Tuesday, August 1, 2017

"आनंदनगरी"



काल आपल्या मुलीसोबत आनंदनगरीला गेलो होतो. एका दुकानासमोर मुलगी थांबली आणि दुकानातील खेळणी न्याहाळू लागली. ती बघत होती  म्हणून मी हि जरा इंटरेस्ट घेऊन बघायला लागलो सगळ्या खेळण्या मस्तच .. समोरच्या रॅकमध्ये हवा भरलेल्या रबराच्या बाहुल्या मांडून ठेवलेल्या. त्या अतिशय सुंदर, वेगवेगळ्या रंगच्या, आकाराच्या अगदी फुग्यासारख्याच. त्याना कितीही लोटले किंवा खाली पाडायचा प्रयत्न केल्यास त्या खालीतर जातात पण पुन्हा जसेच्या तसे उभ्या राहतात. त्याच्या तळाशी काहीतरी वजनदार असल्याने सगळी गंमत  होत असावी बहुदा.

काही कोपऱ्यातल्या रकान्यात चाविच्या गाड्याही होत्या, त्यांना चावी दिली की त्या काही अंतर वेगाने जातात आणि मग मध्येच थांबतात, त्यांना पुन्हा चालताना पहायच असल्यास पुन्हा आपल्याला त्यांच्या पर्यंत जावे लगते आणि पुन्हा चावी द्यावी लगते.

अतिशय आकर्षक आणि वेगवेगळ्या रंगाच्या शिट्या ही आडव्या दोरीला लटकवलेल्या होत्या, त्यांच्यात जेवढा वेळ हवा फुंकत रहा तेवढा वेळ वाजत राहणार, हवा फूंकने बंद..  वाजने बंद. यात काही पिपाण्या होत्या, काही बासरया, काही पेट्या तर काही भोंगेही आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे पियानो आलेले आहे, यात गाणे सेट केले कि फार डोके लावायची गरज नाही, प्रत्येकचे वेगवेगळे वैशिष्ट्ये.

काही शोभेची फुले ही अतिशय छान मांडून ठेवली होती यांचा सुगंध येत नाही, पण यांची नष्ट व्हायची भीतिही नसते, ही दिसायला खुप सुंदर होती आणि नेहमी तशीच सुंदर राहु शकत होती. काही रबरचे बॉल होते, त्यांना जेवढे जोरात जमिनीवर अदळले तेवढ जोरात ते उसळी मारुन वर येत होते.

माझी मुलगी हे सर्व सुंदर खेळणे बघून आनंदी ही झाली आणि गोंधळूनही गेली. शेवटी मलाच विचारले, मी यातील कुठली खेळणी घेऊ..सगळ्याच कश्या आकर्षक वाटताय, मी थोड़ कन्फ्यूज झालो. म्हंटल काय उत्तर द्यावे आता...!

एकाने मार्गदर्शन केले की बाजूला एका ठिकाणी काही ज्ञानी लोकांचा मेळावा चालू आहे. तिथे बरेच विचार मंथन चलते, तिथे कदाचित तुम्हाला यावर मार्ग मिळेल आणि तुमच्या मुलीला आवडेल आणि छान वाटणारे खेळणे घेता येईल.

सांगीतल्याप्रमाणे मी तिथे गेलो आणि अनेक उपलब्ध मार्गदर्शकांपैकी एकाला सर्व सांगितले आणि विचारले. त्याने आकाशाकडे बघत सांगितले, "तिला कुठालेच खेळणे घेऊन देऊ नकोस, फ़क्त चावी घेऊन दे"..

मी अवाक, आता झाली का पंचाईत, नुसती चावी, आणि त्यानं कस काम भागणार...! हे उत्तर थोडं अंगावर आल्यासारखे वाटले म्हणून समोर जाऊन आणखी एका ज्ञानी व्यक्तीला विचारावे असे ठरवले. पुढे गेलो आणि थोडा अस्वस्थ वाटणारा पण चेहऱ्यावर तेज असणाऱ्या एकाला आत्मविश्वास आणून विचारलेच. तो म्हणाला,  "ज्याच्या साठी इथे आला आहात ते करा आणि घरी जा" 

या उत्तराने राग आला पण स्वतःला सावरून मुलीचा हात पकडून तिथून निघालो आणि अस्वस्थपणे आनंदनगरीत फिरू लागलो. मुलगी आनंदनगरीमध्ये प्रचंड खेळली, खूप थकली आणि घरी जाऊन शांत झोपली. मी मात्र अनुत्तरित, तसाच या कुशीवरून त्या कुशीवर होत राहिलो, रात्रभर ...!


. .  . . . . . . 
सचिन दाभाडे 



Sunday, July 30, 2017

कॉर्पोरेटचे "अभिमन्यू"





अष्टो प्रहर कष्ट करून नष्ट होणाऱ्यासाठी नवनिर्मिती हे स्वप्नच आहे. बऱ्याच जणांना नवनिर्मिती आणि पुनर्निर्मिती यामधील फरक कळता कळता आपबितीला सामोरे जावे लागते. म्हणून  क्षमतांचा अंदाज बांधने तसे अवघडच, त्यासाठी स्वतःला आजमावे लागते, भट्टीत झोकावे लागते, भूतकाळातील हस्तिदंती मनोऱ्यातुन भविष्याची गणिते बांधणाऱ्याला इतिहास डायबिटीस देतो.  खाताही येत नाही, आणि पाहताही येत नाही. क्षमता आहे हे नुसतं तुमच्या विचारांनाच माहित असून भागत नाही तर कृतीमधून ते व्यवस्थेच्या प्रत्ययाला ही यावे लागते. आपल्याला झालेली जाणीव ही आपल्या स्वतःच्या जेनेटिक्समधील आहे की फक्त फोनेटिक्समधील; की मग आजूबाजूचा प्रभाव गांजतोय. 'निखरना है तो बिखरना है' या तत्वात बसवण्यासाठी आपल्या  निर्णयाला धमक देता देता, क्षमतेला चमक देणे जमले पाहिजे. 

हे चेक करण्यासाठी चीनचा तत्ववेत्ता, लाओत्से २५०० वर्षांपूर्वी एक सूत्र सांगतोय "Without Darkness, there can be no Light." म्हणजे काय तर अंधार हा तुम्हाला प्रकाशाची जाणीव करून देणारा एकमेव मार्ग. बाहेरचा प्रकाश आतल्या अंधाराची जाणीव होऊ देत नाही आणि आतला प्रकाश बाहेरच्या अंधाराची जाणीव होऊ देत नाही म्हणून कुठला प्रकाश निवडायचा ते काळजीपूर्वक ठरवा.  करिअरच्या राजमार्गावर येण्यासाठी काही थाटामाटात तर काही रडत पडत कॉर्पोरेट, मोठमोठ्या बिसिनेस फर्म, व्यवस्थेयत प्रवेश मिळवतात; पण आपल्या इच्छा, क्षमता आणि कंपनीच्या अपेक्षा यांचा व्यवस्थित ताळेबंद बांधता न आल्याने काही घूसल्यावर आतमध्ये लढत राहतात, काही बाहेरच्या दिशेने वेगाने उचंबळून पुन्हा नकळत आतल्या दिशेने गिरकी घेतात आणि गिरक्याच घेत राहतात. काही आतील सूत्रे  हातात घेतात, सक्षम होतात, तर काही बाहेर येण्याच्या स्वप्नात आतमध्ये कष्ट करत राहतात .. शेवट पर्यंत ...! 
हे सर्व अभिमन्यू हेच आपल्या भारतीय कॉर्पोरेट इंडस्ट्रीचे निर्धारकही आहेत आणि अडचणीही. 

बरेच लोक फिल्मी स्टईलने चक्रव्यूह तोडतात आणि मासोळीसारखे बाहेर येऊन तरफडत राहतात. धड बाहेरही थांबता येत नाही, धड आतही परतता येत नाही, हे अभिमन्यू म्हणजे बाहेर पडून एका स्वरचित चक्रव्यूव्हाची शिकार होणारे नावाचेच शरीफ. ही मंडळी जास्त प्रमाणात १९८० ते २००० च्या काळात जन्मलेली, यातली बरीच मिल्लेनिअलही आहे, म्हणजे जे शिकले ते अप्लाय करता येत नाही.जे अप्लाय करावे लागले ते पूर्ण शिकता आले नाही. जेवढे शिकले ते सोडता येत नाही आणि नवीन शिकण्यासाठी वेळ ही नाही .. ज्यांना वेळ आहे त्यांची मानसिकता नाही आणि ज्यांची मानसिकता आहे त्यांना प्रापंचिकता....! एकूण काय तर बऱ्यापैकी गोंधळच... यातून बाहेर पडायचे म्हणजे नेमके कशातून बाहेर पडायचे हा येणाऱ्या दशकातील मोठा प्रश्न...!       

याचे उत्तर कॉलेक्टिव्ह पातळीवर कंपन्याच शोधताय. अमेरिकन थियरी "Y" ही एम्प्लॉयी यांना कामचुकार आणि आळशी समजून कामाची प्लॅनींग करते  आणि म्हणून माणसाच्या शक्तीची आणि प्रेरणेची समजच नकारात्मक आहे.  ज्यामध्ये कामे सोपववताना जबरदस्ती आणि इच्छा विचारात न  घेणे क्रमप्राप्तच आहे. याउलट जपानी उधोगपती आणि विचारवंतांनी आणलेली थेअरी "x" ही अमेरिकन मॅनेजमेंट आणि मानसिकतेच्या बरेच पाऊले पुढे चालून गेलीय. या थिअरीने माणसे ही आळशी आणि कामचुकार बनण्याची करणीमिमांसा केली आहे आणि त्याआधारावरच कामाचे ठिकाण उत्साही, सुंदर क्रिएटिव्ह असले तर लोकांना  कामचे ठिकाण आपलेसे  होईल, आणि कामाच्या पद्धती बदलल्या की लोक अधिक क्रियाशील आणि प्रोडक्टीव्ह होतील , याची  रचना करून आपल्या उद्योगाला थेअरी "Y", म्हणजेच अमेरिकन कंपन्यांच्या नियोजन पद्धतीच्या कचाट्यातून सोडवले. जॅपनीझ लोकांच्या या "पीपल" आणि "क्वालिटी" मॅनॅजमेण्टच्या कल्पनाच पश्चिमेकडील देशांच्या नियोजनाच्या सर्व तत्वांना आणि गृहीतकांना आव्हान देणाऱ्या होत्या. म्हणूनच याचा मध्य साधणाऱ्या थेअरी "Z" ची मांडणी करावी लागली जी नियोजनातील दोन्ही पद्धतीतील मिश्रण आहे. 

ही नवीन थेअरी म्हणजेच आपल्यामधील एक्सलेन्सचा शोध आणि नवनिर्मितीच्या सर्वोच्य शिखराकडे सतत प्रवास. यासाठी स्किल डेव्हलपमेंटचे प्रयत्न विविध उद्योग योग्य प्रमाणात आपल्या एम्पल्योईंना सक्षम करण्यासाठी करत आहे; त्याचे उदाहरण म्हणजे कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त  होत असणारे learning & development, organizational excellence team,employee relation team अश्या प्रकारचे विभाग म्हणजे ऑर्गनायझेशनच्या मॅनेजमेंटला या सर्वांच्या गरजेची झालेली जाणीव. 

कुठल्याही क्षेत्रात असा, पण क्षमतेचा शोध घेत राहणे आणि त्याचा विकास करणे हे एम्प्लॉयी आणि एम्पल्योऐर या  दोघांसाठी आता  महत्वपूर्ण बनले आहे. येणाऱ्या १० वर्षात आश्या गोंधळलेल्या आणि कुंपणावरील मनुष्यबळाचे विस्थापन थांबवायचे असल्यास एम्प्लॉयी केंद्रस्थानी येणे गरजेचे आहे आणि व्यक्ती जिथे आहे तिथेच त्याला हवे असणारे विश्व् निर्माण करुन कॉस्ट वाचवून सर्व संसाधने पुरवण्याचे आव्हान येणाऱ्या काळात कंपन्या आणि व्यक्तींसमोर आहे. हा स्थित्यंतराचा काळ आहे हे जितके खरे तितकेच हे ही खरे की हा सुवर्णमध्य साधण्यासाठी वेळही हीच योग्य, अन्यथा हे आधुनिक अभिमन्यू हेच आपल्या देशी नियोजनापुढील सर्वात मोठे आवाहन ठरत राहतील.   


सचिन दाभाडे
Management & corporate trainer
Director ASK training Solution.
Website- www.sachindabhade.com
Mail - ask@sachindabhade.com
Sachin.14d@gmail.com
8390130362     










          

Thursday, July 27, 2017

माणसाचा देव व्हावा..........!



रात्री हायवे वरून जातांना  एक भली मोठी जाहिरात  एका मोठ्या बोर्डवर  झळकत होती. जेवढी बिल्डिंग मोठी होती तिच्या कमीत कमी अर्ध्या आकाराचा हा बोर्ड तिच्यावर उभा केलेला होता. मी साधारणतः रात्री १० ला उशिराने घरी जात होतो आजूबाजूला काळाकुट्ट अंधार, रस्त्यावरील लाईटही  मिणमिणत्या प्रकाशत  आपला कसाबसा जीव काढत होते, पण त्याही अंधारात त्या उंच बिल्डींग वरील भला मोठा बोर्ड माझे लक्ष वेधून घेत होता. बोर्डच्या वरील बाजूने तीन मोठ्या लोखंडी रॉड लटकावून त्यावर दोन कोपऱ्यावर दोन आणि मधात एक असे तीन लाईट बोर्डाकडे तोंड करून फिक्स करण्यात आले होते. गंमत अशी होती कि त्या लाइटमुळे आजूबाजूचे काही दिसत नव्हते पण तो बोर्ड मात्र स्पष्ट दिसत होता.

माझ्या आणि बोर्डामध्ये बरेच अंतर होते, आणखी बरेच बोर्डही रस्त्यावर लावलेले होते, पण त्यातला एकही मला दिसला नाही आणि याला मी टाळू शकलो नाही. माझ्या आणि त्या मार्केटिंग बोर्ड मधील अंधार चिरत माझी नजर कुठल्याही अडचणीशिवाय त्याबोर्डापर्यंत पोहचू शकत होती. त्या बोर्डानी माझ्या आणि त्याच्या मधील भरून राहिलेला अंधार दूर करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. त्यांनी एकाच काळजी घेतली, या तीनही लाईटचा फोकस फक्त बोर्डावरचा पडेल याची.

प्रचंड अंधार आपल्या आणि सूर्यामध्ये असतानाही तो आपल्याला दिसतो,नव्हे आपल्या डोळ्यांनी बघताही येत नाही एवढ्या प्रकाशाने तळतळतो, कारण तो प्रकाशाने आधी स्वत जळतो. आपल्याला प्रकाशित करावे हा त्याचा हेतूही नाही आणि गरजही नाही, तो फक्त त्याचे काम करतो. आपण स्वतःहोऊन त्याच्याकडून प्रकाशित होऊन घेतो. दुसऱ्याला प्रकाशित करण्याच्या प्रयत्नात स्वतःतील अंधकार मिटवण्याचीही जबाबदारी घ्या ... एकाच करा स्वयंप्रकाशित व्हा...! अश्या स्वयंप्रकाशित लोकांचे जत्थे हजारो सूर्य निर्माण करतील आणि आणि प्रकाशाचे स्वप्नं पाहतील.

कुणीतरी लिहून ठेवलय;

स्वच्छ सारे मार्ग व्हावे
अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे
जीवसृष्टी जन्म घ्यावी...

स्पंदनांचा अर्थ येथे
एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी
माणसाचा देव व्हावा..........




Regards,
Sachin Dabhade
Management & Corporate Trainer
Director-ASK Training Solution
Web- www.sachindabhade.com
Mob - 8390130362
ask@sachindabhade.com
sachin.14d@gmail.com

Thursday, February 9, 2017

मार्काची परीक्षा..!





१०, १२ वी च्या विद्यार्थ्यांनी परीक्षेतील मार्क आणि तिथल्या प्रमाणपत्राचा विचार नक्की करा, पण फार ओझे मनावर घेण्याची गरज नाही. व्यक्तीच्या विकासासाठी आणि खरया अर्थाने सक्षम बनण्यासाठी त्याला शारीरिक (फिजिकल), मानसिक (मेंटल), भावनिक (इमोशनल) आणि आध्यात्मिक (स्पिरिच्युअल) अश्या चार  प्रकारच्या ज्ञानाची गरज असते आणि शालेय जीवनात विध्यार्थी फक्त मानसिकरित्या तयार होतो. त्याच्या भावनिक आणि अध्यात्मिक ज्ञानाची  गरज पूर्ण करण्यासाठी शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणात तशी फारशी व्यवस्था नाही.ती गरज तुमच्या वेळोवेळच्या निरीक्षणातून आणि रिस्क घेण्याच्या क्षमतेतून सिद्ध होणार.

म्हणजे शालेय जीवनातील मिळालेले ज्ञान तुम्हाला नोकरीला लागण्यासाठीची मानसिक तयारी पूर्ण करणार, पण बाकीच्या ३ म्हणजे फिजिकल,इमोशनल, स्पिरिच्युअल प्रकार हे प्रत्येकाला वयक्तिक पातळीवर विकसित करायचे आहे आणि हे शाळा कॉलेज मध्ये नाही तर दैनंदिन जीवनाच्या अनुभवातून, नवीन शिकण्याच्या इच्छेतून मिळते, अर्थात याची परीक्षाही तिथल्या तिथेच  होणार व तिथल्या तिथेच रिझल्ट ही मिळणार. काहींना हे ३ ज्ञानाचे प्रकार आपल्यामध्ये आहेत की नाही याची माहिती असते, तर काहीं या ज्ञानाबद्दलच शेवटपर्यंत अनभिज्ञ..! म्हणून १०, १२ वी सारख्या परीक्षेला कसौटी समजून गोंधळात पडू नका, हा फक्त एंट्री फॉर्म आहे, कसौटी आहे ती पुढे आणि त्या कसौटीची गंम्मत ही की, ती तुम्हाला जिंकावण्यासाठीच तुमच्या समोर येणार, ना की तुम्हाला अज्ञानी ठरवण्यासाठी किंवा तुम्हाला चूक किंवा बरोबर ठरवण्यासाठी. म्हणजे घटना घडली आणि तुम्हीं अडखळले, गोंधळले, आपटले, किंवा तुटले तरी तुमच्या खात्यात गुण  जमा होणार. म्हणजे प्रत्येक घटना तुम्हाला 'गुण'  देऊन 'गुणी' बनवणार. हे गुण सतत मिळत राहणार, वाढत राहणार जो पर्यंत तुम्ही मैदानात आहेत तोपर्यंत आणि तोपर्यंत तुम्ही फेल नाही, जोपर्यंत तुम्ही मैदानात ...!  त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील ८०% यश या ३ हि ज्ञानाने व्यापले आहे.

१० आणि १२ वी च्या विद्यार्थ्यानी परीक्षेचा अभ्यास करा, बाकी किती मार्क घ्यायचे ?, कोणापेक्ष्या  जास्त  घ्यायचे ? याचा  विचार करून कारण नसताना स्वतःच्या आत्मविश्वासाला सुरुंग लावण्याची, काहीही गरज नाही. कारण जास्त  मार्कवाले  आणि कमी मार्कवाले....! पहिला, दुसरा आणि  शेवटचाही, तुम्ही सगळे…, इथेच…, याच जगात काम करण्यासाठी राहणार आहात. या प्लानेटच्या बाहेर तुम्ही लोक जाणार नाहीत, एवढे तर  नक्की आहे.

पास झाल्यावर कामाला तुम्ही सगळेच लागणार, हे ही तितकेच खरे. महत्वाचे हे की तिथे काम करताना 80% परिस्थितीमध्ये तुम्हाला शाळेतील शिक्षण व परीक्षेतील मार्क कामी येणार नाही.  ते हाताळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न व अनुभवाच्या कठोर चौकटीतून जावे लागणार आहे आणि ते तुम्हाला खरया मैदानात आल्याशिवाय कळणार नाही. सोबतच सक्षम असण्याऱ्या व्यक्तीचा सहवास, अनुभवी लोकांचे मार्गदर्शन, यशस्वी लोकांचे विचार तुमचे ज्ञान वाढवणार, ते स्वीकारण्यासाठी भविष्यात तुम्ही कसे तयार होता हा महत्वाचा प्रश्न आहे.

शालेय जीवनातील यश जरी महत्वाचे असले तरी इमोशनल आणि स्पिरिच्युअल योग्यता नसेल किंवा निर्माण झाली नाही, तर तुम्हाला मिळालेले यश टिकवणे आणि वाढवणे शक्य होणार नाही. त्यामुळे परीक्षा आणि त्यातील मार्क हेच सर्व नाही, तर ती एक छोटीशी पायरी आहे. "ओप्रा विन्फ्रे" ही अशी स्त्री आहे, जिचे लहानपण अतिशय खडतर वातावरणातून आणि अनुभवातून गेले. एका ब्लॅक कुटुंबात जन्म झाल्यावर  ९ ते १४ वर्षाच्या अतिशय कोवळ्या वयात शारीरिक शोषणातून तिला जावे लागले, त्यानंतर १४ व्या वर्षीच तिच कुमारी माता होणे, हे दुर्दैवी होत. ही दाहकता समजण्यापलीकडची होती, पण हे एवढ्यावरच थांबणारे नव्हते, आणखी इतिहास घडायाचा बाकी होता. सूर्याच्या प्रकाशाला आव्हान देणारी व्यक्ती होण्यासाठीचे सर्व झगडे पूर्ण करायचे होते. एखादया व्यक्तीला आयुष्यातून उठण्यासाठी एवढा संघर्ष खूप आहे... पण संपेल ती ओप्रा कसली, आपल्या दुःखाला आणि संघर्षाला जगण्याची ढाल करून, रडत न बसता, ती तिला आवडणाऱ्या कामात सतत झोकून देत राहिली, पडत पडत उभी राहिली आणि वयाच्या ३२ व्या वर्षी जगातील सगळ्यात मोठ्या मीडिया शो ची होस्ट बनली, दैदिप्यमान यश मिळवले, कर्तुत्वाला ही लाजवेल असे काही मिळवले. जगातल्या सर्व क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वाना तिच्या शोमध्ये जाणे हे प्रतिष्ठेचे झाले, मुख्य देशातल्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांपासून ते प्रसिद्ध कलाकार सामाजिक कार्यकर्ते हे या प्रोग्राममध्ये सहभाग घेण्यास आतुर व्हायला लागले. त्या प्रोग्रॅमचे नाव होते "द ओप्रा विन्फ्रे शो". आजच्या घडीला जगातला सगळ्यात प्रसिद्ध शो.

उच्च शिक्षणातनंतरही बरेच लोक अडचणीच्या क्षणी ढासाळतात आणि कमावलेले सर्व क्षणात गमावून बसतात, त्यामुळे मानसिकरीत्या उच्च शिक्षित जरी झालात, पण भावनिक रित्या तयार नसाल, तर भीती ही तुम्हाला ते करण्यापासून नेहमी थांबवेल जे तुम्ही यशस्वी होण्यासाठी केलेच पाहिजे. ओप्राची भावनिक साक्षरता, अतिशय पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगातूनही उठून उभे राहण्याची तिची भावनिक क्षमता, हीच तिच्या यशाची शिल्पकार ठरली.

शिक्षणानंतर मानसिकरित्या एखाद्या जॉब साठी स्वतःला तयार करतांना राहिलेल्या तीन महत्वाच्या ज्ञानाला गवसणी घालायला विसरू नका, कारण या चार चाकांवरच तुमच्या  भविष्यातील यशाचा प्रवास श्यक्य आहे, एक चाकावर नाही .


सचिन दाभाडे
Management & corporate trainer
Director ASK training Solution.
Website- www.sachindabhade.com
Mail - ask@sachindabhade. com
Sachin.14d@gmail.com
8390130362

Tuesday, January 10, 2017

सिग्नल...!

सिग्नल...!




सिग्नलवर गाड़ी थांबली की एकापाठोपाठ समोरच्या गाड्या सूटु लागतात. आपली नजर आपल्या दिशेने तोंड करून असलेल्या रेड लाइट कड़े असते. गर्दीमधुन वाट काढत छोट्या बाइक्स कसरत करत झेब्रा क्रासिंग वर येऊन उभ्या राहतात. मागे वळून पाहतांना त्यांना स्वतःचाच स्वतःवर विश्चास बसत नसेल की, ते आपणच का ? ज्याने एवढ्या कमी जागेतुन मार्ग काढत सर्वात पुढे येऊन उभे राहण्यात यश मिळवले. या यशामधे त्याच्या रोजच्या अनुभवाची फार मोठी कामगिरी असते. हा फ़क्त एका दिवसाच्या कृतिचा विजय नसतो, यात शंकाच् नसावी. ही चिंचोळी वाट भेदण्यात शेवटी आजही यश मिळवलेच, असा अभिमान आणि समाधान चेहऱ्यावर घेऊन गाड़ी बंद करुन सिग्नल चे निरिक्षण सुरु केल्या जाते.

प्रेम आणि युद्धात सर्व काही जायज असते, या न्यायाने काही बाइकर्स डाव्या हाताला जाणाऱ्या गाड्यांच्या मार्गातून आपली गाड़ी काढत झेब्रा क्रासिंग वर येऊन उभे राहण्यात यश मिळवतात. रिक्शा आणि मिनी टेम्पो हे स्वतःची जागा स्वतः निर्माण करणारे जणू काही स्वयंभू वाटतात. ते डाविकडे जाणाऱ्या गाड्याच्या मार्गात आपला तळ ठोकून बसतात आणि सिग्नल सुटायची वाट पाहतात. त्यांची सिग्नलवर; तो सर्वात पाहिले तोडण्यासाठी सुरु असलेली स्पर्धा जिंकण्याची जिद्द पाहून डाविकडे थांबलेल्या रिक्शा ही, अतर्क्य भरलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहत असतात आणि  भीतिचा जराही लवलेश नसलेली व्रत्ती पाहून, डाविकडे जाणाराही शांततेने त्याच्या पाठीमागे उभा राहून संयमाचे सङ्गादित करणारे प्रदर्शन भरवत असतो. डाविकडे जाणाऱ्या गाड्याही मुकाटपने ज्या पद्धतीने त्यांच्या मागे गाड्या बंद करून उभे राहतात, तेंव्हा मला त्या शांततेच्या नोबेलसाठी पात्र वाटायला लागतात.

शेवटचे 15 सेकंद राहिले की गाड़ी फुर्फुरायला लागते, गियर पडतात, 10 सेकंद असताना झेब्रा क्रॉसिंग ओलांडली जाते, 5 वा सेकंद आणि आम्ही रस्त्याच्या मधोमध असतो. जेंव्हा लोक म्हणतात, आम्हाला क्षणा क्षणाचा हिशोब नाही, त्यांना मला सांगावेसे वाटते की किती खोटे आणि वरवरचे आरोप वाटतात ते, या इथे आणि पहा एका एका सेकंदासाठीचा संघर्ष...!

आणि ज्या क्षणाची प्राणात प्राण आणून आम्ही वाट पाहत असतो तो म्हणजे यलो लाइट लागण्याची, तो क्षण प्रत्यक्षात अवतरतो. जसे काही सारा असमंत थबकुन जातो आपले शौर्य, वेग, आणि सर्वात पुढे राहण्याची क्षमता बघण्यासाठी. स्वर्गातील सर्व देव जणू डोळ्यात पाणी आणून आपला हा विजय पाहण्यासाठी आतुर झालेले असतात. हातामधे फुलांच्या पाकळयाचा वर्षाव सर्वात पुढे राहण्याऱ्या वर होणार असतो. सारे काही अदभुतच...!

पोळा फुटलेला असतो....

रास्ता मोकळा श्वास घेतो..

विजेते निघुन गेलेले असतात आणि

एका अनुभवी साधुसारखा, ग्रीन लाइट लागतो जो अजूनही डोळ्यात तेज घेऊन त्याच्या आदेशाची वाट पाहत उभे असतात, त्यांच्यासाठी...!


सचिन दाभाडे
Management & corporate trainer
Director ASK training Solution.
Website- www.sachindabhade.com
Mail - ask@sachindabhade. com
Sachin.14d@gmail.com
8390130362

Saturday, January 7, 2017

आँधीया भी चलती रहे और दिये भी जलते रहे..!




आँधीया भी चलती रहे और दिये भी जलते रहे.


रविवारच्या एक दिवस अगोदर म्हणजे तसा आकर्षक दिवस, काहींना या दिवसाचे प्रचंड आकर्षण तर काहींना या दिवसाचा तिरस्कार. काहींना रुटीन तेच तेच, कामातून मोकळे होण्याचा मार्ग, तर काहींना आपल्या कामात खंड पडण्याची भीती. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. या सर्व प्रवृत्ती निसर्ग नियमांशी आपले नाते जेंव्हा साधर्म्य साधण्यासाठी प्रयत्न करतात तेंव्हा येणाऱ्या पिढ्यांसाठी मुख्य मार्ग बनतात. परंतु आपल्या पूर्वजांना जेंव्हा निसर्ग नियमांचे अन्वयार्थ लावता येत नाहीत तेंव्हा आपण समकालीन असूनही समकालीन होण्याचे सर्व फायदे घेण्यासाठी मुकतो.

जगातील कुठल्याही संस्कृतिने निसर्ग नियमांचे अचूक अंदाज बांधण्यात जेवढे यश मिळवले, तेवधी ती संस्कृती आणि समाज विकासाच्या पायऱ्या चढून गेला. आज भारतीय तरुण हा अर्थ आणि अंदाज लावण्यासाठी सज्जही आहे आणि तो मोठ्या प्रमाणात तसा अर्थ लावतो ही आहे. जर येणाऱ्या काळात आपल्याला आपल्या जागेतून, परिस्थिती आणि स्थितीतून जास्तीत जास्त काही पदरात पाडून घ्यायचे असेल तर एकमेकांसोबत संवादाची प्रक्रिया आणि घटनांचे अन्वयार्थ काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि शास्त्रशुद्ध बनवावी लागेल. देशाच्या विकासाबरोबरच आपल्याला आपल्या मेंदूचा विकासावरही तेवढाच जोर द्यावा लागणार आहे. एका वर्गात शिक्षक आपला पाठ मुलानां शिकवत असतात. शिकवणे झाल्यावर ते मुलांना सांगतात आज घरी गेल्यावर सर्व आपापल्या पालकांना त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनेविषयी विचारा आणि त्या घटनेचे तात्पर्य काय हेही विचारा. आणि उद्या तुम्हाला ते मला आणि सगळ्या शाळेला सांगायचे आहे.मुले घरी जातात आणि दुसऱ्या दिवशी आपली एकएक कथा घेऊन येतात. शाळेत आल्यावर प्रत्येक विद्यार्थी कुतुहलाने एकदुसर्याकडे पाहत असतात, कोणी कोणी, काय काय आणले असेल याबद्दल उत्सुकता शिगेला पोहचते. प्रत्येकजण आपापली गोष्ट सांगण्यास सिद्ध होतात. शिक्षक वर्गात येतात आणि प्रत्येक मुलाला विचारु लागतात. 'अभिजित तू सांग तुझ्या पालकांनी काय अनुभव सांगीतला', 'सर, माझे वडील शेतकरी आहेत, एकदा मी त्यांच्यासोबत बाजारामध्ये अंडी विकायला जात होतो. अचानक रस्त्यामधे एक मोठा खड्डा येतो आणि एका खोक्यामधे ठेवलेले सर्व अंडे उधळली जातात आणि सर्व अंडी फुटून जातात'. शिक्षकाने विचारले यातून तुला तुझ्या पालकांनी काय तात्पर्य घ्यायला सांगितले, 'सर, माझे वडील मला म्हणाले, क़ी यापुढे लक्षात ठेव की प्रवास करत असतांना सर्व अंडी ही एकाच खेक्यामधे ठेवायचे नाही'.

शिक्षकांनी दुसऱ्या मुलाकडे मोर्चा वळविला. दूसरा मुलगा म्हणाला, सर, माझे वडीलही शेतकरी आहे. आम्हाला अंड्या मधून कोंबड्या हव्या होत्या म्हणून आम्ही २० अंडी आणली आणि ते कोंबडीला उबवायला लावली. आम्ही असे गृहीत धरले होते कि आम्हाला वीस कोंबड्याची पिल्ले मिळतील, जेंव्हा प्रत्यक्षात कोंबड्याची पिल्ले बाहेर आली तर ती दहाच आली. यातून माझ्या वडिलांनी तात्पर्य सांगितले कि कोंबडी अंड्यातून बाहेर येण्याअगोदर तिला मोजू नये.

आता शिक्षक तिसऱ्या मुलाकडे वळाले. तिसरा मुलगा म्हणाला, 'सर, माझ्या वडिलांनी मला माझ्या एका दूरच्या मावशीची कथा सांगितली, ती सैन्यात होती, एकदा शत्रूच्या प्रदेशात असतांना तिचे हेलिकॅप्टर एकदम शत्रूच्या गराड्यात येऊन सापडले तिने तेंव्हा इमर्जन्सी लँडिंग करायचे ठरवले. तिच्याकडे हेलिकॅप्टर मध्ये तेंव्हा ३ गोष्टी दिसल्या एक होती मोठी रायफल, दुसरी होती छोटीशी तलवार आणि तिसरी होती एक व्हिस्कीची बॉटल. हेलिकॅप्टर क्रॅश होत असतांना तिने व्हिस्की पिऊन घेतली. खाली आल्यावर ती शंभराच्या आसपास शत्रूच्या वेढ्यात वेढली गेली, तिने आपल्याकडील रायफलने शत्रूंशी झुंज देत ६० लोकांना कंठस्नान घातले, नंतर तिने आपल्याकडील तलवार काढली आणि तिने तलवारीने २० लोकांना संपवले. आता तलवार निकामी झाल्यावर ती हाताने लढू लागली. राहिलेले दहा जण तिने आपल्या हाताने संपवले' .मुलाने स्टोरी संपवली आणि तो सरांकडे शांततेने बघू लागला. संपूर्ण वर्ग कथा ऐकून स्तब्ध झाला होता. काही चेहरे भेदरलेले तर काही गोंधळलेले. शिक्षक हलक्या आवाजात मुलाला म्हणाले 'तुला तुझ्या पालकांनी या कथेचे तात्पर्य नाही का सांगितले '. मुलगा म्हणाला हो सांगितले. तो म्हणाला 'सर, माझ्या वडिलांनी मला सक्त ताकीद दिलीय, कि जेंव्हा तुझी मावशी व्हिस्की पिऊन येईल, तेंव्हा तिच्या समोर जाऊ नकोस'

तन मन एकत्र करून परिस्थितीचा आवाका लक्षात घेऊन स्वतःला सिद्ध करण्यासाठी मागील एक पिढी लढली. त्यांच्या परीने त्यांनी अर्थ लावले आणि घटना घडत गेल्या. येणाऱ्या काळात आपलेही तेच भविष्य असणार आहे जो अन्वयार्थ आपण आपल्या आजूबाजूच्या घटनांचा लावणार आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवाण्यास हरकत नाही, चहात माशी पडल्यास चहा फेकून दिल्या जातो आणि तुपामध्ये माशी पडल्यास माशी फेकून दिली जाते.

सचिन दाभाडे
Management & corporate trainer
Director ASK training Solution.
Website- www.sachindabhade.com
Mail - ask@sachindabhade.com
Sachin.14d@gmail.com
8390130362














Friday, January 6, 2017

डर ' ना ' मना हे...!



डर ' ना ' मना हे...!

यशाच्या उंच शिखरावर गेल्यावर हा आपल्यामधूनच मोठा झालेला आहे असे सांगण्यासाठी किती लोकांची इच्छा होत असेल. अर्थात यात  नवीन असे काही नाही, पण; त्याऐवजी, खरंच एक सर्जनशील आणि क्षमता असलेला माणूस आपल्यामध्ये होता असे म्हणायला लावणारे काम आणि ऊर्जा तुमच्याकडे असण्यासाठी किती जण धडपडतात हा खरा प्रश्न आहे. लहानपणापासून अनेक गोष्टीची छायाचित्रे आपल्या मनावर बिंबलेली असतात त्यात काही वातावरणानुसार आपण  ते मनावर बिंबवून घेतो, तर काही आपले वातावरण आपल्यावर नकळत बिंबवते. मोठे होत असतांना या सर्व कल्पना ज्या कळत नकळत आपल्या विचारांचा भाग झालेल्या असतात त्या ही आपल्यासोबत मोठ्या होत असतात आणि आपले अस्तित्व आपल्या व्यक्तिमत्वात कायम करत असतात.

सुशिक्षित होऊन शाळा कॉलेजातून आपण बाहेर पडतो आणि नोकरीच्या ठिकाणी आपला जम बसवतोही, पण आपला खरा कस लागणे आणखी बाकी असते, बऱ्याच मुख्य परीक्षा आणखीही बाकी असतात. या परीक्षा ३ तासाच्या वेळेत पेपरवर, मिळालेले ज्ञान लिहण्याच्या नसून, त्या स्वतःच्या अपेक्षांचे नियोजन करता करता लोकांच्या अपेक्षेचे नियोजन करण्याच्या असतात.

अशी बरीच कामे आहेत की जी करण्यासाठी शाळा महाविद्यालयातून आपण "स्किल्ड" होऊन बाहेर पाडतो. महाविद्यालयीन शिक्षण हे एक प्रकारचे सिम्युलेशनच (simulation) आहे, या ठिकाणी वास्तव परिस्थितीचा आभास तयार करून त्याद्वारे कुठल्या स्किल्स त्यासाठी उपयुक्त असतील, याचे नियोजन केले जाते. मॅनेजमेंट च्या शिक्षणातही थोड्या फार फरकाने हाच पाढा गिरवला जातो, अर्थात हे शिक्षण थोडे पुढारलेले असल्याने यातील सिम्युलेशन थोडे वास्तवाच्या जवळ जाणारे जरी असेल, तरीही ते एकप्रकारचे सिम्युलेशनच...! मुख़्य अनुभावापासून दुरच ! हे अनुभव म्हणजे गैरसमजुतीचे, विसंवादाचे, असहनशीलतेचे.  

शैक्षणिक तंत्राच्या आधारावर विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि नोकऱ्यांसाठी आणि कामासाठी सिद्ध होतात. कामाच्या ठिकाणी असलेल्या 'Real time situation' या प्रकारचा एवढा बोलबाला आता झालेला असतानाही ते हाताळण्यासाठीची कुठलीही तयारी आपल्याकडून शिक्षण घेत असतांना होते का हा प्रश्न प्रत्येक शिक्षण  घेत असलेल्या विद्यार्थ्याने स्वतःला विचारायला हवा. वर्कप्लेस माँनजमेंट मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणून "अँगर माँनजमेंट" (Anger Management) पुढे येत आहे. किती हि उच्च शिक्षण घेतलेले असले तरी याबद्दलचे शिक्षण आपल्याकडेही युनिव्हर्सिटी मधून मिळत नाही. बऱ्याच वेळेला अश्या real time situations सांभाळता न आल्याने व्यवहारिक आयुष्यात ब्लॉकेज राहून जाण्याची खूप शक्यता असते. मागे काही दिवसापूर्वी मी कुठेतरी वाचले की तुमच्या रागाच्या पाठीमागे तुमची भीती ही मुख्यत्वे करून काम करत असते. अनुभवानंतर मला ते सिद्धही झाले.

भीती, अस्वस्थता हि रागाला जन्म देते. म्हणजे रागावर नियंत्रण मिळवायचे असल्यास भीतीवर आधी नियंत्रण मिळवावे लागेल.  काम करत असतांना, नातेसंबंध प्रस्थापित करत असताना, स्वतःची प्रतिमा समाजात घडवत असतांना, वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जरी ठेवला, तरी बऱ्याच वेळेला आपल्या जडणघडणीतून येणाऱ्या संकल्पना, या आपली स्वतःची एखाद्या घटनेबद्दलची प्रतिक्रिया तयार करत असते. उदाहरण म्हणून घ्यायचे झाले तर बऱ्याच दिवसापासून ज्यांच्या नेतृत्वात आपल्याला मान मिळाला किंवा चांगले काम मिळाले ते जर मिळणे मध्येच खंडित झाले, तर अपरिपक्व मनामध्ये येणारी पहिली भावना म्हणजे अस्वस्थता, मग त्यातून भीतीही जन्म घेते. बघायला गेले तर ती आपल्या सर्वांची फारच सामान्य प्रतिक्रिया असेलही पण यामागे लहानपणापासुन ज्यापद्धतीने आपले "माईंड कल्टिव्हेट" झालेले असते त्याचा फार मोठा भाग असतो. शिक्षणाची पद्धतही यामध्ये मोलाचा वाट उचलते.

आता वरील घटने ला योग्य प्रतिक्रिया काय असावी याचा विचार करून बघू...!

- इतक्या दीवस मला माझ्या बॉसकडून किंवा नेतृत्वाकडून मान आणि जागा मिळाली याचे खरे कारण काय ?
.
- मला प्राप्त होणाऱ्या सर्व गोष्टीना माझ्या सहकार्याची अधिमान्यता होती अथवा नाही..!
.
- मध्यंतरी माझ्यामध्ये किती गुणांचा विकास झाला ?
.
- आता असे काय घडले जेणेकरून तुमच्याप्रती बघण्याचा दृष्टिकोन बदलला?

असे  महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर मिळवणे व त्यानुसार पुढील प्लॅन ठरवणे, हा या अश्या समस्येतून बाहेर पडण्याचा खरा आणि योग्य मार्ग. पण ऑफिसमध्ये असो किंवा वयक्तिक आयुष्यात असो हा मार्ग तोच निवडू शकतो, जो काम करण्यासंबंधीचे आयुध विकसित करून यासंबंधीची योजना करतो. हा मार्ग निवडला गेला नाही तर दुसरा मार्ग शिल्लक उरतो तो म्हणजे... अस्वस्थता आणि मग नंतर येणारी भीती. या दोन्ही  गोष्टी फक्त आणि फक्त आणखी अस्वस्थता आणि आणखी भीतीच निर्माण करता, तर यातून मार्ग नाही...!

भीती ही तुम्हाला खाली पाहायला लावते, तर प्रत्येक गोष्टीतला स्वानुभवातून पाहण्याच्या सकारात्मक क्षमता, येणारा पुढचा क्षण, त्याला सामोरे जाण्यासाठी सिद्धता करायला लावतो. प्रत्येक टप्यावर, महत्वाच्या ठिकाणी, स्वतःच्या क्षमता जोखून पहा, विदयार्थ्यांनी शेवटच्या अशा कुठल्या परीक्षेचीच फक्त वाट पाहू नका, तर शिकत असतांना, डोळे आणि मन उघडे ठेऊन, प्रत्येक घटनेत स्वतःला अजमावून पहा. स्वतःवर प्रयोग करण्यास घाबरू नका. स्वतःची रँकिंग स्वतः करायला शिका. म्हणजे स्वतःबद्दलचा फाजील आत्मविश्वास ही राहणार नाही आणि आत्मविश्वासाची कमीही राहणार नाही. याचा फायदा कठीण समयी तुम्हाला होईल आणि ज्या वेळेला लोक घाबरलेले आणि अस्वस्थ असतील तेंव्हा तुम्ही स्वतःमधील संधी शोधण्यात गुंग असाल आणि लोक झोपलेल्या अवस्थेत तुमचा सूयोदय होईल .... !



सचिन दाभाडे