलेली ही कथा संपते. ज्यात फ्राईडच्या वैयक्तिक आयुष्याचे काही तथ्ये ही दाखवण्यात आलीय. या क्रांतिकारक मानसशास्त्रज्ञाच्या सुरुवातीच्या आयुष्यातील भागावर आधारित असलेली ही वेब सिरीज बघावी अशीच आहे.


.....................
सचिन दाभाडे

Wednesday, April 1, 2020

'यु टर्न'


हल्ले अटॅक लोकांचे मृत्यू हा माहितीचा भाग म्हणून घ्यावा की संवेदनेचा भाग म्हणून घ्यावा यावर वेगवेगळी मते असू शकतात. पण याही उपर गेल्या महिन्याभरापासून आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या च घरात एकदुसऱ्याला बाहेर न पडण्याचा आणि त्याचे भयानक दुष्परिणाम आपापल्या पद्धतीने सांगताय एकमेकांना सांगण्याचे प्रमाण वाढलंय हे लक्षात येण्यासारखं आहे. माणस एकमेकांच्या संपर्कात आली तर जिवाला धोका आहे, बाहेर जाण्यास बंदी आहे, सगळी ऑफिसेस संस्था बंद आहे, देश थांबलाय...!

हे सगळं स्वप्नं नसून खरचं घडतंय. दुपारी समजा झोपलेलो असलो आणि जाग जेंव्हा येते तेंव्हा असे वाटतंय की हा स्वप्नाचाच भाग होता पण खरं म्हणजे झोपेमुळेच तर या वास्तवातून ब्रेक मिळाला होता हे थोड्या वेळात समजते. पृथ्वीच्या पाठीवर एवढी भयंकर युद्धे झालीय अगदी मागच्याच शतकात दोन भयंकर जीवघेणी महायुद्ध झालीय. या महायुध्दात हजारो माणसे मेलीत, पण त्याबद्दल वाचतांना किंवा माहिती घेतांना याचा वास्तवाशी संबंध असल्याचा फील आला नाही.कुठेतरी दुसऱ्या जगाशी संबंधित किंवा एखादा हॉलीवूडचा मुव्ही बघतांना जे नावीन्य किंवा थ्रिल याव असच काहीतरी या घटना घडतांना रिस्पॉन्स गेला असेल.

काही प्रश्नांची उत्तरे लिहायचीय किंवा, यावर्षात काय झालं, याचं ज्ञान मला आहे यापलीकडे या घटनांत काही असेल अस वाटलंच नाही किंवा वाटण्याचे कारणही नसेल कदाचित. तेलावरून अनेक युद्धे, इराण इराक युद्ध, गल्फ वॉर, कुवेत वॉर, नायगर डेल्ट मध्ये सध्या चालू असलेले झगडे या आणि अशांच्या बातम्या लहानपनापासून पेपर मध्ये वाचायला मिळायच्या. या युद्धात माणसं मरायच्या खबरा यायच्या. रशिया अमेरिकेच्या शीत युद्धाच्या परिणामामुळे तिसऱ्या जगातील राष्ट्रे कशी बळी पडताय, वेगवेगळ्या दबाव तंत्रामुळे युद्धाची भयंकर साधने निर्माण केली जाताय याच्या बातम्या नेहमी कुठल्यानं कुठल्या माध्यमातून येताच राहिल्याय.

चीन पाकिस्थानशी युध्दाच्या बाता तर चहाच्या घोटासोबत कित्येक वेळा मित्रांसोबत मारल्याचे आठवतेय त्यात किती माणसांची कुर्बानी देऊन आपण परिणामाचा अंदाजही मनातल्या मनात तयार केलाय नियोजन. पण एवढं सगळं भयंकर घडत असतांना किंवा त्यावर विचार करत असताना मला भीती अशी कधी वाटलीच नाही किंवा वाटायचं कारण नव्हते कारण ती माहिती होती. एक विचार असा ही होता, एवढी लोकसंख्या वाढलीय, तर संसाधन अपुरे पडायला लागल्यावर माणसे काय करतील. एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या कशा प्रकारच्या असतील याचाही वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून झालेला होता.

जग हे तिसऱ्या महायुद्धापर्यंत येऊन थांबलय. ते पाण्यासाठी होईल आणि या युद्धात अणुबॉम्बचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊन सर्व पृथ्वी नष्ट होईल हे मी माझ्या मित्रांना चटणीसोबत पापड लावून खातांना अगदी कन्फर्म सांगितलंय आणि ते सांगताना मला भीती किंवा अस्वस्थतेचे भाव होते असे काही आठवत नाही.

माणसे मरतात, त्यांना कोण मारतो, कशासाठी मारतो हा भीतीचा विषय नसून ज्ञान मिळविण्याचा भाग आहे. तोच पुढेपुढे विकसित होत गेला. आर्थिक जग, विकास, जागतिकीकरण, खाजगीकरण, बेकारी, बँका, विविध राज्ये व त्याचे मुद्दे याबाबद्दलचे ज्ञान वाढत होते. मध्येच फटीकनेस आला की पर्यावरण आणि त्याची गरज यावरही थोडा वेळात वेळ काढून विचार केलाय.

जर भविष्यात जग लढलेच तर कुठल्या साधनांच्या आधारे लढेल, यावर अधिक अपडेट होण्याचा माझा प्रयत्न मला व्यापारातून देश एकमेकांनाची गोची करून वेगवेगळ्या मार्गे गळचेपी करतील इथपासून, बायोवॉरही भविष्यात कधीतरी होणारी घटना आहेच, ते होऊ शकते आणि हे सांगताना जर्मनी, अमेरिका, चीन, रशिया, स्पेन सारखे राष्ट्रे कशी बायोकेमिकल वेपन्स करण्यात गुंतली आहे, याबद्द्ल सांगून मी अपडेट आहे याची जाणीव होऊन प्रेरित झाल्याचं मला नक्की आठवतंय.

म्हणजे भीती अशी कधी वाटलीच नाही. अधिक माहिती, अधिक डेटा, सगळ्यांच माहितीच वेळोवेळी स्मरण, योग्य वेळी त्याचं परफेक्ट सादरीकरण. सगळं कसं अगदी सराईतपणे.

मागचे 20 दिवसही तसे काही वेगळे नाहीत.पूर्ण घरात आहे. फक्त काही महत्वाचे बदल आहेत.  नकारात्मक बातम्यापासून दूर राहता यावे म्हणून मी माहिती मिळवणे बंद केलेय. आणि हो भीती वाटायला लागलीय.

.........................
सचिन दाभाडे