Friday, April 9, 2021

उरूस आणि सिनेमा..!




माझं दहावी पर्यंत शिक्षण होईपर्यंत आम्ही बहिरगाव येथे राहत होतो. कन्नड पासून 5 ते 7 किमी अंतरावर असलेले हे एक समृद्ध आणि सुजलाम सुफलाम गाव. आईच्या बहिरगाव येथील सर्विसमुळे आमचे प्राथमिक शिक्षण बहिरगावला झाले. दरवर्षी कन्नडला उरूस भरायचा. वर्षभर टीव्हीवर गाणे पाहत पाहत मनात असलेल्या हिरोची सिनेमे उरसात केंव्हा येतील आणि येईल की नाही ही धाकधूक असायची. आवडत्या हिरोच्या चारपाच सिनेमांपैकी एक दोन तरी उरसात आले पाहिजे म्हणजे तेंव्हा ते बघता येतील म्हणून वर्षभर पाण्यात देव ठेवून बसलेलो असायचो आम्ही मनातल्या मनात. एका ऊरसात गोविंदाच्या कुलि नंबर वन साठी असेच देव पाण्यात ठेवून बसलो होतो मी. उरूस सुरू झाला आणि रोज मिठात बुडावलेले सडके बोर खायला बहिरगाववरून कन्नडला जाणाऱ्या माझ्या एका मित्राने खबर दिली की उरसात कुलि नंबर वन लागलाय रे म्हणून. आणि मग काय सांगावे, केवढा आनंद तो..! केवळ अवर्णनीय.. ! ..म्हणजे आता येणाऱ्या कुठल्याही दिवशी मी गोविंदाला पाहणार होतो. आता फक्त कुठल्या संध्याकाळी कूच करायचे ठेवढेच ठरायचे बाकी होते.

कितवीला होतो ते आठवत नाही, पण मोठी सायकल चालवता यायची. दोन मित्रांच्या सायकलींवर आम्ही दोन आणखी पाठीमागे बसून बहिरगावरून कन्नडला एका छोट्याश्या पांदीने निघालो. जातांना 'जब दिल ना लगे दिलदार हमारी गली आजाना' या गाण्यात काळा गॉगल घालून त्याच्या पाठीमागे लाल कपड्यात डान्स करणाऱ्या शंभर एक लेडीज डान्सर समोरून एक खांदा खाली करून डान्स करत जाणारा गोविंदा थोड्यावेळासाठीसुद्धा मनातून बाजूला हटलेला नव्हता. ध्यानीं मनी काष्टी पाषाणी फक्त गोविंदा होता. एवढा जर देव मनात असता तर तोही प्रसन्न झाला असता. उरसात पोहचल्या पोहचक्या डोळे भिरभिरत पोस्टरवर लाल कपड्यात गोविंदाला शोधायला लागले. आम्ही संध्याकाळी सातच्या सुमारास उरसात पोहचलो आणि तडक कुलि नंबर वनच्या पोस्टर खाली जाऊन उभे राहिलो. तिकीट खिडकीवर गेल्यावर लक्षात आले की पिक्चर सुरू होऊन अर्धा तास झालेला. पण थोडा ही उशीर न करता आम्ही लगेच तिकिटांच्या लाईन मधून बाजूला झालो कारण एक मिनिटही जाणे आम्हाला कुणालाच गवारा नव्हते. दुसरा कुठला बघायची मानसिकता नव्हती म्हणून पुढचे दोन तास उरूस पालथा घातला. आणि शेवटी ती वेळ आली पिवळ्या रंगाचे पातळ कागदाचे 4 तिकीट हातात आले. साडे तीन रुपयाचे एक असे 4 तिकिटे काढली होती . वर्षभर फक्त गाणं पाहून पाहून खच्चून समाधानी झालेलो मी कंबर खोसून पूर्ण सिनेमात गोविंदाचा गोंधळ बघायला तयार झालो होतो. अगदी रोम रोमच तयार झाला होता म्हणा ना..!

उरसाचा हा सगळा रोमांच अनुभवण्यासाठी बहिरगाववरून तरुण मुलांच्या टोळ्या रात्री जेवणं करून आपापल्या परीने नियोजन करून निघायच्या. रात्री सायकल वर मित्रांसोबत अडीअडचणीच्या रस्त्याने येऊन रात्रीचे शो पहायचे आणि सकाळी सकाळी किंवा मध्यरात्री परत गावी पोहचायचे याला सुरवातीला बरीच वर्ष घरच्यांकडून मला परवानगी नव्हती. पण जसे जसे मोठे होत गेलो तसे फक्त एकच सिनेमा पाहून रात्री बारा वाजेपर्यंत परतू, असा वादा केल्यावर परवानगी मिळणे सुरू झाले. यानंतर उरसासाठी जिवलग मित्रांसोबत बऱ्याच साहसी सफरी केल्या. यामध्ये साहस हा शब्द फक्त मला लागू व्हायचा बाकी मित्र एका तासात बोर झालं म्हणूनही कन्नडला जाऊन यायची डेअरिंग स्वतःजवळ बाळगून असायचे.

सुरवातीच्या काळात उरसासाठी वडील मला आणि लहान भावाला बहिरगाववरून दुपारी सायकल वर घेऊन यायचे व 3 ते 6 चा शो साईबाबा मध्ये बघितला की 6 ते 8 उरसात आणि मग रात्री परत गावी असा तो प्रोग्राम असायचा. वडिलांसोबतच्या उरसातील सफरीत उरसातील टॉकीजवर सिनेमे बघण्याची मौज अनुभवता येत नव्हती म्हणून थोडे आणखी मोठे होण्याची मनापासून वाट बघत होतो. जसे थोडे मोठे झालो, आम्हाला एकटेच डायरेक्ट उरसातील टॉकीजवर सिनेमे बघायची परवानगी मिळायला लागली आणि तिथून पुढे ही धूम सुरू झाली. जिवलग मित्र पक्या दापके, बाळ्या जाधव, संदिप्या जाधव, आणि परत्या भकड्या यांच्यासोबत पिंजऱ्यातून सुटल्यासारखा मी कन्नडच्या उरसाच्या दिशेने भन्नाट वेगाने निघायचो. वेगात वीर दौडले आम्ही 4 ते 5.

मजा होती, तुफान असा आनंद होता, साधने कमी होती पण आनंदाला पारावार नव्हता ...! 

हे सगळं आठवण्याचा कारण हे की 5 वर्षाची माझ्या मुलीने वरूण धवनचा कुलि नंबर वन मागच्या आठवड्यात (चुकून) पहिला आणि तेंव्हापासून ती दिवसातून दोन तीन वेळा पाहतेय, बर तिला त्यातील प्रत्येक सीन, डायलॉग यांचं भयंकर आकर्षण निर्माण झालेलं आम्ही सगळेच बघतोय. अतिशय कुतूहल आणि कौतुकाने जेंव्हा ती त्यातील सर्व सीन पुन्हा पुन्हा बघतेय तेंव्हा माझ्या आई आणि बायको दोघींना याचे मोठे कौतुक आणि कोडे पडलेय की अचानक कार्टून पाहणारी मुलगी एकदम कुलि नंबर वन हा सिनेमा इतका कसा एन्जॉय करतेय ते..

आता त्यांना काय सांगू वळणाच्या पाण्याबद्दल..!


.............….................
सचिन दाभाडे


3 comments:

  1. Superb Sir... great memories and transfer of genes...

    ReplyDelete
  2. कन्नडीगांची भंन्नाट वाणी त्यांच्या करणीहून थोर

    ReplyDelete
  3. Tu tar dhamal aahes gadyaa...
    I wish me hi mulga asle aste mhanje tujhya veer mandalit mehi aste coolie no1 pahayala...I missed it...!😉...

    ReplyDelete