Wednesday, October 7, 2020





स्वतःच्या घरापासून दूर कुठे फिरायला गेल्यावर आपल्याला तेथील दृश्य पाहून एकदम अचंबित व्हायला होत आणि थोड्या वेळाने एकदम फ्रेश झाल्यासारखे वाटते, म्हणून लोक फ्रेश होण्यासाठी बऱ्याच दूर दूर जाऊन येतात आणि गेलेही पाहिजे. पण हा अनुभव बऱ्याच जणांना त्यांच्या जवळपास  असलेल्या वातावरणातून येत नाही. याचे कारण काय असेल ?.  

बाहेर गेल्यावर जेंव्हा आपण आपल्या जागेपासून तुटतो आणि नवीन ठिकाणी नवीन गोष्ट पाहतो तेंव्हा पाहण्याची प्रक्रिया ही जास्त फोकस असलेली असते, आपण काहीतरी नवीन पाहतोय अशा भूमिका यामागील कारण असते किंवा तसे गृहीतक घेऊनच आपण घराबाहेर पडलेलो असतो असे म्हणूयात, त्यामुळे जसे तुमचे बाहेरील निसर्गावर लक्ष केंद्रित होते, तेथील झाडं, नद्या, ओढे, बाजरी ज्वारीची शेतं, टेकड्या, डोंगरे, पायवाटा यांना तुम्ही नवीन म्हणून "पाहायला" लागतात आणि ते पाहण्याची प्रक्रिया सुरू होताच, तुमचे तुमच्या आयुषयातील मनस्ताप, वैताग, गोंधळापासून आपसूकच डिस्कनेक्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे जितका जास्त वेळ ते आपण पाहतो, तितका जास्त वेळ आपण या सगळ्यांपासून डिस्कनेक्ट असतो. ज्याक्षणी तुम्ही डिस्कनेक्ट झाला तुमच्या मेंदूमध्ये कार्यरत असणाऱ्या या मोठ्या ओझ्यावरून तुमचें लक्ष हटते आणि ते ओझे त्या वेळेसाठी किंवा क्षणासाठी नामशेष होते आणि तुम्हाला हलक हलक वाटायला लागते आणि आपण ताजेपणाची, जिवंतपणाची अनुभूती करायला लागतो.

ही अनुभूती खूप दूर जाऊन वरील सगळं पाहण्यानेच येईल असे काही नाही. आपल्या आजूबाजूच्या झाडांकडे, घराच्या बाजूला असलेल्या शेताकडे आणि त्यापलीकडे उभ्या असणाऱ्या झाडाकडे त्याखाली असलेल्या झोपडीकडे शांत चित्ताने पहा, घराच्या गच्चीवर जाऊन सूर्योदय आणि सूर्यास्त शांततेने पहा, त्यातील रंग छटा कधीच रोज असतात तशा नसणार, काहीतरी बदललेले असेल, ते डोळ्याने टिपता आले तर नक्की ठरवून टिपा. निसर्ग सगळीकडे सारखाच आनंद देणारा, उल्हासीत करणारा आहे. अगदी वाळवंट सुद्धा निसर्ग आहे आणि तोही बघायला लोक जातात, त्यामुळे तो बघितल्याने आनंद होतो हे जेवढे सत्य, तेवढेच सत्य हे की; आपण वेगळं काही बघतो आहे हा भावच आपल्याला त्यावर फोकस करतो आणि आपण डोक्यात असणाऱ्या नेहमीच्या ओझ्यापासून डिस्कनेक्ट होतो, त्यामुळे त्रास देणाऱ्या, नकारात्मकता निर्माण करणाऱ्या, अस्वस्थ आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या भावनेपासून आपसूक होणारे हे डिस्कनेक्शन मन हलक करणारे, आनंद देणारे आहे. त्यासाठी फार वेगळा इफर्ट घ्यावा लागत नाही.

सचिन दाभाडे
8390130362
www.sachindabhade.com

No comments:

Post a Comment