भालचंद्र नेमाडे हे एक सिद्धहस्त लेखक आहेत 2014 मध्ये त्यांच्या हिंदू या महाकादंबरीला साहित्यातील ज्ञानपीठ मिळाला त्याद्वारे या कादंबरीवर बऱ्याच सादक बाधक चर्चाही साहित्य वर्तुळात झाल्या. मागील काही दिवसापूर्वी मी या कादंबरीचे वाचन संपवले. भारतीय साहित्य विश्वातील महत्वपूर्ण मानली जाणारी ही कृती नेमकी कशी आहे याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. त्यांच्यासाठी हिंदू माझ्या नजरेतून...!
खंडेराव हे पात्र नेमाडेंच्या हिंदू या कादंबरीचा- कथेचा नायक, या नायकावर आरूढ होऊन नेमाडे साधारणतः तीनशे वर्षाच्या कलखंडाची जाणीवभान असलेला नायक आपल्यासमोर उभा करतात व त्यांच्याद्वारे चौफेर घोडदौड करतात. ही घोडदौड इतकी व्यापक आणि भीषण आहे की सरळ सरळ आणि सहज बसलेल्या वाचकाला पहिल्या 100 पानातच ग्लानी आल्यासारखं होऊ शकत. या घोदौडीत उडालेला धुरळा वाचताना शेकडो वेळेस तुमचे डोळे चोळायला लावतो.
नायक खंडेराव याचा कालखंड हा 1963 चा आहे कारण याच वेळेला तो हरप्पा मोहनजोदरोच्या उत्खननात आहे आणि येथूनच वडिलांच्या शेवटच्या दर्शनाला गावाकडे येत असतांना प्रवासात खंडेराव आत्ममग्न होतो व त्याच्या नेणिवेत हिंदू कादंबरीचे कथासूत्र आकार घेते. खंडेरावची ही नेणिव एकामागोमाग एक मोठ्या प्रमाणावर व्यक्ती आणि समुदाय यांची एकमेकांमध्ये गुंफल्या गेलेल्या हितसंबंधांचे गट आणि त्यांची यादीच तुमच्या समोर सुरू करते. खंडेरावचे भान घडवणारा त्याचा भोवताल एक साध्या खेड्याचाच वाटणारा, पण आपल्या नकळत हळूहळू तो इतका व्यापक होत जातो की वाचकाला सुरुवातीला हे सर्व पात्र एका माळेत गुंफने अशक्य होऊन जाते, पण हळू हळू जसे तुम्ही कादंबरीमध्ये समायोजित होतात तसे खंडेराव तुम्हाला सर्व नात्यामध्ये आणि त्यांच्या एकमेकांशी असलेल्या संबधांमध्ये अर्थपुर्णता आणून देतो. त्यांचे विविधांगी चरित्र हे भारतीय समाज, धर्म, आणि भूगोल यांच्या संदर्भाने नेमाडे उलगडत नेतात. त्यातील नातेसंबंधातील वीण प्रभावीरित्या समोर आणत असतांना भारताच्या संस्कृतीक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक बाबींचा चर्चात्मक, संवादरूपी आणि गोष्टीस्वरूप आराखडा ते मांडतात.
या सर्व व्यक्तिरेखा व त्यांचे कथेत येणे हळू हळू एकसूत्री आहे याची जाणीव होणे सुरू होते. खंडेरावच्या नेणिवेतील सर्व व्यक्तिरेखा या वरून दिसायला अतिशय सामान्य आहेत, तशा त्या भासतील ही, परंतु त्या व्यापक भारतीय समाजमन तयार करण्याच्या मूलाधार कशा आहेत हे नेमाडे प्रतिपादित करतात व सूक्ष्मपणे पुढे सरकतात. यासर्व गोंधळात आपल्याला वाचक म्हणून खंडेरावचा हात घट्ट धरून ठेवायचाय अन्यथा निसटून तापीमध्ये आपली जलसमाधी ठरलेली.
ज्या विशिष्ट पद्धतीने कथेतील पात्र एकमेकांशी नातेसंबंधांच्या, धर्माच्या, आणि अर्थकारणाच्या परिप्रेक्षात जोडल्या गेलेय त्या मधील डोकं चक्रावून सोडणारी क्लीष्टता, आणि अंतर्विरोध नेमाडे इतक्या लक्खपणे दाखवतात की क्षणभर एक वाचक म्हणून गोंधळल्यासारखं होते. नातेसंबंध, त्यातील स्थियांची अवघडलेली स्थिती, कमकुवत पुरुषीपणा, जातीमधील तानेबाने, भौगोलिक अपरिहार्यता आणि त्यांचा संस्कृतीक व सामाजिक जडणघडणीवर होणार परिणाम. कला, साहित्य आणि राजकारणावरील एक अमूर्त आणि बेगडी असलेली घडी आणि तिचे संरचनात्मक प्रकटीकरण यावर बेमालूमपणे भाष्य हे मला हिंदू या कथेचे मूलभूत वैशिष्ट आहे असे वाटते.
मानवाच्या मूलभूत प्रवृत्ती मोहोंजोदरोच्या काळापासून होत्या असे म्हणतांना नेमाडे या प्रवृत्तीचे मूळ आपल्याला सध्या माहीत असलेल्या मानवाच्या ज्ञात व सगळ्यात जुन्या इतिहासापर्यंत घेऊन जाता येऊ शकते आणि ते म्हणजे मोहोजोदरो आहे आणि इथपर्यंत ते जाऊ शकत अथवा ते जाते असे ते प्रतिपादन करतात. उपयोगीतेपासून सुरू झालेल्या व्यवस्था कशा नकारात्मक आणि बोजड होत गेल्या, रूढी परंपरांचे अवडंबर कसे उभे राहिले. यातच व्यक्ती आणि समूह शोषनाचे संदर्भ उभे राहिले, हे सांगण्याचा प्रयत्न खंडेराव करतो आणि सोबतच त्याची महानपणाच्या ओझ्याखालची अगतिकता ही सर्वव्यापी आहे. ती अगतिकता तुम्हाला निरुत्तर करता करता प्रश्नांना नवीन प्रकारे उत्तर शोधण्याचा दिलेला सल्ला आहे की काय असे वाटून जाते.
नेमाडे सांगतात खंडेरावच्या कुटुंबातील नागोराव हा मूळ पुरुष जो पेशवाईच्या काळातील आहे आणि त्याच्यानंतर खंडेराव 8व्या पिढीत जन्माला आलेला वारसदार. तेंव्हाच्या काळातील राजवटी ज्या आता आपल्यासाठी गौरावांवीत करणाऱ्या जरी असल्या तरी या राजवटी आणि त्यांचे राजवैभव, तत्कालीन सर्वसामान्य समाजाचा त्या राजवटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, यातील गुंतागुंत नेमाडे बेमालूमपणे एक सिद्धहस्त साहित्यिकाला साजेसं मांडत पुढे पुढे जातात आणि हळू हळू त्याला अधिकच धार देतात. खंडेरावच्या अर्ध्या कथाकथानपर्यंत तो निष्क्रिय बनून फक्त व्यवस्थेचं वर्णन करत राहतो, पण अर्ध्या कथेनंतर मात्र खंडेराव आपला म्हणणं (जे स्वागताच्या स्वरूपात येत राहते) मांडायला लागतो आणि उत्तरार्धात त्याच्या म्हणण्याला धार यायला लागते. सुरवातीच्या ज्या बोथट धारेवर हात फिरवताना आपल्याला फारसे काही काळत नाही नंतर त्याच धारेने आपल्या एकूण आकलनाची खरडपट्टी सुरू होते.
नेमाडेंची ही धुलाई अभासपूर्ण, निखळ, भेदक, वादातीत, रंजक आहे. रंजक यासाठी कारण त्यांनी ग्रामीण भागातील मूळ आकृतिबंधात घडणाऱ्या कथा, त्यांची वर्णने, आणि विरोधाभासातून निर्माण होणारे विनोद यांची अशी काही सांगड घातलीय की कडूगोड औषधाची गोळी खातांना एखाद्या बालकाला ही नेमकी कडू आहे की गोड हे सिद्धच करता येऊ नये. आणि याच गोंधळात खंडेरावच्या तोंडून नेमाडे आपले वादातीत इंजेक्शन देऊन टाकतात. आपला से उभा करतात. यात काही अभ्यासकांना नेमाडेंचे विनोद बाष्कळ वाटू शकतात.!
नेमाडे मोरगाव या खेड्याला एकक मानून सांगू पाहतात की मूळ भारतीय असलेली ओळख जी आपल्याला खरे धार्मिक आणि अध्यात्मिक स्वातंत्र्य बहाल करू शकली असती ती व्यवस्थाच मुळात नको नको त्या भिकार आणि फोल कल्पनेत अडकून पडलीय. याचाच परिणाम म्हणून एखादं वासरू गिळून पडलेल्या अजगरासारखी आपली स्थिती झालीय. पण सोबतच तत्कालीन व्यवहार्यतेवर उभे राहताना या सर्व अंतरसंबंधानी भारतीय समाजाचे भान आणि मानस घडवलेय. हे नेमाडेंच्या मांडणीतून आणि संदर्भाच्या बरकाव्यातून येत राहते त्यासाठी ते खंडेरावच्या नेणिवेतून पाश्चिमात्य मानवंशशास्त्रज्ञ, साहित्यिक यांचे संदर्भ घेत जातात. नेमके इथेच नेमाडे कथा कथन करता करता समीक्षण करताय की काय असे वाटायला लागते आणि आपण मूळ कथा सुत्रपासून दूर जाऊ लागलोय असे वाटायला लागते, पण खंडेरावच्या अस्वस्थ आणि गोंधळून टाकणाऱ्या स्वागतत त्या समीक्षणाची परिणीती होते आणि वाचक म्हणून आपला जीव भांड्यात पडतो.
नायकाच्या सिंधू संस्कृतीच्या उत्खनना पासून ते सुरू करताय म्हणून बर्याच्या जणांना हे वाटू शकते की ते नायकाच्या मनातीलअखिल सिंधू ते कन्याकुमारी असा हिंदुस्थानचे प्रतिपादन करताय, पण तो समाज होणे अपूर्ण म्हणूनच चूक आहे. सिंधू संस्कृतीशी आपले नाते सांगताना खंडेराव हे सांगत आहे की सर्व संस्कृत्या या या सुरवातीला मानवाच्या मूळ गरजांच्या आणि सुरक्षिततेच्या पूर्ती करतांना आकार घेत राहिलाय आणि त्यांचे प्रत्येकाचे काही विशिष्ट बाबतीत एकमेकांशी संबंध होते. म्हणून त्यावर स्थल काल याचौकटीत आपला अधिकार प्रतिपादन करणे अव्यवहार्य आहे.
पण याउलट म्हणून ती संस्कृती आणि तो प्रदेश यावर आपला मालकी हक्क प्रस्थापित करणार्यांना असे वाटू शकते की नायक सिंधू पर्यंत जाऊन आपली मूळ शोधतोय परिणामी भारताची मूळ तिथपर्यंत नेण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे, जे की तसे नाही.
सहजत्यिकांनी ज्ञान देण्याचा अट्टाहास न करता त्यांचा वर्तमान, त्यांच्या भोवताल नीट ओळखून अविचल आशा जाणिवेतून मांडावा. जर तसे झाले तरच त्यांचे साहित्य हे वैश्विक होईल. ते वैश्विक होण्यासाठी वैश्विक उदाहरणे आणि कल्पना मांडण्याची गरज नाही, तसे करतांना त्यांच्या साहित्याचे हसेच होणार. आपल्या मांडणीला वैश्विक बनवतांना तिच्यातील कस हाच तिच्यातील समकालीनता आहे. त्यांचे समकालीनत्व या मधेच वैश्विक तत्व लपलेले असते फक्त ते समजून घेण्यासाठी तशा जणीवेची गरज साहित्यिकाला असते, ती झाली की त्याला आपली आपल्या भोवतालामध्येच महान साहित्याची बीजे सापडू शकतात. नेमाडे आपला भोवताल आणि परिणामी त्यात घडून गेलेला घटनांचा क्रम हाच वैशिक आहे असे गृहितक धरून लिहिताय असे वाटते आणि त्यातूनच आपल्या साहित्याला 'हिंदूला' वैश्विक पातळीवर नेण्याची त्यांची धडपड आहे.
ही कादंबरी तुमच्यावर प्रेम करते म्हणून तुमचा जोरदार तिरस्कार करतांना ही दिसेल ती तुम्हाला लाथाडते, तिच्यापासून दूर लोटते, तुमच्या जोरदार कानफटात मारून तुमची लाज काढते. गोड बोलत असल्याचा भास करून देत असतांना मधेच कडू घास भरवते तेही नाक दाबूनच. तुम्हाला मात्र वाचक म्हणून दीर्घ श्वास घेऊन तिच्या जवळ जावे लागते. तिला पुन्हा पुन्हा समजावून सांग म्हणून मनवावे लागते. ही कादंबरी हळू हळू जवळ येते पण ही भीती मनाला देऊनच की मी कधीही कुठल्याही वळणावर तुझ्या कमरेची दोरी सैल करेल...सावध..! शेवटी ज्याच्यात संयम आणी पकड तोच तिला संपवतो आणि तिच्यातच संपतोही
......................................
सचिन दाभाडे
व्वा सचिन मस्त लिहीलय अप्रतीम निखळ मांडणी.
ReplyDelete