असे म्हणतात या जगात कुठल्याही व्यक्तिचा सन्मान त्याने आयुष्यात काय मिळवले यावरून होत नाही तर त्याने आयुष्यात काय दिले यावरून होतो. लोकांच्या यशात ज्याला हातभार लावता आला तो स्वतः यशाची एक पायरी मुळातच चढून गेलेला असतो, म्हणजे जेंव्हा तुम्ही एखाद्याला डोंगरावर चढण्यास मदत करता, तेंव्हा तुम्ही स्वत:ला ही आकाशाच्या जवळच शोधाल. आपण इतरांबद्दल चांगले बोलायला लागलो की याची सुरवात होते. लोकांबद्दल फ़क्त चांगले बोलायची इच्छा असून भागत नाही, तर तुमचा त्यांच्याबद्दल असलेला चांगला विचार त्यांना ऐकायला ही गेला पाहिजे. जसा जसा तुमचा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोण बनत जाईल तसा तसा तुम्हाला मिळणाऱ्या वागणुकीचा दर्जा वाढत जाईल. म्हणजे लोकांनी आपल्या सोबत खुप छान वागाव अस एखाद्याला अतिशय निकडीचे वाटायला लागले असेल तर त्याला करावी लगणारी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, तसेच वागणे त्याने दुसऱ्यासोबत सुरु करणे होय; म्हणूनच एखादा स्वार्थी व्यक्ति जेवढा स्वताःकडून फसवला जात असेल तेवढा कुणीही फसवला जात नसेल या जगात...!
मदर तेरेसा सारख्या परदेशातुन आलेल्या विदुषीला हे सत्य किती स्पष्टपणे अवगत होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे गरीब, अपंग, स्त्रीया, अनाथ मुले यांच्या जीवनामध्ये आनंदाचे छोटे छोटे कण पेरण्यात गेले. पण त्याबदल्यात त्यांना मिळालेला आदर ही आपण पाहतो, जो कुणालाही मिळणे सोपे नाही. याचे कारण त्या पहिल्यापासूनच खूप आदरणीय होत्या म्हणून त्यांनी ते कार्य केले नाही, तर त्यांनी ते कार्य केले म्हणून त्यांना आदर मिळाला. बाबा आमटे हे आनंदवनामध्ये कुष्ठरोग्यासाठी आयुष्यभर झटत होते आणि रोग्यांचा कुष्ठरोग बरा करताना एक दिवस त्यांना स्वतःलाच हा रोग झाला, अनेकांचे दुःख अंगावर घेऊन त्यांची मानोभावे सुश्रुषा करणारे बाबा आमटे आदरास पात्र झाले. ते काम त्यांनी स्वीकारले म्हणून ते आदरास पात्र झाले. म्हणून तुम्ही काय देता हे सगळ्या जास्त महत्वाचे.
अशा पद्धतीमधुन सर्जनशील नेतृत्व उभे करायचे असल्यास लोकानां तुम्ही त्यांच्या मागे आहात हा विश्वास देता आला पाहिजे आणि हा विश्वास देण्यासाठी प्रत्येकातील चांगले काय ते शोधता आल पाहिजे.चांगले ते शोधून वेळोवेळी प्रोत्साहन देता आले पाहिजे. चांगल्या प्रकारे आणि मनापासून केलेल्या प्रोत्साहानाला लोक आयुष्यभर सोडत नाही आणि दुसऱ्यामध्ये शोधलेली चूक आयुष्यभर तुम्हाला सोडत नाही. मनापासून केलेल्या कौतुकावर लोक वर्ष वर्ष काढतात हाच यातील सांगायचा मुद्दा. बर हे फ़क्त माणसांसाठीच नहीं तर यंत्रही बघा ना..वीज दिली की फ्रिज कूलिंग देतो, ट्यूब प्रकाश देतो. गाड़ीला पेट्रोल दिले की ती आपल्याला प्रवास देते, निरिक्षण दिले की समज मिळते, कृती केली की अनुभव मिळतो. उगावणारया झाडाची प्रत ही, बी लावल्यापासून ते फळ हातात येईपर्यंत जी काळजी घेतली जाते त्यावर अवलंबून असते...
झाड़ लावले की फळ मिळते, पण मला झाड़ लावायचे नाही, मला फ़क्त फळ हवंय हे म्हणणे कसे वाटते...! हास्यास्पद वाटतेय ना ? वाटेलही, याचे कारण आपण त्याचे निरिक्षण करतो आणि मग तुलना करतो म्हणून हास्यास्पद वाटते. आता यासारखेच जर आपण आपल्या क्षमता आणि प्रयत्नांची तुलना आपल्या अपेक्षेशी केली, तर याहीपेक्षा खुप हास्यास्पद प्रकार हाताला लागण्याची शक्यता आहे. पण स्वताःवर हसणे जरा अवघड असल्याने आपण हा प्रयोग दुसऱ्यावर राबवण्यातच धन्यता मानतो.
एखाद्या झाडाला वाढवायचे असल्यास आपण त्याच्या आजूबाजूची जागा मोकळी करतो त्याला उंच वाढवायचे असल्यास बाजूच्या फांद्या कापून टाकतो म्हणजे पाणी आपोआप जे अस्तित्वात आहे त्याला जाते आणि झाड हव्या त्या आणि योग्य दिशेला वाढते. तुम्हाला समोरच्या च्या मनात काय वाढवायचं आहे राग,प्रेम, आकस, विरोध, जे वाढवायचा आहे ते बोला, जे वाढवायचं नाही ते बोलण्यातून आणि वागण्यातून टाळा. आतून वाढ़ायचे असल्यास तुम्हाला जागा मोकळी करावी लागेल, आणि जे तुमच्याकडे आहे ते बाहेर द्यावे लागेल, दिले तर वाढ़ाल. स्वतःपाशी ठेवाल तर रद्दी होईल. म्हणुन वाढ़ायच की आयुष्यभर ओढायच हे तुम्हीच ठरवा..!
सचिन दाभाडे ...
No comments:
Post a Comment