Friday, July 15, 2022

काही नोंदी..



निसर्ग समजणे एवढे सोपे नाही. रस्त्यावरून तुफान वेगाने धावणाऱ्या आपल्या गाडीच वेग थोडा कमी करावा लागतो आणि गाडी बाजूला घ्यावी लागते. खाली उतरावं लागत. इथून तो सुरू होतो, त्याचे नियम सुरू होतात. एसी मधून उतरल्या उतरल्या सुरवातीला लगेच ते नियम समजायला अशक्यप्राय, पण हळू हळू केंव्हातरी ते उमजायला सुरवात होते. दूर डोंगराच्या माथ्यावर उभं असणाऱ एखाद झाडं दृष्टीस पडत. डोंगरावर झाडांच्या गर्दीत दाट धुक्याची लादी फसलेली असते, पण हे बघून आपल्याला काहीच क्लू मिळत नाही.  

झाडांच्या पानांवर पडणारा थेंब पानावरून खाली घरंगळत जातांना थेंबाचा आकार बदलत बदलत जात असेल की; पानं त्यांना आकार बदलवूच देत नसतील. एवढं सूक्ष्म आकलन एखादा कवी किंवा साहित्यिकच करू जाणे. आपण मात्र मंद असतो बऱ्याच अंशी आणि बऱ्याच वेळेला. कदाचित आशा वेळेला हेन्री थोरो सारखी उमदी माणसं आपल्या संवेदनशील शब्दांनी आपल्यात अनंत पसरलेल्या उल्ल्हासित आणि उस्फुल्लीत निसर्गाला जागृत करतात. त्याच्यासारखे साहित्यिक कदाचित मानव व निसर्गामधील हा दुवा सतत जोडता ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न यासाठीच करत असावेत. थोरो निसर्गात एव्हढा एकात्म झाला होता की त्याने वॉल्डन तळ्याकाठीच आपले छोटेसे झोपडे बनवले व राहिला. आणि तेथेच त्याला त्याचे महान पुस्तक वॉल्डन सुचले, थेरोला समकालीन असलेला महान इमर्सन याला ही थोरो अंगावर आल्यासारखा वाटायचं एव्हढा तो नैसर्गिक होता.

दगडाच्या बाजूला असलेले एक झाड न्याहाळल ज्याची पाने गळाली होती. जोराचा पाऊस, वादळवारं त्याची फांदी आणि बुंध्याला धडका देत असतील. सततच्या पावसानं आणि वादळाच्या भडीमाराने फांद्या सतत ओलसर राहून पोकळ होत जाऊन बहुदा कुजत जातात. ज्या झाडाच्या फांद्या भोवती असलेली पाने गळून गेलेली आहे ती पोकळ होत जाऊन आणि कुजून जातात... थोड पुढे एक छोटा झरा शांत निवांत वाहत होता. त्याच्या बाजूनेच खूप गर्द झाडांची रांग सुरू झालेली दिसली, ती अगदी डोंगर माथ्यापर्यंत गेलेली. या झाडांच्या भोवती पानांची दाटीवाटी होती, यांच्या फांद्या व बुंधे ही मजबूत तजेलदार. पावसात काही काळ त्याच्या जवळ उभा राहिलो, पण त्या झाडाची फांदी आणि बुंधा काही ओला झाला नाही, मी मात्र पावसाच्या सरीत ओला झालो. ज्या झाडांभोवती हिरव्या पानांची लगबग असते ती झाडे कुजत नाही. सगळा पाऊस आणि वाऱ्याशी धडका घेत ते फांद्यांना सुरक्षित ठेवत असावेत. किती हा समतोल. म्हणजे कदाचित समतोल साधण्याचा प्रक्रियेला निसर्ग म्हणावे इतका.

निसर्ग व्यक्त होण्यासाठी मार्ग मोकळे करतो पण व्यक्त होण्याची आगतिकता संपवतो.  फारशी बांधाबांध करावी लागत नाही. हळू हळू तुमच्या डोक्यातील जंगल बाहेरील जंगलाशी एकरूप व्हायला लागले की निसर्ग सगळी गुपित सांगायला सुरुवात करतो.
ही गुपितच मानवाला आनंदमय कोषाकडे घेवून जात असावी.

सागाच्या झाडाच्या पानावर एक चिकटपणा असतो. कितीही पाऊस त्यावर पडला तरी पान झटकले की जसेच्या तसे होवून जाते. जणू काही झालंच नाही. पाण्याला डायरेक्ट पानांत शिरताच येत नाही. 

पानात पोहचायचय तर मुळातूनच जावे लागेल हा स्पष्ट संदेश असतो पाण्याला. 
नो शॉर्टकटस....

.....
सचिन दाभाडे

Friday, December 17, 2021

'भुरा' एक तत्वज्ञान्याची बखर.





भुरा हे शरद बाविस्कर यांच्या जीवनातील नाट्यमय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तत्त्वज्ञानाच्या गहन आणि अर्थपूर्ण पद्धतीचा मिलाफ करत लिहलेले अर्थपूर्ण आत्मचरित्र. पुस्तक वाचतांना अनेक महत्त्वाच्या ठिकाणी डोळ्याच्या कडा पाणावतात. आत्मचरित्र हे फक्त घटनांचे विवरणच असावे का? तर नक्कीच नाही. आत्मचरित्र कसे असावे याचे सध्या मी पाहिलेले उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भुरा. आत्मचरित्रातून ते लिहणार्याच्या आयुष्यातील घटनाच फक्त कळण्याऐवजी त्याची वैचारिक मनोभूमिका जीच्यामुळे व्यक्तीच्या आयुष्याला आकार मिळालेला असतो ते कळत असते. छोट्याछोट्या दुःखाना ज्याप्रमाणे लेखक जगाच्या मोठ्या प्रेरणेशी जोडतो त्यामुळे आपले आत्मचरित्र हे फक्त रावेरच्या 'भुरा' चे न राहता वैश्विक आशा 'शरद' चे झालेय. सर्व सामाजिक शास्त्रांना खोली आणि अर्थ देणारी मूळ शाखा म्हणजे तत्वज्ञान आणि अशा विषयावर आपण केलेले चिंतन मोठ्या परिपक्वतेने एका उच्च दर्जाच्या साहित्यकृतीतुन यावे तसे आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनांतून येत राहते आणि घटनांसोबत विचारांच्या विश्वात वाचक न्हाऊन निघत राहतो, एक प्रेरणादायी माणसाचे चरित्र वाचता वाचता एका तत्वज्ञाण्याचे मनोगत वाचकाचे भान घडवत राहते आणि नकळत त्याचे अनुभवविश्व संपन्न करत राहते.  

एकीकडे जेंव्हा वाचताना लेखकाच्या आयुष्यातील संघर्ष अस्वस्थ करत होता त्याचवेळेला लेखक त्या संघर्षाकडे ज्या वैश्विकतेतुन पाहत होते हे वाचताना व अनुभूती घेत असतांना एक उच्च कोटींची प्रगल्भता मला व्यक्तिशः देऊन गेला. वाचकाच्या आयुष्याला आत्मपरिक्षणाची संधी हे 'संवादी' आत्मचरित्र ठायी ठायी उपलब्ध करून देत राहणार.

आजूबाजूला आणि समाजात ज्या पद्धतीने संयम हरवून भावनेच्या लाटांवर स्वार होऊन तरुण लोकांचे लोंढे बरबाद होतांना बघतो, अगदी अश्या वेळेला स्वभान जागृत करून, भयंकर अंतरविरोधी परिस्थितीत, ध्येय निश्चित करून, त्यासाठी जीवाचे रान करणे काय असते, हे या पुस्तकात लेखकाला बघून लक्षात येते. तसेच जो कुणीही वाचेल त्यालाही हे समजेल आणि हे समजणे हीच व्यक्ती विकासाची पूर्वअट आहे हे मला नमूद करावे वाटते. आणि या सगळ्यामुळेच की काय भुरा व तो निर्माण करत असलेला अवकाश मला या काळाची ऐतिहासिक गरज वाटतेय. अर्धवट लोकांसाठी आपले लिखाण हे झणझणीत अंजन आहे. 

आजूबाजूला शिक्षणाचे वातावरण नसतांना ज्याप्रमाणे भग्नातेतून लेखकाची भरारी ही लक्ष वेधणारी आहे, त्याहीपेक्षा ज्या संयमाने तुम्ही नियतीच्या एका एका वर्तुळाकार चक्रातून महत्प्रयासाने बाहेर पडत गेलात, हे पाहणे संपन्न करणारे व दृष्टी चे कोण रुंदवणारे आहे. स्वतःबद्दल निर्माण होण्यारया संकुचित व्याख्या भुरा प्रचंड निर्दयतेने तोडत जातो. मान्यता प्राप्त यश मिळालेले असतांनाही भुरा थांबत नाही. तो आणखी पुढे जातो. पुढे जाणं आणि थांबणं काय असतं याची जणू व्याख्या भुरा निर्माण करू पाहतोय. मान्यता आणि अमान्यता निर्माण करणाऱ्या जगात ट्रान्सकॅनडेंटल अनुभव हे कादाचित त्याच ध्येय असावं.

भुरात वाचकाने काय पाहावे, तर एका तत्वज्ञान्याचा मनोवैचारीक प्रवास हा कसा घडत असतो हे बारकाईने पाहावे.अनिश्चित शारीरिक परिस्थिती व मानसिक परिस्थिती लेखकाचा शिक्षणसंबंधीच्या प्रवासातील अंतर्विरोध अधिकाधिक वाढवत असताना ते ज्या वेगाने आयुष्याला शोधण्यासाठी धडपड किंवा जगण्याच्या अंतरंगातील राहस्ये शोधण्याचे काम हातात घेऊन तत्त्वज्ञानाच्या प्रांतात स्वतःला सिद्ध करता, हे भुराच्या रूपाने बघायला मिळणे ही एक वाचक म्हणून माझ्यासाठी पर्वणीच होती.
विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक ध्येय कसे हस्तगत करावे याचे जिवंत मॅन्युअल (उदाहरणासाहित) आहे.
प्रॉफेशनल व्यक्तीसाठी कुठल्याही ध्येयाच्या पाठीमागे जाण्याअगोदर ते ध्येय स्वतःमध्ये योग्य पद्धतीने सापडणे किती महत्वाचे आहे याचे दिशादर्शक आहे

भुरा नीतशेचा सुपर ह्यूमन नाही, किंवा त्याची गरज पण त्याला नाही, पण हो; तो म्हणजे मिळालेले आयुष्य उच्च ध्येयाने जगण्यासाठी काय काय करावे व परिपूर्ण मानव होऊन जगावे याचे उदाहरण मात्र नक्की आहे. कुठल्याही ठाम भविष्याची गॅरंटी नाही अश्या परिस्थितीत आतमध्ये निर्माण झालेल्या पूरक तत्त्वज्ञानाने लेखकाला जो रस्ता दाखवला तो भुरातून त्यांनी सर्वांसमोर आणला ज्याचा फायदा येणाऱ्या पिढ्या घेतील.

..........
सचिन दाभाडे
औरंगाबाद

Friday, May 7, 2021

बंदी, संधी आणि औद्योगिक क्रांती..!




फ्रांस आणि इंग्लंडच्या युद्धात अमेरिका तटस्थ राहिला म्हणून इंग्लंड ने अमेरिकेला फिनिश्ड गुडस चा पुरवठा बंद केला आणि अमेरिकेत इंडस्ट्रीलायझेशनची सुरवात झाली. काळ होता 19 व्या शतकाच्या सुरुवातीचा. इंग्लंडकडून आलेल्या या अचानक व्यापारबंदीच्या झटक्यानंतर अमेरिका अंतर्मुख झाली व इंग्लंडच्या भरवश्यावर उभे व्यापार धोरण फार काही काळ तग धरणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. यामुळेच अमेरिकेने स्वतःकडे, त्यावेळपासून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या व उद्योगासाठी लागणाऱ्या नैसर्गिक साधनाकडे लक्ष देणे सुरू केले. 

ऑइल, लोखंड, इमारतीचे लाकूड, कॉपर आणि कोळसा या मूलभूत साधनाचे भरपूर साठे असूनही इंग्लंडवर आपण अवलंबून का आहोत? याची अमेरिकेला जाणीव झाली. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर जी कामे हाताने केली जायची ती यंत्राद्वारे करण्याची मोहीम हाती घेतली गेली. कॉर्पोरेट करार केले गेले. काही वर्षांपूर्वीच 90% इकॉनॉमी शेतीआधारित असतांना येणाऱ्या काही वर्षातच ती उद्योगाधारीत झाली. जेफर्सन आणि मॅडीसन हे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेतील औद्योगिक क्रांतीचे प्रवर्तक बनले. ब्रिटनने घातलेली बंदी पुढे चालून त्यांच्याच अंगावर आली, पण या बंदीच्या काळात अमेरिका मात्र खाडकन डोळे उघडून स्वतःच्या क्षमतेकडे पाहू लागला. अमेरिकेचे हे अंतर्मुख होणे इंग्लंडला काही वर्षांनी महागात पडणार होते. करण यानंतरच पोलादाचे भयंकर मोठे उद्योग अमेरिकेत उभे राहायला सुरू झाले. आणि हाच पोलाद व इतर उद्योग सगळ्या युरोपातील उद्योगधंद्यांना भविष्यात मुख्य पुरवठादार झाले.
बंदी, अडचणी ह्या आत्मनिर्भर होण्याच्या मार्गातील सर्वात मोठ्या संधी असतात, मग तो व्यक्ती असो किंवा देश ..!

.....................
सचिन दाभाडे

2000 च्या आसपास चा काळ आठवून पहा..! कपडे घ्यायला गेलो तर तुमच्या तालुक्यातील एक किंवा दोनच अशी मोठी कापड दुकाने असायची आणि त्यातील एखाद्याच दुकानात दुसरा मजलाही भरलेला दिसायचा, बाकी सगळीकडे एकाच फ्लोरला सगळं मिळायचे. अगदी जिल्ह्याच्या ठिकाणीही दोन फ्लोरची मोठी कापड दुकाने थोडी जास्त पण अगदी मोजकीच, थोड्या फार फरकाने एखादं दोन ठिकाणी अपवाद असेल. दुकानाचे आकारमान मर्यादित, कपड्याचे सर्व प्रकार साधारणपणे एकाच ठिकाणी, आणि त्यामुळे दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 3 ते 5 च्या घरात; एखाददोन मागेपुढे. काळ झपाट्याने बदलला. मागच्या 15 ते 20 वर्षात त्या साधारणतः सर्वच दुकानाचे दोन ते तीन फ्लोर झाले, लेडीज, जेन्ट्स आणि चाईल्डच नाही तर फक्त जेन्ट्स या एकाच प्रकारामध्येही वेगवेगळे सेगमेंट झाले. अगदी छोट्यातल्या छोट्या कापड दुकानाला ही दुसरा फ्लोर सहज आलाय आणि मोठ्या दुकानांनी अगदी मॉलला ही भारी भरेल एवढा पसारा उभा केला. या सगळ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या एका दुकानात 25 ते 50 पासून 150 च्या घरात जाऊन पोहचली. 

जास्त मॅनपॉवर ही जशी प्रगतीचे लक्षण आहे, तसे ती आपल्यासोबत काही आव्हाने पण घेऊन येते. आता हे कपड्याचे दुकान फक्त कपड्याचे दुकान राहिले नाही, कारण तिथे आता 40 ते 50 लोकांचा स्टाफ काम करतो. या पूर्वी जिथे एका कापड विकणाऱ्या दुकानदाराला फक्त कस्टमर कडे लक्ष द्यावे लागत, तिथे त्याला आता ग्राहक असो नसो हे 50 आणि त्यापुढेही जाऊन पोहचलेल्या पर्मनंट कर्मचाऱ्यांच्या रोजच्या नियोजनाचे आव्हान आहे. या सर्वांचे योग्य नियोजन आणि त्यांच्या उर्जेला आवश्यक असणारी दिशा हाही आता या उद्योगात पूर्वीपासून काम करणाऱ्या व्यापारी व उद्योगीसाठी मुख्य विषय आहे.

या मोठ्या स्टाफ चे काय करायचे ? जुने होते तसे चालू द्यायचे की नवीन पद्धतीने या कर्मचाऱ्यांचे नियोजन करायचे.  बाहेरील कस्टमर जेवढा महत्वाचा होता तेवढाच आता हा आतला कस्टमर उद्योजकासाठी महत्वाचा आहे. बऱ्याच व्यापाऱ्यांना हे आव्हान म्हणून लक्षात जरी आलंय, तरी काहीजण वेळ काढताय, काही दुर्लक्ष करताय, काहींची चालढकल सुरुय, काही फक्त नाव मार्केट मध्ये असावे म्हणूनच अस्तित्वात आहे , टिकायचे असेल तर या आतल्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कास्टमरला तयार करावे लागेल..

हा बदल फक्त मान्य असणे पुरेसे नाही तर त्यासाठी तयारी करण्यास सगळ्यात पाहिले जे पुढे येतील ते त्या भागात मार्केटचे भविष्यातील फायदे घेतील..!

..........…..........


सचिन दाभाडे

Monday, April 26, 2021

हट्ट आणि संकल्प

हट्ट आणि संकल्प यामध्ये मूलभूत फरक म्हणजे; हट्टीपणामध्ये स्वतःला काही मिळवण्यासाठी दुसऱ्याने आपल्यासाठी प्रयत्न करावे, हे अपेक्षित असते, तर संकल्पाचा भाव हा कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःला त्या कामासाठी तयार करत असतो. वरवरून हट्टी व्यक्ती आणि संकल्पि व्यक्तीं दोघांनाही इच्छिलेले हवेच असते, पण काही कारणाने ते मिळणे बंद झाले तर संकल्पि व्यक्ती प्रयत्न करत राहतो, तर हट्टी प्रतिक्रियात्मक होऊन दोष देणे सुरू करतो व नकारात्मक ऊर्जेने भरत जातो. आपण हट्टी आहोत की संकल्पि हे वेळोवेळी तपासत राहिले पाहिजे.

इकोपॉइंट..!

आपलं शरीर बाहेरून येणाऱ्या इच्छा, ध्वनी, यांनी कार्यान्वित होते, की ते आतूनच निर्माण होणाऱ्या स्वतंत्र इच्छा, भाव यांचे निर्मिती केंद्र आहे. पर्वताच्या कड्यावर उभे राहून मोठ्याने ओरडला तर तोच ध्वनी पुन्हा परत आपल्या कानावर आदळतो. हा काही नवीन निर्माण झालेला ध्वनी नसतो. आपलं शरीर ही असेच इको पॉईंट बनलेला आहे का ?. इको पॉंइंट सारखेच आपण नेहमी कुणाच्यातरी इच्छा ध्येय आणि भावना यांना रिस्पॉन्स करत असतो. आपले शरीर हे याबाबतीत स्वतंत्र क्रिया करण्याऐवजी बाहेरून येणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करत असते व त्यालाच स्वतंत्र क्रिया समजत असते. हा गैरसमज लवकर दूर व्हायला हवा. 

रशियन मानसशास्त्रज्ञ पावलाव्ह, या प्रतिक्रिया देण्याच्या माणसाच्या सवयीवर स्टीम्युलस (स्वतंत्र क्रिया) आणि रिस्पॉन्स (प्रतिक्रिया) ही पद्धत विकसित करतांना म्हणतो मनुष्याचे आयुष्य हे आपल्या शरीराबाहेर तयार झालेले घटनेला (स्टीम्युलस) ला प्रतिक्रिया (रिस्पॉन्स) देण्यामध्ये खर्च होत असते. हे स्टीम्युलस म्हणजेच बाहेरील वातावरणात घडणाऱ्या मुख्य घटना असतात, ज्यात नैसर्गिक, मानवीय दोन्ही प्रकारचा समावेश होतो. प्रत्येक व्यक्ती याला आपल्या कृवतीप्रमाणे रिस्पॉन्स देत असतो. मानवाच्या या कुवतीवर त्याने भाष्य केले, यावरून मानवी वागणुकीची रीत एका नवीन अर्थाने जगासमोर आली.

पण त्याही पुढे जाऊन व्हिक्टर फ्रांकेल याने या बाहेरील प्रभावाला न जुमानता व्यक्ती आपल्या आतमध्ये निर्माण होणारा स्वतंत्र असा रिस्पॉन्स- (स्वतंत्र भाव) निर्माण करू शकतो जो या बाहेरील प्रभावातून मुक्त आहे. या स्वतंत्र भाव निर्माण करण्याच्या मनुष्याच्या शक्तीला फ्रांकेल त्याच्या Man's search for meaning मध्ये 'इंडिपेंडंट विल' असे म्हणतो. बाहेरील घटना किंवा क्रियांना रिस्पॉन्स देत असतांना घटनेच्या प्रभावात न येता स्वतःची एक स्वतंत्र विल प्रत्येक व्यक्तीला निर्माण करता येऊ शकते, जी कुठलाही प्रभावातून मुक्त असते. या विल (will) नुसार केलेली कृती मनुष्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात नाविन्यपूर्ण आणि सकारात्मक रिझल्ट देऊ शकते.

तुमचा आजचा विचार किंवा भाव हा पेपर मधील बातम्यांचा प्रभाव, टीव्हीवरील घटना, बातम्या व विभत्स्य व्हिडीओ, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप युट्युबद्वारे बघितलेल्या स्टिम्युलेट करणाऱ्या घटना व मेसेजेस यातून निर्माण झालाय की तो या पेक्षा स्वतंत्र आहे, वेगळा आहे, तुमचा आहे, की तो विचार तुम्ही या सगळ्या बाहेरील स्टीम्युलसला प्रतिक्रिया देण्यातुन निर्माण झालाय हे बघता आले पाहिजे. 
एक प्रयोग करून बघा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले किती विचार, घटना व भाव हे बाहेरून आलेले आहेत किंवा त्याला प्रतिक्रिया म्हणून आलेले आहेत व किती स्वतः मध्ये तयार झालेले आहेत. एका रकान्यात बाहेरून आलेले आणि दुसऱ्या रकान्यात आतून निर्माण झालेले (इंडिपेंडंट), असे दोन भागात वर्गीकरण करून लिहा. कुठले जास्त भरताय याचे रोज अवलोकन करून बघा. ही कृती प्रामाणिकपणे केली तर बरीच दृष्टी मिळेल.

हीच इंडिपेंडंट विल म्हणजे 'स्वतंत्र इच्छाशक्ती'  सर्जनशीलतेची खरी आधारशीला आहे. ही तीच सर्जनशीलता जी जद्दु कृष्णमूर्तींनां अभिप्रेत आहे, जीला ते आपल्या शिक्षणविषयक सगळ्या विचारात प्रामुख्याने मांडतात. शासनाने मुलांना लहानपणापासूनच सर्जनशील आणि कृतीयुक्त बनवण्यासाठी त्यांच्या या पद्धतीचा प्राथमिक शिक्षणात समावेश केला परंतु तेवढ्याश्या प्रमाणात ती आपल्या शिक्षण पद्धतीत आणखी रूढ होने बाकी आहे.


...............

सचीन दाभाडे

पुस्तकं, हेतू आणि स्मरणशक्ती

पुस्तक एकदा वाचल्यावर ते पूर्ण लक्षात राहते हे बऱ्याच व्यक्तीबद्दल किंवा अभ्यासकांबद्दल आपण ऐकतो किंवा ऐकलेले असते. हे दुसरं तिसरं काही नसून पुस्तक लिहित असतांना लेखकाने कुठला विचार आधारासाठी योजला आहे ते लक्षात येणे होय. कुठलेही पुस्तक तुम्ही हातात घ्या त्यामध्ये लेखकाचा काही हेतू असतो. थोडं वैज्ञानिक पद्धतीत सांगायचं झालंच तर 'गृहीतक' असते. हे गृहीतक किंवा विचार व्यक्त करण्यासाठी पुस्तकांमध्ये वेगवेगळी उदाहरणें, दृष्टांत, सिद्धांत सांगितलेली असतात. पुस्तकातील कथानक त्यातील पात्रे, मांडलेले विचार हे सगळे लेखकाच्या हेतू भोवती फिरत असतात. तो हेतू वाचन करत असतांना वाचकाला जसा जसा समजायला लागतो, तशी तशी पुस्तकातील मांडणी आपल्या स्मरणात अधिक पक्की होते. कधी कधी तर सुरवातीचे काही पाने वाचल्यावरच पुढे काय लिहले असेल याचा अंदाज येऊन जातो.

एकदा मुख्य विचार समजला की पुस्तकातील बाकी शब्दरचना त्या विचारासाठीच योजलेल्या आहेत हे ओघाने समजायला लागते, त्यामुळे पुस्तक वाचनाचा वेग आणि स्मरणक्षमता दोन्ही वाढतात. बऱ्याच वाचकांना शेवटपर्यंत पुस्तकातील मूळ विचार किंवा हेतू हे शेवटपर्यंत समजत नाही, त्यामुळे त्याला पुस्तकातील सगळे संदर्भ वेगवेगळ्या पातळीवर लक्षात ठेवावे लागतात जे समजायला व लक्षात ठेवायला अडचणीचे असते.

वेगवेगळ्या क्षेत्रातील चौफेर वाचनातून हेतू समजण्याची आपली क्षमता ही विस्तारत जात असते, अर्थात ही हळू हळू होणारी आणि सूक्ष्म प्रक्रिया आहे. तिला वाचनातून सतत बळ देत राहिलं पाहिजे, म्हणजे पुस्तकं वाचल्यावर लक्षात राहायला लागतात व त्यांचा आयुष्यात योग्य ठिकाणी उपयोग व्हायला लागतो.



........
सचिन दाभाडे