डर ' ना ' मना हे...!
यशाच्या उंच शिखरावर गेल्यावर हा आपल्यामधूनच मोठा झालेला आहे असे सांगण्यासाठी किती लोकांची इच्छा होत असेल. अर्थात यात नवीन असे काही नाही, पण; त्याऐवजी, खरंच एक सर्जनशील आणि क्षमता असलेला माणूस आपल्यामध्ये होता असे म्हणायला लावणारे काम आणि ऊर्जा तुमच्याकडे असण्यासाठी किती जण धडपडतात हा खरा प्रश्न आहे. लहानपणापासून अनेक गोष्टीची छायाचित्रे आपल्या मनावर बिंबलेली असतात त्यात काही वातावरणानुसार आपण ते मनावर बिंबवून घेतो, तर काही आपले वातावरण आपल्यावर नकळत बिंबवते. मोठे होत असतांना या सर्व कल्पना ज्या कळत नकळत आपल्या विचारांचा भाग झालेल्या असतात त्या ही आपल्यासोबत मोठ्या होत असतात आणि आपले अस्तित्व आपल्या व्यक्तिमत्वात कायम करत असतात.
सुशिक्षित होऊन शाळा कॉलेजातून आपण बाहेर पडतो आणि नोकरीच्या ठिकाणी आपला जम बसवतोही, पण आपला खरा कस लागणे आणखी बाकी असते, बऱ्याच मुख्य परीक्षा आणखीही बाकी असतात. या परीक्षा ३ तासाच्या वेळेत पेपरवर, मिळालेले ज्ञान लिहण्याच्या नसून, त्या स्वतःच्या अपेक्षांचे नियोजन करता करता लोकांच्या अपेक्षेचे नियोजन करण्याच्या असतात.
अशी बरीच कामे आहेत की जी करण्यासाठी शाळा महाविद्यालयातून आपण "स्किल्ड" होऊन बाहेर पाडतो. महाविद्यालयीन शिक्षण हे एक प्रकारचे सिम्युलेशनच (simulation) आहे, या ठिकाणी वास्तव परिस्थितीचा आभास तयार करून त्याद्वारे कुठल्या स्किल्स त्यासाठी उपयुक्त असतील, याचे नियोजन केले जाते. मॅनेजमेंट च्या शिक्षणातही थोड्या फार फरकाने हाच पाढा गिरवला जातो, अर्थात हे शिक्षण थोडे पुढारलेले असल्याने यातील सिम्युलेशन थोडे वास्तवाच्या जवळ जाणारे जरी असेल, तरीही ते एकप्रकारचे सिम्युलेशनच...! मुख़्य अनुभावापासून दुरच ! हे अनुभव म्हणजे गैरसमजुतीचे, विसंवादाचे, असहनशीलतेचे.
शैक्षणिक तंत्राच्या आधारावर विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि नोकऱ्यांसाठी आणि कामासाठी सिद्ध होतात. कामाच्या ठिकाणी असलेल्या 'Real time situation' या प्रकारचा एवढा बोलबाला आता झालेला असतानाही ते हाताळण्यासाठीची कुठलीही तयारी आपल्याकडून शिक्षण घेत असतांना होते का हा प्रश्न प्रत्येक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने स्वतःला विचारायला हवा. वर्कप्लेस माँनजमेंट मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणून "अँगर माँनजमेंट" (Anger Management) पुढे येत आहे. किती हि उच्च शिक्षण घेतलेले असले तरी याबद्दलचे शिक्षण आपल्याकडेही युनिव्हर्सिटी मधून मिळत नाही. बऱ्याच वेळेला अश्या real time situations सांभाळता न आल्याने व्यवहारिक आयुष्यात ब्लॉकेज राहून जाण्याची खूप शक्यता असते. मागे काही दिवसापूर्वी मी कुठेतरी वाचले की तुमच्या रागाच्या पाठीमागे तुमची भीती ही मुख्यत्वे करून काम करत असते. अनुभवानंतर मला ते सिद्धही झाले.
भीती, अस्वस्थता हि रागाला जन्म देते. म्हणजे रागावर नियंत्रण मिळवायचे असल्यास भीतीवर आधी नियंत्रण मिळवावे लागेल. काम करत असतांना, नातेसंबंध प्रस्थापित करत असताना, स्वतःची प्रतिमा समाजात घडवत असतांना, वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जरी ठेवला, तरी बऱ्याच वेळेला आपल्या जडणघडणीतून येणाऱ्या संकल्पना, या आपली स्वतःची एखाद्या घटनेबद्दलची प्रतिक्रिया तयार करत असते. उदाहरण म्हणून घ्यायचे झाले तर बऱ्याच दिवसापासून ज्यांच्या नेतृत्वात आपल्याला मान मिळाला किंवा चांगले काम मिळाले ते जर मिळणे मध्येच खंडित झाले, तर अपरिपक्व मनामध्ये येणारी पहिली भावना म्हणजे अस्वस्थता, मग त्यातून भीतीही जन्म घेते. बघायला गेले तर ती आपल्या सर्वांची फारच सामान्य प्रतिक्रिया असेलही पण यामागे लहानपणापासुन ज्यापद्धतीने आपले "माईंड कल्टिव्हेट" झालेले असते त्याचा फार मोठा भाग असतो. शिक्षणाची पद्धतही यामध्ये मोलाचा वाट उचलते.
आता वरील घटने ला योग्य प्रतिक्रिया काय असावी याचा विचार करून बघू...!
- इतक्या दीवस मला माझ्या बॉसकडून किंवा नेतृत्वाकडून मान आणि जागा मिळाली याचे खरे कारण काय ?
.
- मला प्राप्त होणाऱ्या सर्व गोष्टीना माझ्या सहकार्याची अधिमान्यता होती अथवा नाही..!
.
- मध्यंतरी माझ्यामध्ये किती गुणांचा विकास झाला ?
.
- आता असे काय घडले जेणेकरून तुमच्याप्रती बघण्याचा दृष्टिकोन बदलला?
असे महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर मिळवणे व त्यानुसार पुढील प्लॅन ठरवणे, हा या अश्या समस्येतून बाहेर पडण्याचा खरा आणि योग्य मार्ग. पण ऑफिसमध्ये असो किंवा वयक्तिक आयुष्यात असो हा मार्ग तोच निवडू शकतो, जो काम करण्यासंबंधीचे आयुध विकसित करून यासंबंधीची योजना करतो. हा मार्ग निवडला गेला नाही तर दुसरा मार्ग शिल्लक उरतो तो म्हणजे... अस्वस्थता आणि मग नंतर येणारी भीती. या दोन्ही गोष्टी फक्त आणि फक्त आणखी अस्वस्थता आणि आणखी भीतीच निर्माण करता, तर यातून मार्ग नाही...!
भीती ही तुम्हाला खाली पाहायला लावते, तर प्रत्येक गोष्टीतला स्वानुभवातून पाहण्याच्या सकारात्मक क्षमता, येणारा पुढचा क्षण, त्याला सामोरे जाण्यासाठी सिद्धता करायला लावतो. प्रत्येक टप्यावर, महत्वाच्या ठिकाणी, स्वतःच्या क्षमता जोखून पहा, विदयार्थ्यांनी शेवटच्या अशा कुठल्या परीक्षेचीच फक्त वाट पाहू नका, तर शिकत असतांना, डोळे आणि मन उघडे ठेऊन, प्रत्येक घटनेत स्वतःला अजमावून पहा. स्वतःवर प्रयोग करण्यास घाबरू नका. स्वतःची रँकिंग स्वतः करायला शिका. म्हणजे स्वतःबद्दलचा फाजील आत्मविश्वास ही राहणार नाही आणि आत्मविश्वासाची कमीही राहणार नाही. याचा फायदा कठीण समयी तुम्हाला होईल आणि ज्या वेळेला लोक घाबरलेले आणि अस्वस्थ असतील तेंव्हा तुम्ही स्वतःमधील संधी शोधण्यात गुंग असाल आणि लोक झोपलेल्या अवस्थेत तुमचा सूयोदय होईल .... !
सचिन दाभाडे
No comments:
Post a Comment