Wednesday, February 12, 2025

पुस्तकं वाचनालये आणि आपण...

तरुण पिढी, गावाकडची मुलं, काही प्रमाणात शहरातली मुलं, ही पुस्तकं वाचत नाही, वचन संस्कृती लयाला चालली आहे. अशी एक सर्वसामान्य ओरड नेहमी बघायला मिळते; पण ज्या ठिकाणी पुस्तक वाचत नाही अशी ओरड होते, त्या भागातील वाचनालये आपण एकदा जाऊन बघितली पाहिजेत. जुन्या कथा, कादंबऱ्या, अनेक समकालीन रेफरन्स नसलेली पुस्तके आणि नवीन पिढीला अगदी गंधही नसलेली अशी अनेक विषय आणि त्यावरील पुस्तके आपल्याला या लायब्ररीमध्ये आढळतात. मागील पिढीला कदाचित या पुस्तकांनी प्रेरित केलेही असेल. त्याचे संदर्भ तेव्हा त्यांच्यासाठी नवीन असतीलही, परंतु कुठलेही पुस्तक नव्या पिढीला तेव्हाच आकर्षित करू शकतात जेव्हा ते त्यांची मानसिक, शैक्षणिक आणि समकालीन ज्ञान मिळवण्याच्या गरजा पूर्ण करतील. आजच्या पिढीला कुठलं ज्ञान आकर्षित करत आहे हे जर पाहिलं तर विज्ञान-तंत्रज्ञान आयटी, उद्योग, मॅनेजमेंट एवढाच नाही तर अध्यात्माचं एक नवीन स्वरूपात झालेल्या प्रगटीकरण, जगाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान देणारी शास्त्रे हे सर्व आजच्या पिढीला आकर्षित करत आहे, नव्हे त्याबद्दल ते वाचण्याचा प्रयत्नही करत आहे. असे नसते तर मोठ्या प्रमाणावर करोडोचा टर्नओव्हर करणाऱ्या ऑनलाईन पुस्तक विक्री कंपन्या या एवढ्या भरभराटीला आल्या नसत्या. या पिढीला जे हवं आहे ते देणारी पुस्तक आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री करताना दिसतात, ज्यामध्ये मॅनेजमेंट वर येणारी, विज्ञानाच्या परिभाषा नव्या पद्धतीने सांगणारी, मानसिक विकासावर आधारलेली, शैक्षणिक विकासाच्या वेगवेगळ्या थेअरी मांडणारी, उद्योग जगताच्या ज्ञानाविषयी भरभरून सांगणारी, नवीन राजकीय नेत्यांची आत्मकथन इत्यादी अनेक प्रकारची पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. नवीन पिढी जी वाचन करते ती या प्रकारचं वाचताना दिसते. 
परंतु पुस्तक वाचत नाही असं म्हणणाऱ्या, अशी ओरड असणाऱ्या भागातल्या लायब्ररींना जेव्हा जाऊन आपण भेटतो, तेव्हा त्या भागातल्या पुस्तकालयात काय आढळते, तर यापैकी काहीच नाही. मग ही पुस्तक नेमकं येऊन वाचणार तरी कोण. जर तुमची पुस्तकं येणाऱ्या जगातील भाषा बोलणाऱ्या मुलांच्या मानसिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक गरजा पूर्ण करणार नसतील तर ती काय कामाची असाही प्रश्न आहेच.. 

वाचनाचा छंद असणं आणि ज्ञानवृद्धीसाठी वाचन करणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. छंद असणाऱ्या लोकांना फक्त वाचायचं असतं त्यातून काय मिळणार याकडे त्यांचे लक्ष नसते. ही लोक रस्त्यावर पडलेला कागदाचा तुकडाही उचलून वाचतील. अशा लोकांना ही जुनाट वाचनालय पचतीलही, परंतु स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी वाचणाऱ्या येणाऱ्या पिढ्यांना, पुस्तकाचे वाचन हे त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी एक साधन असते, अशांसाठी ही वाचनालय कुचकामी ठरतात.

वाचनालय व्यवस्थित चालावे असे वाटते तर तर ती पुस्तकांच्या दुकानांसारखी प्रवाही असावीत. नवीन येणाऱ्या पुस्तकांचे प्रदर्शने लायब्ररींमध्ये भरावीत. सगळ्या प्रवाहातील पुस्तकांचे प्रतिनिधी असणारी पुस्तके लायब्ररीमध्ये प्रथमदर्शनी मांडली जावीत, त्यावर पैसे खर्च करावे. दर महिन्याला नवीन पुस्तके आली पाहिजेत. नवीन प्रकाशकांची पुस्तके यावीत, नवीन लेखकांची पुस्तके यावीत आणि पुढच्या महिन्यात कुणाची येणार आहे याचे बोर्ड झळकावेत.राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सर्वच. परंतु यासाठी सातत्याने खर्च येतो आणि तो करायची तयारी नसते. समष्टीच्या ज्ञानासाठी पैसे खर्च करणार तरी कसे. त्यामुळे निर्माण झालेले अनेक वाचनालय ही स्टॅगनंट असतात. त्यात पडणाऱ्या नाविन्यपूर्ण पुस्तकांची भर ही अगदी नसल्यातच जमा...! 

आणि पुस्तक वाचनाचच जर म्हटलं तर नवी पिढीच काय जुनी पिढी ही पुस्तकं वाचत होती असे ठोस पुरावे नाहीत. दुसरे असे की जुन्या पिढीकडे एवढा पैसा नसल्याने त्यांना पुस्तकं जी काही मिळायची ती लायब्ररीच्या आधारेच, म्हणून तेव्हा थोडे फार वाचन दिसायचे. आज पैसाही आहे आणि तो न खर्च करता ऑनलाइन पुस्तक मिळण्याची सुविधाही आहे त्यामुळे ही पिढी जे वाचते आहे ते वेगळ्या स्वरूपातील आहे. त्यामुळे या स्टॅगनंट झालेल्या वाचनालयांच्या स्वरूपाला बदलायला हवे तरच जनरेशन झेड आणि पुढील पिढ्या याकडे फिरकतील.

...........


सचिन दाभाडे
8390130362