Sunday, January 5, 2020

'समस्येतील शक्यता'


आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या कुठल्याही घटनांकडे गांभीर्याने बघायचे म्हंटले तर त्याच्या अनेक बाजू आहे हे गृहीत धारल्याशिवाय बघितले तर घटनांचे अर्थ लावण्यात अनेक चुका होऊ शकतात. आपली कुठल्याही घटनांचा अर्थ लावण्याची प्रक्रिया ही भविष्यवेधी असायला हवी.म्हणजे भविष्यात आपल्याला कुठल्या प्रकारे रिझल्ट हवेय यानुसार घटनांचे अर्थ लावण्याची शैली विकसित करणे गरजेचे आहे. अर्थात हे अगदीच होत नाही असेही नाही. बऱ्याच शैक्षणिक संस्था आणि उद्योगधंद्यात या पद्धतीने समस्यांशी सामना केला जातो. परंतु हजारो वर्षांपासून चालत आलेली 'ट्रॅडिशनल थिंकिंगची' पद्धत आपल्या विचारातून अनेक घटनातून डोकावत असते. कुठल्याही गोष्टीबद्दल ट्रॅडिशनल विचार करताना मग ती व्यक्ती असो, घटना असो किंवा समस्या असो आपण त्यांना काही ठोकताळ्यातून किंवा काही विशिष्ट अश्या पद्धतीतून पाहत असतो. त्यामुळे त्या गोष्टींबद्दलचे आपले ज्ञान हे मर्यादितच राहते आणि याचा परिणाम म्हणून त्यामधून निर्माण होणाऱ्या कृती याही मर्यादित प्रभाव निर्माण करणाऱ्यांच असतात.

ट्रॅडिशनल विचार करण्याच्या पद्धतीमध्ये वाद विवाद आणि युक्तिवादाला(आरगुमेंट) महत्व दिलेले असते. ज्याचा युक्तिवाद बिनतोड तो साधारणतः योग्य असा समज या विचार करण्याच्या पद्धतीत आहे. यामध्ये समोर विचार मांडणारा, जर तो तुमच्या विचारांपेक्षा वेगळा विचार मांडत असेल, तर तो तुमच्या विरोधी आहे किंवा प्रतिस्पर्धीच आहे, असे समजून युक्तिवाद केला जातो. सॉक्रेटिस या पद्धतीला अर्थ देत असतांना म्हणायचा की, एखादी गोष्ट घटना समजून घ्यायची असेल तर तिच्यात काय चुकीचे आहे हे शोधा म्हणजे त्यातील बरोबर असलेले हळू हळू तुमच्या हातात येईल. परंतु प्लेटोने विचार करण्याच्या या पद्धतीवर काही पावले वेगळी टाकत सांगितले की, आयुष्य जगात असताना ज्या घटना, लोक आणि व्यक्ती आपल्या समोर येतात यातील सत्य आपल्याला सापडत नाही तर जे काही आपल्याला समजते ते फक्त सत्याची एक सावली असते. याच्याही पुढे जाऊन अरिस्टटल समस्येचे निराकारण करतांना अधिक वैज्ञानिक व्हायचा प्रयत्न करतो. त्याने व्यक्तींचे अनुभव आणि अनुभवातून येणारे ज्ञान याला महत्वाचे स्थान दिले. तो म्हणतो आपल्याला वेगवेगळ्या घटनांच्या निरीक्षणातून जे समजते त्यानुसार आपल्या मेंदुत कप्पे (boxes) बनवले जातात आणि त्या कप्यांच्याद्वारेच आपण प्रत्येक घटना, व्यक्ती यांचे विश्लेषण करत असतो. विचार करणारी किंवा घटनांची विश्लेषण करणारी ही पद्धत पारंपरिक असल्यामुळे ती आजच्या काळात वापरतांना अनेक ठिकाणी मर्यादित दृष्टिकोन निर्माण करून देण्यास कारणीभूत ठरते. या विचाराच्या प्रक्रियेमध्ये 'काय आहे' हे ठरवल्या जाते व 'काय असायला हवे' हे ठरवणे हा ट्रॅडिशनल थिंकिंग या पद्धतीचा उद्देश  नाही. 'काय आहे' ते ठरवत असतांना विश्लेषण, निर्णय आणि युक्तिवाद या आधारावर हे सर्व ठरवल्या जाते.

या मध्ये कृती, घटना या कडे पाहण्याचा कुठलाही विधायक (Constructive), सर्जनशील (Creative) उद्देश नसतो. हा उद्देश नसल्याने घटनेची किंवा समस्येची अपूर्ण किंवा चुकीची जाणीव, विचार निर्माण होतो. ही विचार पद्धती सहयोगाला आणि एकमेकांशी सहकार करण्यास अनुकूल नसल्यामुळे ती पद्धत 'खरं काय' आहे हे शोधत असताना, कळत नकळत संघर्षाशी बीजे रोवत असते. एकूण काय तर एकाच वेळेला एखाद्या समस्येबद्दल अनेक शक्यतांचा विचार या ट्रॅडिशनल थिंकिंग म्हणजेच पारंपारिक विचार पद्धतीत नाही. म्हणून या पद्धतीला आजच्या काळात अनेक मर्यादा निर्माण झाल्याय. 

या अडचणीतून बाहेर पाडण्यासाठी एडवर्ड डेबोनो ने सांगितलेली लॅटरल थिंकिंग पद्धती आजच्या अतिशय डायनॅमिक अशा वातावरणामध्ये आशेचा मार्ग आहे.एडवर्ड डेबोनोने निर्मिलेल्या या लॅटरल थिंकिंगचीच पुढे प्यारलाल थिंकिंग (Parallel thinking) झाली. या पद्धतीने विचार करतांना एकाच समस्येकडे सर्व टीमने किंवा व्यक्तीने ठरवून एकाच दिशेने (direction) विचार करायचा व विचारपूर्वक तिचे विश्लेषण करायचे, नंतर दिशा बदलून सगळ्यांनी पुन्हा नवीन शक्यतेचा विचार करायचा व पुन्हा त्या पद्धतीनेही तिचे जाणीवपूर्वक विस्तारित विश्लेषण करायचे. अश्या प्रकारे विश्लेषण करण्यासाठी सहा प्रकारचे direction डेबोनो आपल्याला देतो. या सहा प्रकारच्या directions ला तो 'सिक्स थिंकिंग हॅट' म्हणतो. या पध्दतीमध्ये समस्येचा पूर्ण शोध घेतला जातो आणि हा शोध घेण्यासाठी सहा वेगवेगळे दृष्टिकोन वापरले जातात.  एका वेळेला एक दृष्टिकोन घेऊन त्यातून समस्येचे  विश्लेषण केले जाते नंतर पुन्हा दुसरा दृष्टिकोन घेऊन पूर्णपणे विश्लेषण केले जाते.अश्या प्रकारे त्याने सांगितलेल्या सहा दृहतिकोणातून समस्येचे विश्लेषण केले जाते.(प्रत्येक समस्येचे विश्लेषण करताना व त्यातून मार्ग काढताना सहाही दृष्टिकोन एकाच वेळेला वापरलेच पाहिजे असे नाही) हे दृष्टिकोन म्हणजे त्याने सांगितलेल्या या सहा विचारांच्या सहा टोप्या (six thinking hat). विश्लेषण करणारा टीमचा प्रमुख एका विशिष्ट समस्येची उकल करतांना आपल्याला कुठल्या कुठल्या थिंकिंग हॅट वापरून विश्लेषण करायचे हे ठरवतो. टीम प्रमुखाच्या हॅटचा रंग हा निळा आहे. सुरुवात ही निळ्या रंगाने होणार आणि त्याचा समारोप ही निळ्या रंगाच्या विश्लेषणाच्या दिशेने होणार.  या थिंकिंग हॅट मध्ये निळा, पांढरा,पिवळा, काळा, हिरवा, लाल या रंगाच्या सहा हॅट आहेत व प्रत्येक रंगाची टोपी ही समस्येचे विश्लेषण करण्याची विशिष्ट पद्धत आपल्याला सांगत असते (ही पूर्ण पद्धत डिटेल मध्ये समजून घेण्यासाठी एडवर्ड डेबोनोचे 1985 मध्ये प्रकाशित सिक्स थिंकिंग हॅट हे वाचावे)

शिक्षण क्षेत्रात, कन्सल्टेशन मध्ये, ब्रँडिंग, मार्केटिंग अॅडव्हरटायझिंग या क्षेत्रामध्ये तसेच सर्जनशील कुठल्याही  क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी एडवर्ड देबोनोची parallel thinking ही मैलाचा दगड आहे. आजघडीच्या वाढलेल्या स्पर्धेत, स्थित्यंतराच्या या महत्वपूर्ण कालखंडात  कौटुंबिक   वातावरण, उद्योगाच्या ठिकाणी वेगवेगळ्या समस्येचे निराकरण, सामाजिक वातावरण शांत राहावे म्हणून ही विचारपद्धत खुप गरजेची आहे. महत्वाच्या ठिकाणी असलेल्या व्यक्तींनी संयमाने याचा वापर घडवून आणला तर बऱ्याच नवीन गोष्टी हाताला लागतील आणि नवीन मार्ग सापडतील एवढं नक्की.

…..…......................

सचिन दाभाडे
मॅनेजमेंट कॉर्पोरेट कोच

No comments:

Post a Comment