दोन गवंडी घर बांधत असतात. एकाला विचारले, तू काय करतोय. त्यांनी उत्तर दिले मी विटा रचतोय. दुसऱ्याला विचारले; तू काय करतोय, त्याने सांगितलं, मी एक मोठं आणि सुंदर असे घर बांधतोय. खरं बघितलं तर दोघांचेही काम सारखे आहे, दोघेही एकाच ध्येयासाठी काम करताय, परंतु जेव्हा दोघांनाही स्वतःचे काम व्यक्त करण्याची वेळ आली तेव्हा दोघांनीही वेगवेगळी उत्तर दिली. आता आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की कुठला व्यक्ती किंवा कुठला गवंडी त्याचे काम कम्प्लीट झाल्यावर अतिशय आनंदी असेल; पहिला की दुसरा ?
पहिल्या गवंडीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने तो सध्या करत असलेल्या कामालाच त्याचे उद्दिष्ट म्हणून उत्तर दिले, तर दुसरा गवंडी हा त्या कामाचं शेवट किंवा आउटपुट डोळ्यासमोर ठेवून उत्तर देतोय. पहिल्याच्या कामातून त्यांचा उद्देश स्पष्ट होत नाही, तर दुसऱ्याच्या कामातून त्याचा उद्देश स्पष्ट होतो. त्यामुळे दुसरा गवंडी घर पूर्ण बांधून झाल्यावर त्याच्या पूर्णत्वाचा आनंद घेऊ शकेल, त्याच सेलिब्रेशन करेल, आणि पहिला मात्र यापासून वंचित असेल, याचे कारण जे त्याने पूर्ण केलेय ते त्याच्यासाठी रोजच्या कामासारखेच एक साधे काम असेल आणि त्यातून आनंद घ्यावा असे त्याला वाटावे हे दूर पर्यंत शक्य नाही. एखादे काम करत असताना ते कुठल्या उद्देशासाठी करतोय हे माहीत असेल तर ते काम पूर्ण झाल्यानंतर होणारा आनंदही मोठा असतो.
सध्या तुम्ही करत असलेल्या कुठल्याही कामाला भविष्याचा 'कनेक्ट' देता आला नाही तर त्या कामाचे मोठेपण आणि आनंद हा कमी किंवा नसल्यातच जमा असेल. हेच बघाना; जेंव्हा तुम्ही एखादा खड्डा खोदत असता तेंव्हा तुम्हाला दगड,माती यांचे विचार मनात येत नाही, तर तुम्हाला विहिरीतले पाणी दिसत असते. म्हणजेच तुम्हाला तुमची गरज सतत दिसत असते. समोरच्याला जेंव्हा तुम्ही फक्त खड्डा खोदताना दिसतात तेंव्हा तुम्हाला मात्र विहिरीचे पाणी आणि संपूर्ण विहीर दिसायला हवी. जेव्हा खड्डा खोदताना तुम्हाला विहीर दिसते, तेव्हा विहीर पूर्ण झाल्यानंतर तिचा पूर्ण होण्याचा आनंद तुम्हाला सगळ्यात जास्त असेल. म्हणून एखादं काम करतांना त्यामध्ये मनापासून आनंद घ्यायचा असेल, तर तिचा शेवट, रिझल्ट नजरेसमोर आना, त्याला व्हिज्युअलाइज करा. त्याला एक मोठ रूप द्या.
प्रश्नपत्रिका काढणाऱ्या एखाद्या शिक्षकाला विचारा, तो काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका, जर तो म्हणाला की परीक्षेसाठी प्रश्न काढतोय, तर लक्षात ठेवा त्याला मुलांच्या शिक्षण प्रक्रियेत फारसा आनंद असेलच याची खात्री देता येणार नाही, परंतु जर एखादा शिक्षक म्हणाला की विद्यार्थ्यांचं ज्ञान रिटेन होण्यासाठी किंवा त्यांना ज्ञानाची भूक वाढवण्याची नियोजन करतोय, तर मात्र आपण हा विश्वास ठेवू शकतो की नक्कीच विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगलं प्लॅनिंग हा शिक्षक करेल. एकूणच काय तर तुमचं आजचं काम हे फक्त आजच नाही तर ते तुमच्या उद्यावर, पुढच्या महिन्यांवर, पुढच्या वर्षावर आणि तुमच्या एकूण आयुष्यावर परिणाम टाकणारं आहे. तुमच्या भविष्याला विशाल व वेगळ वळण देणार आहे, असा भाव, अशी फिलिंग ज्या व्यक्तीमध्ये निर्माण होते, त्या व्यक्तीला काम पूर्ण झाल्यानंतरचा आनंद मोठा. म्हणून ज्या कामाचा शेवट डोक्यात आहे, ज्या कामाबद्दल पूर्ण चित्र डोक्यामध्ये आहे, त्याच कामाला हात घाला तसे नसेल, तर तसे चित्र तयार करून मगच पुढचा प्रवास करा.
कामाच्या शेवटचं चित्र किंवा पूर्ण चित्र डोक्यात नसेल तर सुरू असलेल्या कामातून तुम्हाला प्रेरणा मिळेल की नाही याबद्दल निश्चिती देता येणार नाही, कारण हे सर्व आपण कशासाठी करतोय हेच माहीत नसेल, म्हणून सुरू केलेलं काम तुम्हाला अपेक्षित अशा ध्येयावर घेऊन जाण्यासाठी धेयनिश्चित करा, आणि बघा तुमच्या रोजच्या कामात कसे अविश्वसनीय बदल होतात. एक अनपेक्षित ऊर्जेने तुमचे कार्य भरून जाईल आणि अभुतपूर्व उत्साहाने तुमचे सर्व विचार कामाला लागतील.
............................
सचिन दाभाडे
No comments:
Post a Comment