Tuesday, March 31, 2020

हे युद्ध आहे विरुद्ध..!



आपल्याला  घरात थांबण्याचे एवढे टेंशन का येतेय माहितीय का ?, म्हणजे नेमके काय आहे जे तुम्हाला सतत बाहेर जाण्यास बाध्य करतंय.  शासनाने  एवढे कडक आदेश देऊनही आपल्यापैकी बरीच जनता घरात थांबायला अगदी झुगारूनच देतेय. याच कारण शोधतांना एक महत्वपूर्ण बाबीचा आधार घेऊया, म्हणजे हा घोळ लक्षात यायला मदत होईल.स्टॅंडफोर्ड युनिव्हर्सिटीमधील विद्वान मानसशास्त्रज्ञ वॉल्टर मिशेल ने १९७२ च्या सुमारास एक महत्वपूर्ण संशोधन केले. त्याच्या संशोधनाचा आधार होता की माणसे गोंधळाच्या क्षणात एवढी अगतिक का होतात. कुठली लोक आहेत जी गोंधळात ही  स्वतःला थांबवून असतात पूर्वीपासून दिलेल्या धोरणानुसारच काम करत असतात. वॉल्टर मिशेलने या गोष्टीचे उत्तर शोधण्यासाठी व्यतीच्या विकास प्रकियेच्या खूप मागपर्यंत जाण्याचे ठरवले.मागपर्यंत म्हणजे कुठपर्यंत. अगदी जेंव्हा ते लहान बालक असतात ना, तिथपर्यंत. त्याने काही लहान मुलांवर संशोधन केले. एका खोलीमध्ये काही लहान मुलांना बसायला लावले या मुलांना त्याने एक छोटा मार्शमेलो (ही एक प्रकारची मिठाई आहे) दिला आणि सांगितले, तुम्ही हा मार्शमेलो खाऊ शकता पण, हो; आणखी एक महत्वाची बाब तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आणखी १५ min थांबला आणि हा मार्शमेलो खाल्ला नाही तर मी तुम्हाला दोन मोठे मार्शमेलो देईल. आणि तो त्या खोलीबाहेर निघून गेला. या खोलीमध्ये कॅमेरे लावलेली असल्यामुळे आतमध्ये चालणाऱ्या मुलांच्या हरकती बारकाईने नोद केल्या जात होत्या.

१५ मिनिटानंतर जेंव्हा तो रूम मध्ये परत आला तेंव्हा त्याला असे आढळून आले की बऱ्याच मुलांनी त्या मार्शमेलोला अर्धे खाल्ले होते, काहींनी त्याला पूर्ण खाऊन टाकले होते, तर काही मुलांनी त्याला चाटून चाटून पार ओले करून टाकले होते पण खाल्ले नव्हते (म्हणजे या मुलांना वाटत होते कि जीभ लावणे म्हणजे खाणे नाही). फक्त काही अशी मोजकीच मुले होती जी १५ मिनिट त्याकडे सतत बघत होती, पण त्यांनी त्याला खाल्ले नाही आणि हात ही लावला नाही. नियमाप्रमाणे ज्यांनी त्याला खालले नाही अशा सर्वाना दोन मोठे मार्शमेलो दिल्या गेले. हे तीनही मार्शमेलो त्यांनी एका शांत ठिकाणी बसून खाल्ले. वॉल्टर मिशेलने या मार्शमेलो प्रयोगावरून वरून काही महत्वाचे निष्कर्ष काढले जे आपल्या  प्रत्येकासाठी आयुष्यातील निर्णायकी  घटनांतील महत्वाच्या क्षणांचे विश्लेषण करायला उपयुक्त ठरेल . जी मुले या रूम मध्ये बंद होती त्यांच्यावर ते १० वर्षाच्याअंतराने सातत्यपूर्ण नजर ठेवण्यात आली. ज्यातून या मुलांच्या विकासाबाबत काही नोंदही केल्या गेल्या, ज्या प्रत्येक व्यक्तीच्या ऍडव्हर्स कंडिशनमध्ये व्यक्त होण्याच्या त्यातून मोठ्या उद्दिष्टासाठी स्वतःला होल्ड करण्याच्या काही महत्वपूर्ण बाबींकडे निर्देश करते.
        
ज्या मुलांनी मार्शमेलोची चव घेतली अशी मुले शालेय जीवनात महाविद्यालयीन जीवनात कौटुंबिक जीवनात गोंधळलेली, जे हवं त्याच्या पाठीमागे काही विचार करता पटकन पळणारी. आणी साधारण ध्येय निवडून धोका नसलेली आयुष्य जगतांना दिसून आली. या उलट ज्या मुलांनी दिलेल्या वेळेत स्वतःला होल्ड करून दोन मार्शमेलो मिळवले ती मुले मात्र शालेय जीवनात महाविद्यालयीन जीवनात जास्तीत ज्यास्त केंद्रित कौटुंबिक जीवनात संयमित, आणी  आपल्या कुवतीपेक्षाही मोठे ध्येय ठेवून, त्याचा पाठलाग करण्यासाठी नियोजन करतांना  दिसून आली. अर्थात मिशेलने या मुलांचे बऱ्याच पुढपर्यंत अबाझर्वेशन केलेय त्यातून अतिशय भन्नाट अशा नोंदी केल्याय. या सर्व प्रक्रियेला डिलेड ग्रॅटिफिकेशन (Delayed gratification) असे म्हणण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियेत आपल्या समाधानाला जेवढं लांबवता येईल तेवढे लांबवले जाते छोटे छोटे आनंद घेण्याचे टाळून लोक अधिकाधिक मोठा रिझल्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. अशा व्यक्ती आपल्याला हवं असण्याऱ्या गोष्टी मिळाल्या नाही तरी चिडत नाही. त्यांचे प्लॅन जर अनपेक्षितरित्या बदलले तर ती तक्रार करत नाही. कुठलीही मजा मस्ती करण्यापूर्वी ही लोक आपली ठरवलेली कामेच आधी करतांना दिसून येतात.

या संदर्भाने जेंव्हा आपण आजची परिस्थिती समजून घेतो, आपल्याला जेंव्हा एका जागेवर बसायला सांगितले जात असते, तेंव्हा आपणच ठरवलेल्या गोष्टीच्या विरोधात आपल्याला वर्तन करायचे असते. जे स्वतःच्या सहनशक्तींसमोरील सगळ्यात मोठे आव्हान असते. आपल्याला येणाऱ्या महिन्यात भेटायच्या  असलेल्या महत्वपूर्ण व्यक्ती, त्यांच्याशी करायच्या असलेल्या तडजोडी /करार, महत्वाचे कौटुंबिक समारोह, प्रतिष्ठा वाढवणारे काही महत्वाकांक्षी प्रकल्प, लोक-संस्था यांना  केलेल्या कॅमिटमेन्ट ती पाळायची आपली भावनिक आणि व्यावहारिक गरज हे सगळंच अनपेक्षित रित्या पुढे ढकलले जाणे हे कालौघात तयार झालेल्या महत्वाकांक्षी आणि हट्टी  स्वभावाला एकदम विरोध करणारे असते. त्यामुळे हे सगळं टाळून घरात शांत बसने म्हणजे  गॅस वर  बसल्यासारखाच फील आपल्यापैकी बऱ्याच जणांना येत असेल. काही तरी महत्वपूर्ण हातातून निघून जातंय, आता ते परत मिळणार नाही त्यामुळे काहीतरी हालचाल केलीच पाहिजे असे सतत वाटत असते. काही वेळेला तर उगाच बाहेर फिरून आलंच पाहिजे ही नुसती मानसिक गरज पूर्ण करण्यासाठी बाहेर पडतात. एक लक्षात घावे लागेल कि युद्धच जेंव्हा आपणं स्वतःमध्ये निर्माण केलेल्या गरजां आणि सवयीच्या  विरुद्ध असते तेंव्हा तुमच्या आतील नियमांची पुनर्बांधणीची गरज सर्वोच असते. अशा समयी संयमी लोक विजयाचे शिल्पकार बनून काळाला आकार देऊ शकतात.  बर्याच वेळेला आयुष्यात काही करणे आणि शांत बसून वेळेची वाट पाहणे किंवा वेळ जाऊ देणे हे तुम्हालाच नाही अखिल मानावजातीला संकटातून बाहेर खेचण्यासारखेच असते. पण ज्यांना मार्शमेलो लगेच खायचा असतो त्यांना ते काय गमवणार याची माहिती असते पण जाणीव नसते. अशांच्या आयुष्यातून काहीतरी महत्वपूर्ण असं निघून जाण्याची तयारी करत असते, हेच सत्य.  फक्त ते गेलेय हे कळायला काही दिवस, महिने,  किंवा वर्ष लागतात एवढेच.

नेहमीच्या जगण्यात आपल्या ध्येयामुळे तयार झालेल्या सवयीविरुद्ध आता आपल्याला स्वतःलाच लढायचे आहे. अनेक वर्षांपासून समाधान मिळवण्यासाठी आपण स्वतःमध्ये निर्माण केलेल्या विविध गरजा आणि त्यातून नकळत निर्माण झालेल्या सवयीना अशा परिस्थितीमध्ये थांबवायचे आहे, बऱ्याच जणांना त्या थांबवणे  शक्य होतांना  दिसणार नाही; कारण मग समाधान मिळणे बंद होईल.. ! आणि त्या छोट्या छोट्या समाधानासाठी आपण निसर्गाने दिलेली ही नवीन ऑफर नाकारण्याचीही  शक्यता आहे. ही नवीन ऑफर म्हणजे "एका ठिकाणीच थांबा आणि आतपर्यंत घेत आलेले सर्व फायदे घेणे काही काळासाठी थांबवून नवीन एक्सटेंडेड (वाढीव) आयुष्याचा लाभ घ्या. अन्यथा जसे आहे तसे जगणे चालू ठेवा, नेहमीच्या समाधानासाठी थांबू नका, आणि निसर्गाकडून मिळणारे वाढीव आयुष्य नाकारा.     

आपल्यासमोर निसर्गाने असा पेच उभा केलाय की त्याद्वारे आपल्याला आपल्या आयुष्यात हव्या असणाऱ्या सर्व घटना अनिश्चित काळासाठी अचानक एक अटीवर पुढे ढकलण्यासाठी बाध्य केलेय. आता नेहमीप्रमाणे तुम्ही तुमचे आयुष्य, कृती, घटना चालू ठेवा, तुमच्या सवयीनुसार सगळ्या गोष्टी करा किंवा काही विशिष्ट कालपर्यंत स्वतःला होल्ड करा, स्वतःला थांबवा आणि वाढीव आयुष्याचा, आणि त्याद्वारे येणाऱ्या मोठ्या उद्दिष्ट पाठीमागे धावण्याचा अनुभव घ्या,भविष्यातील वाढीव आनंदासाठी स्वतःला तयार करा.    

तुम्हीच ठरवा मार्शमेलो आता खाता कि थांबून पाहता ...! 

...................................
  
सचिन दाभाडे
मॅनजमेन्ट कॉर्पोरेट कोच

No comments:

Post a Comment