Friday, December 17, 2021

'भुरा' एक तत्वज्ञान्याची बखर.





भुरा हे शरद बाविस्कर यांच्या जीवनातील नाट्यमय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तत्त्वज्ञानाच्या गहन आणि अर्थपूर्ण पद्धतीचा मिलाफ करत लिहलेले अर्थपूर्ण आत्मचरित्र. पुस्तक वाचतांना अनेक महत्त्वाच्या ठिकाणी डोळ्याच्या कडा पाणावतात. आत्मचरित्र हे फक्त घटनांचे विवरणच असावे का? तर नक्कीच नाही. आत्मचरित्र कसे असावे याचे सध्या मी पाहिलेले उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भुरा. आत्मचरित्रातून ते लिहणार्याच्या आयुष्यातील घटनाच फक्त कळण्याऐवजी त्याची वैचारिक मनोभूमिका जीच्यामुळे व्यक्तीच्या आयुष्याला आकार मिळालेला असतो ते कळत असते. छोट्याछोट्या दुःखाना ज्याप्रमाणे लेखक जगाच्या मोठ्या प्रेरणेशी जोडतो त्यामुळे आपले आत्मचरित्र हे फक्त रावेरच्या 'भुरा' चे न राहता वैश्विक आशा 'शरद' चे झालेय. सर्व सामाजिक शास्त्रांना खोली आणि अर्थ देणारी मूळ शाखा म्हणजे तत्वज्ञान आणि अशा विषयावर आपण केलेले चिंतन मोठ्या परिपक्वतेने एका उच्च दर्जाच्या साहित्यकृतीतुन यावे तसे आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनांतून येत राहते आणि घटनांसोबत विचारांच्या विश्वात वाचक न्हाऊन निघत राहतो, एक प्रेरणादायी माणसाचे चरित्र वाचता वाचता एका तत्वज्ञाण्याचे मनोगत वाचकाचे भान घडवत राहते आणि नकळत त्याचे अनुभवविश्व संपन्न करत राहते.  

एकीकडे जेंव्हा वाचताना लेखकाच्या आयुष्यातील संघर्ष अस्वस्थ करत होता त्याचवेळेला लेखक त्या संघर्षाकडे ज्या वैश्विकतेतुन पाहत होते हे वाचताना व अनुभूती घेत असतांना एक उच्च कोटींची प्रगल्भता मला व्यक्तिशः देऊन गेला. वाचकाच्या आयुष्याला आत्मपरिक्षणाची संधी हे 'संवादी' आत्मचरित्र ठायी ठायी उपलब्ध करून देत राहणार.

आजूबाजूला आणि समाजात ज्या पद्धतीने संयम हरवून भावनेच्या लाटांवर स्वार होऊन तरुण लोकांचे लोंढे बरबाद होतांना बघतो, अगदी अश्या वेळेला स्वभान जागृत करून, भयंकर अंतरविरोधी परिस्थितीत, ध्येय निश्चित करून, त्यासाठी जीवाचे रान करणे काय असते, हे या पुस्तकात लेखकाला बघून लक्षात येते. तसेच जो कुणीही वाचेल त्यालाही हे समजेल आणि हे समजणे हीच व्यक्ती विकासाची पूर्वअट आहे हे मला नमूद करावे वाटते. आणि या सगळ्यामुळेच की काय भुरा व तो निर्माण करत असलेला अवकाश मला या काळाची ऐतिहासिक गरज वाटतेय. अर्धवट लोकांसाठी आपले लिखाण हे झणझणीत अंजन आहे. 

आजूबाजूला शिक्षणाचे वातावरण नसतांना ज्याप्रमाणे भग्नातेतून लेखकाची भरारी ही लक्ष वेधणारी आहे, त्याहीपेक्षा ज्या संयमाने तुम्ही नियतीच्या एका एका वर्तुळाकार चक्रातून महत्प्रयासाने बाहेर पडत गेलात, हे पाहणे संपन्न करणारे व दृष्टी चे कोण रुंदवणारे आहे. स्वतःबद्दल निर्माण होण्यारया संकुचित व्याख्या भुरा प्रचंड निर्दयतेने तोडत जातो. मान्यता प्राप्त यश मिळालेले असतांनाही भुरा थांबत नाही. तो आणखी पुढे जातो. पुढे जाणं आणि थांबणं काय असतं याची जणू व्याख्या भुरा निर्माण करू पाहतोय. मान्यता आणि अमान्यता निर्माण करणाऱ्या जगात ट्रान्सकॅनडेंटल अनुभव हे कादाचित त्याच ध्येय असावं.

भुरात वाचकाने काय पाहावे, तर एका तत्वज्ञान्याचा मनोवैचारीक प्रवास हा कसा घडत असतो हे बारकाईने पाहावे.अनिश्चित शारीरिक परिस्थिती व मानसिक परिस्थिती लेखकाचा शिक्षणसंबंधीच्या प्रवासातील अंतर्विरोध अधिकाधिक वाढवत असताना ते ज्या वेगाने आयुष्याला शोधण्यासाठी धडपड किंवा जगण्याच्या अंतरंगातील राहस्ये शोधण्याचे काम हातात घेऊन तत्त्वज्ञानाच्या प्रांतात स्वतःला सिद्ध करता, हे भुराच्या रूपाने बघायला मिळणे ही एक वाचक म्हणून माझ्यासाठी पर्वणीच होती.
विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक ध्येय कसे हस्तगत करावे याचे जिवंत मॅन्युअल (उदाहरणासाहित) आहे.
प्रॉफेशनल व्यक्तीसाठी कुठल्याही ध्येयाच्या पाठीमागे जाण्याअगोदर ते ध्येय स्वतःमध्ये योग्य पद्धतीने सापडणे किती महत्वाचे आहे याचे दिशादर्शक आहे

भुरा नीतशेचा सुपर ह्यूमन नाही, किंवा त्याची गरज पण त्याला नाही, पण हो; तो म्हणजे मिळालेले आयुष्य उच्च ध्येयाने जगण्यासाठी काय काय करावे व परिपूर्ण मानव होऊन जगावे याचे उदाहरण मात्र नक्की आहे. कुठल्याही ठाम भविष्याची गॅरंटी नाही अश्या परिस्थितीत आतमध्ये निर्माण झालेल्या पूरक तत्त्वज्ञानाने लेखकाला जो रस्ता दाखवला तो भुरातून त्यांनी सर्वांसमोर आणला ज्याचा फायदा येणाऱ्या पिढ्या घेतील.

..........
सचिन दाभाडे
औरंगाबाद

3 comments:

  1. प्रिय सचिनजी ,

    तुम्ही भुरा केवळ वाचले नाही तर साक्षात अनुभवले .आपल्यातला विद्यार्थी जिवंत आहे म्हणून शरदच्या विद्ववतेने भारावून गेलात ...आपण "भुरा ते प्रा शरद "या प्रवासाचे सहप्रवासी झालात .आपल्याला कपाशीची शेत अधिक जवळची ....आणि रानात कापूस वेचणारी "शहाणी आई "अधिक ओळखीची ....ती जितक्या कुशलतेने कापूस वेचते तितक्याच प्रतिभेने "जगण्याची तत्त्वही वेचते "...."मातीत राबणा-या ह्या माउली मातीचे गुणधर्मही घेत असाव्यात ,"soil may not look beautiful but it produces beautiful things"

    तुम्ही "भुरा "विषयी जे लिहले त्याने ,वाचकांना पुस्तकाविषयी "आकर्षण " नक्कीच वाढेल .

    ReplyDelete
  2. शरद जी तुम्ही मन, भान आणि बुद्धी जाणणारे आहेत ... हे फक्त आपणच लिहू शकता... आई माती तत्व हीच गोष्ट आपल्याला प्रेरित करणारी आहे हेच खरे💐🙇‍♂️🙏

    ReplyDelete
  3. आपली चिकित्सा प्रस्तूत पुस्तकाचे वाचन करण्यास प्रेरणा देणारी आहे. आपण केलेली मांडणी ग्रंथाच्या विशेष पैलू बद्दल भाष्य करणारी आहे जो निश्चितच अप्रतिम कलाकृींमध्ये दिसतो. अश्या पुस्तकाचे स्वागत.

    ReplyDelete