Thursday, October 8, 2020

बॉईलिंग फ्रॉग ते स्वयंनेतृत्व..!



आपल्या संस्थेला, कंपनीला, कुटुंबाला, सहकाऱ्याला, आपल्या टीमला आणि स्वतःला एखाद्या अनप्रोडक्टिव्ह(अनुत्पादक) प्रोजेक्टमधून किंवा शक्य नसलेल्या मार्गावरून योग्य वेळी बाहेर काढायला तुम्हाला न जमणे किंवा ही योग्य वेळ ओळखता न येणे, हे स्वतःचा आणि तुमच्यातील नेतृत्व करण्याच्या क्षमतेच्या ऱ्हासाचे द्योतक आहे. आपण चुकीच्या फॉरमॅट मध्ये काम करतोय आणि नकळत त्यात आपण ट्रॅप होत जातोय हे समजायला बऱ्याचदा वेळ निघून जातो आणि जेंव्हा कळते की जे काही आपण केले ते अनुपयुक्त होते तेंव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड सुरू होते. आपण आपल्या स्वतःला, टीमला, संस्थेला, कंपनीला वाचवण्याची धडपड सुरू करतो  पण असंख्य वेळेला ही धडपड व्यर्थ ठरते कारण त्यातून बाहेर पडण्यासाठी जे धैर्य, हिंमत, प्रेरणा लागणार असते ती सर्व धडपड सध्या तुम्ही असलेल्या सिस्टीममध्ये आणि त्यामध्ये सुरक्षित राहण्यासाठी झिजवलेली असते. अशा वेळेला असह्यपणे जे होईल ते स्वतःसोबत होऊ देण्याची वेळ स्वतःवर येऊ देणे हेच बऱ्याच जणांना आयुष्याची आणि आपल्यात असलेल्या गुणांची फलश्रुती वाटायला लागते. 

हे असे खरेच आपल्या सोबत होते का ? यावर बिहेवीरिष्ठांनी (माणसाच्या वागणुकीवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ) अनेक संशोधने केली, अनेक प्रयोग केले, त्यापैकी Heinzmann या शास्त्रज्ञाने बेडकावर केलेल्या प्रयोग भन्नाट आहे. बेडूक हा थंड पाण्यात राहणारा प्राणी आहे, त्याला जर एकदम उष्ण पाण्यात टाकले तर तो त्यातून उडी मरेल किंवा त्यापासून दूर पळेल. पण पाणी हळू हळू उष्ण केल्यास तो तसे करेल का? तर उत्तर असे, एका जिवंत बेडकाला छोट्या पात्रात टाकले. त्यात पात्र पूर्ण भरून पाणी टाकले. त्या पात्रात तो बेडूक छान पैकी तरंगू लागला, पात्र मोठे नसल्याने त्याला हवं तेंव्हा तो त्यातून बाहेर उडी मारू शकेल असे. थोड्या वेळाने ते पात्र गॅस वर ठेवले जाते. सुरुवातीला पाणी कोमट होते. या बदलासोबत बेडूक समायोजन करून घेतो आणि पत्रात तसेच फिरत राहतो. दुसऱ्या फेजमधे काही वेळाने पाणी गरम व्हायला सुरुवात होते या छोट्या बदलात जरी बेडूक गोंधळून जातो, तरीही तो स्वतःच्या शरीराचे तापमान नियोजित करून परिस्थितीशी जुळवून घेतो. आता तिसऱ्या फेज मध्ये पाणी अतिशय कडक होते, ज्यामध्ये बेडकाला राहणे अतिशय कठीण होऊन बसणे सुरू होते. यावेळी बेडूक स्वतःची संपूर्ण ऊर्जा त्या कडक पाण्यापासून स्वतःला कसे जिवंत ठेवता येईल यात घालणे सुरू ठेवतो. शेवटच्या स्टेज मध्ये पाणी उकळणे सुरू होते व त्यात त्याला हालचाल करणेही अशक्य होऊन बसते, परिणामी यात बेडूक मारून पाण्यावर तरंगायला लागतो.

या प्रयोगाच्या शेवटी या अभ्यासकांना असा प्रश्न पडला की तिसऱ्या स्टेजला जेंव्हा पाण्याचे भयंकर चटके बसत असतांना पात्राचा आकार खूप लहान असूनही बेडूक पात्राच्या बाहेर का पडला नाही? जे त्याच्यासाठी अतिशय सोपे होते. याचे उत्तर काही विश्लेषणाअंती त्यांच्या हातात आले ते असे होते; बेडूक तिसऱ्या स्टेजमध्ये येईपर्यंत त्याची सर्व ऊर्जा व इच्छाशक्ती त्या उष्णतेशी समायोजन करण्यात संपलेली असते. बेडकाला पात्रामधून  सुरवातीला बाहेर पडणे हे जरी सोपे वाटत असले तरी त्याला त्याची काही गरज वाटत नाही, हळू हळू तिसऱ्या स्टेज पर्यंत निर्माण होणाऱ्या अड्व्हर्स परिस्थितीशी जुळवून घेणे हेच बेडकांचे प्रमुख ध्येय बनले. जेंव्हा शेवटच्या स्टेज मध्ये पाणी उकळायला लागले तेंव्हा बाहेर पडण्यासाठी उडी मारण्याचे धैर्य, प्रेरणा, आणि ऊर्जा संपलेली असते.

यातून बाहेर आलेले निष्कर्ष आपल्यातील प्रत्येकासाठी महत्वपूर्ण असे आहेत. प्रत्येकामधील इच्छाशक्ती, ऊर्जा, प्रेरणा ही आपल्या क्षमतेशी संबंधित क्षेत्रात योग्य वेळी वापरल्या नाहीत तर त्याचा ऱ्हास होणे वेगाने सुरू राहते. आपल्यामध्ये निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, ऊर्जा आणि धैर्य असेपर्यंत तो निर्णय स्वतःशी संबंधित उद्दिष्टासाठी घेता आला पाहिजे. म्हणून स्वतःतील ऊर्जेचा ऱ्हास होण्याअगोदरच तुम्हाला निर्णय घ्यायचाय, कारण एकदा का पाणी उकळायला लागले, की मग ते तेवढे सोपे नाही..!

टीप- या प्रयोगावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेय आणि त्यातील निष्कर्षाची विविधता ही कालांतराने सिद्धही झालीय. आपण यातून आपल्याला हवी असणारी शिकवण नक्कीच घेऊ शकतो, नाही का ?

सचिन दाभाडे
8390130362
www.sachindabhade.com


No comments:

Post a Comment