Saturday, July 21, 2018

स्वतःचा ट्रेंड तयार करा..!



कहो ना प्यार हे रिलीज झाला त्याच्या मागेपुढेच मेला ही रिलीज झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांची पसंतीचा ट्रेंड हा हिरोची मस्कुलाईन इमेज, भयंकर असलेले खलनायक, आणि फुल टू मालमसाला अश्या लाईनचा होता. 1999 च्या आसपासचा काळ असेल या काळात अगदीच नवखा असलेला, ऍक्टिगचे काहीच माहीत नाही अशा आमच्या महितीतला, त्यातच एक साधा सरळ प्रेमकहाणीचा प्लॉट घेऊन हृतिकचा कहो ना प्यार हे पडद्यावर आला .वडीलांच्या कर्तृत्वाच्या बळावर मिळालेली संधी यापेक्षा फार काही हृतिकचे वर्णन करता येणे शक्य नव्हते. त्यात तीन खानाच्या स्ट्रॉंग इमेज समोर याची इमेज म्हणजे एकदमच फुसकी, लहान बाळासारखे हसणं, एकदम प्रेमळ आणि दयाळू वागण,हे काय हिरोला शोभणार नव्हतं म्हणून हे सर्व निकालात निघणार हे स्पष्टच होते. कहो ना चे सुरवातीचे रिव्हिव आले, प्रेक्षकांच्या तोंडून बाजारात फीडबॅक शेअर होऊ लागले आणि पाहता पाहता तिकीट काढण्यासाठी प्रेक्षकांच्या रांगा लागल्या, घंटोंघंटे प्रेक्षक रांगेत उभे राहायला लागले, तेही एका अनपेक्षित सध्या सरळ स्टोरीसाठी आणि नवख्या हिरोसाठी.कशामुळे आवडला त्याची प्रत्येकाची आपापली वेगवेगळी करणे होती त्यावेळी. कमाल झाली होती पिक्चर सुपर हिट, हिरो सुपर डुपर हिट. भारतीय प्रेक्षकांनी हे नवीन वाण मोकळ्या हातानी आपल्या मनामनात पेरले, एवढे की त्याचे हृतिक मॅनिया नावाने तुफान पीक आले आणि तेही कुठलेही स्वतःचे बॅकग्राऊंड नसताना, आई बापाच्या पुण्याईवर म्हणत का होईना जिंकलस, तोडलस म्हणत भारतीयांनी या गोड वाटणाऱ्या माणसाला डोक्यावर घेतले आणि सुपरस्टार बनवले.

ट्रेंड वेगळा असतांना आपल्या सिनेमाचे काय होईल हा विचार न करता तो आहे तसा आला आणि ट्रेंड झाला. मुळात कारणे काहीही असोत तुमच्या प्रत्येक कृतीमधून  तुम्हाला रिसाल्ट मिळणार असतो फक्त कृती करायला मागेपुढे पाहू नका. तुम्हाला पाठिंबा आहे म्हणूनही लोक विरोध करतील आणि नाही म्हणूनही विरोध करतील ते त्यांना करू देत, तुम्ही तुमचे काम करत रहा. तुमच्या कुठल्या कृतीने तुमचे सोने होईल हे कदाचित सांगता येणार नाही पण सोने होईल हे 100% सांगता येईल. मी आजच्या काळास परिपूर्ण नाही किंवा मी लोकांना स्वीकार होण्यासारखा नाही अश्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त गोंधळात टाकतील आणि आधु बनवतील. मनात आलेले विचार करून पहा, काय रिसल्ट येतो ते बघा शक्य असल्यास त्यावर तज्ज्ञांचे मत घ्या झालेल्या चुका पुन्हा दुरुस्त करा आणि पुन्हा करून बघा आणि करून बघत राहा. तुमचं आवडत प्रॉडक्ट तुमच्या हाती येणार हे नक्की . एखाद प्रयत्न फसला किंवा हवा तसा रिसल्ट आला नाही की लगेच थांबू नका. कदाचित तुम्ही पाहिलेल्या स्वप्नाला आणखी काहीतरी हवेय, ते काय आहे ते शोधा आणि पुन्हा करून पहा. स्वतःच्या आयुष्याचा सुपरस्टार होण्यामागे अगदी काही वेळेचाच फरक असतो काही घटनांचाच फरक असतो तुमची छोटीशी कृतीही तुम्हाला तिथपर्यंत नेऊ शकते. ट्रेंडचा फार विचार करत बसू नका. स्वतःकडे करण्यासारखे असेल तर ट्रेंड तुम्हाला ही तयार करता येईल. जबाबदारी घ्या स्वतःचा ट्रेंड तयार करा.


....…........
सचिन दाभाडे

Wednesday, July 4, 2018

चित्रपट समाजाचा आरसा, शिक्षक नव्हे..!

मागे काही वर्षांपूर्वी एक मूवी बघितला 'वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट' हा मूवी जॉर्डन बेलफोर्ट या अतिशय मोठ्या पण वाया गेलेल्या आणि भ्रष्ट व्यावसायिकांवर बनवण्यात आला होता. लिओनार्दो दि कॅपरिओ याने जॉर्डन बेलफोर्ट ची भूमिका सिनेमात साकारलीय. प्रश्न आसा होता की अश्या व्यक्तीवर सिनेमा का बनवला ?. तो आपल्या व्यवसायात लोकांना फसवून चोऱ्या करून करोडो रुपयांची संपत्ती कमावतो, लोकांना कसे फसवायचे याचे सूत्र तो अख्या सिनेमाभर भरभरून सांगतो. याच्या आयुष्यात कुठलीच गोष्ट निषिद्ध नाही, अनगीणत स्त्रिया, जगातली सगळी व्यसने, लोकांना फसवून पैसे कमावण्याची प्रेरणा असलेल्या या व्यतिमत्वाचे रूप एवढे बिभत्स असूनही त्याच्यावर बायोपिक बनावण्यामागे दिग्दर्शकाला नेमके काय साध्य करायचे होते. हा व्यक्ती त्याच्या सर्व कुकर्मासाठी 4 ते 5 वर्ष जेल मध्येही जाऊन आला आणि नंतर बाहेर येऊन लोकांना आता तो व्यवसाय कसा करायचा याची ट्रेनिंग करतोय (युट्यूब वर त्याचे ट्रेनिंग विडिओ उपलब्ध आहेत) अर्थात यानेच सिनेमाचा शेवट आहे

पूर्ण सिनेमाभर पैसे, भ्रष्टाचार, फसवणूक, व्यभिचार, पराकोटीचा नशा, आणि आयुष्यभर केलेल्या गुन्ह्यासाठी शेवटी जेल असा एकूण प्लॉट. तिकडे हा मूवी आला लोकांनी पहिला आणि त्याचे खूप कौतुक ही झाले तिथल्या समीक्षकांनी या बायोपिकला कलेच्या परिघातच बघितले. आपल्याकडे संजूवर काही sms पाहिले तेंव्हा या चित्रपटाची प्रकर्षानं आठवण झाली. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे तो शिक्षक नाही हे विसरल्यामुळेच जे काम प्रत्येकाच्या पातळीवर प्रत्येकाला स्वतःला करायचे आहे ते सिनेमासारख्या माध्यमांकडून आपण अपेक्षित करू लागतो. चित्रपट तुम्हाला प्रेरित करतो पण तो तुम्हाला कुठे नेऊ शकत नाही. आपले समाजीक चरित्रच आपल्याला घेऊन जात असते पण ते काय आहे यावर विचारमंथन करण्याची कुणाला गरज वाटत नाही. आणि मग सगळी बाब चित्रपटावरच येऊन थांबते व्यवस्था बिघडवण्यासाठी जणू सिनेमाच आता राहिलाय आशा अविर्भावात त्याच्यावर आगपाखड केली जाते. असले चित्रपट हे आपले मेटफिजिकल कर्तृत्व दाखवायला आपल्याला सहज शक्य करून देते आणि मग बरेच जण त्यावर तुटून पडतात. आणि असे काही थांबवण्यात जर यश मिळालेच तर मग समाज बिघडवण्याचा एक मोठा धोका टाळल्याचा आनंद आपल्याला होणार असतो. किंवा समाजात एक चुकीचा समज पसरवू न देण्यात आपण यश मिळवले याचे समाधान आपल्याला मिळणार असते.

दिग्दर्शक हा आपल्या सामाजिक चारित्र्याच्या काही विरोधाभासी  हिंट्स त्याच्या कलेच्या माध्यमातून देऊ शकतो. म्हणजे जे आहे त्याच्या काही प्रमाणात तो दाखवतो तेही बऱ्याच वेळा प्रतिकात्मक, पण याउलट त्याने जे दाखवले त्यावरून मूळ समाजमनात काही फरक पडेल किंवा नुकसान होईल म्हणून त्याच्या कलेच्या नैतिकतेवर आपण प्रश्नचिन्ह उभे करतोय याची जाणीवही आपल्याला नसते. गिरीश कुलकर्णीचा 'देऊळ' सिनेमा असाच एक अप्रतिम सिनेमा, आपल्या सामाजिक चारित्र्याच्या विरोधाभासावर बऱ्याचश्या हिंट्स देणारी एक छान कलाकृती म्हणून आपण ती अनुभवलीय, तो सिनेमा आपल्याला आवडला आपण सगळ्यांनी तो जाऊन पहिला. संजू पाहताना मात्र आपण मुख्य पात्राची नैतिकता मोजायला घेतली, संजू बद्दल विरोधी sms सुरू झाले, असेच काही ठिकाणी दाखवलेले आपले शहाणपण लगेच भंपक झाले, कारण आपल्या सामाजिक व्यक्तिमत्वाला यातील विरोधाभास कसा पचवायचा हा प्रश्न होता आणि तो नेहमीच असतो आणि ते समजले नाही की लगेच विरोध सुरू. देऊळ, सैराट, PK, OMG या चित्रपटावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या अशाच गोंधळात असलेल्या समूहाचे प्रतीक आहे. सध्या देशभक्ती च्या मॉडेलची चलती असल्याने काही मुद्यावरून संजूला विरोध करणे क्रमप्राप्त होते.

सचिन दाभाडे.