पुस्तक एकदा वाचल्यावर ते पूर्ण लक्षात राहते हे बऱ्याच व्यक्तीबद्दल किंवा अभ्यासकांबद्दल आपण ऐकतो किंवा ऐकलेले असते. हे दुसरं तिसरं काही नसून पुस्तक लिहित असतांना लेखकाने कुठला विचार आधारासाठी योजला आहे ते लक्षात येणे होय. कुठलेही पुस्तक तुम्ही हातात घ्या त्यामध्ये लेखकाचा काही हेतू असतो. थोडं वैज्ञानिक पद्धतीत सांगायचं झालंच तर 'गृहीतक' असते. हे गृहीतक किंवा विचार व्यक्त करण्यासाठी पुस्तकांमध्ये वेगवेगळी उदाहरणें, दृष्टांत, सिद्धांत सांगितलेली असतात. पुस्तकातील कथानक त्यातील पात्रे, मांडलेले विचार हे सगळे लेखकाच्या हेतू भोवती फिरत असतात. तो हेतू वाचन करत असतांना वाचकाला जसा जसा समजायला लागतो, तशी तशी पुस्तकातील मांडणी आपल्या स्मरणात अधिक पक्की होते. कधी कधी तर सुरवातीचे काही पाने वाचल्यावरच पुढे काय लिहले असेल याचा अंदाज येऊन जातो.
एकदा मुख्य विचार समजला की पुस्तकातील बाकी शब्दरचना त्या विचारासाठीच योजलेल्या आहेत हे ओघाने समजायला लागते, त्यामुळे पुस्तक वाचनाचा वेग आणि स्मरणक्षमता दोन्ही वाढतात. बऱ्याच वाचकांना शेवटपर्यंत पुस्तकातील मूळ विचार किंवा हेतू हे शेवटपर्यंत समजत नाही, त्यामुळे त्याला पुस्तकातील सगळे संदर्भ वेगवेगळ्या पातळीवर लक्षात ठेवावे लागतात जे समजायला व लक्षात ठेवायला अडचणीचे असते.
वेगवेगळ्या क्षेत्रातील चौफेर वाचनातून हेतू समजण्याची आपली क्षमता ही विस्तारत जात असते, अर्थात ही हळू हळू होणारी आणि सूक्ष्म प्रक्रिया आहे. तिला वाचनातून सतत बळ देत राहिलं पाहिजे, म्हणजे पुस्तकं वाचल्यावर लक्षात राहायला लागतात व त्यांचा आयुष्यात योग्य ठिकाणी उपयोग व्हायला लागतो.
........
सचिन दाभाडे
No comments:
Post a Comment