Friday, January 31, 2025

मोटिवेशनल लेखक आणि समग्रतेची वाणवा


 शिव खेरा यांची दोन पुस्तकं... पहिलं पुस्तक कदाचित 1998 99 च्या काळामध्ये प्रकाशित झाला असेल 'जीत आपकी', कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात वाचलेली.. यू कॅन विन.. आणि त्यानंतर 25 ते 26 वर्षानंतर दुसरे पुस्तक आले ते म्हणाजे 'लिव्ह व्हाईल यू आर आलाईव्ह' . पहिल्या पुस्तकाची भाषा बघा त्याद्वारे दिल्या जाणारा संदेश बघा आणि दुसऱ्या पुस्तकाची भाषा आणि त्या दिल्या जाणारा संदेश दोन्हीही एकमेकांपासून अगदी भिन्न.. पहिल्या पुस्तकांमध्ये तुम्ही जिंकू शकता तुम्ही जिंकायलाच हवं आणि त्यासाठी तुम्ही काय काय केले पाहिजे याबद्दल जोर देऊन केलेली सगळी मांडणी. यश मिळवण्यासाठी एकच नाही तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या पाहिजेत आणि म्हणून जो जिंकतो तोच लीडर असतो हे सांगणार पहिले पुस्तक.


आणि; जर, योग्य वेळी थांबला नाहीत तर तुमचा अंत निश्चित आहे अशी आशयाची मांडणी करणारे दुसरे पुस्तक. टेक ब्रेक बिफोर यू ब्रेकडाऊन असे ठळकपणे सांगते. रिलॅक्स रहा. स्वतःला वेळ द्या, स्वतःला समजून घ्या, फक्त यशापाठीमागे न धावता कामाशी स्वतःलां बॅलन्स करा, अशीच एकंदरीत मांडणी. म्हणजे पळू नका, ब्रेक घ्या, ब्रेक डाऊनची भीती आणी त्याला अधोरेखित करणारे लिखाण.

आयुष्यात यश मिळवतांनी येणाऱ्या स्ट्रेसला बॅलन्स करताना त्याकडे लक्ष द्यावे असे सांगताना नुसते परफॉर्मन्सच्या मागे धावून जमणार नाही तर वर आयुष्य बॅलेन्स असले पाहिजे यावर यात फोकस केला गेलेला आहे.. 


लेखकाचा काळ कसा त्याच्यावर, त्याच्या अनुभवावर स्वार असतो तो कितीही तटस्थपणे लिहीत असला तरी त्याचं वय आणि त्याच्या अनुभवाची, जे खूप वैयक्तिक असतं, त्याची भाषा करत असते. आणि हेच त्याने काय लिहावं हे सांगतो. हे शिव खेरांच मानसिक आणि एकंदरीत अनुभवाचे स्थित्यंतर दाखवणार लिखाण अतिशय गमतीशीर आहे. यासोबतच हे बघताना हेही समजून घेण्यासारखे आहे की यश आणि यशाच्या संकल्पनेला सातत्याने, ती तुमच्या बाहेर आहे असे सांगणारे नरेटीव एका विशिष्ट वयानंतर यशाची समज आणि कल्पना ही आतून उदय पावते आणि ती बहिर्गत नाही तर अंतर्गत आहे असे सांगण्याकडे वळते. प्रश्न हा आहे की लेखक स्वतःच संपूर्ण आयुष्याची एकत्रित समज करून घेऊन हे स्थित्यंतर समजून घेऊन, यशाची एकात्मिक जाणीव का करून देत नसतील. किंवा तेवढं थांबून तसा अनुभवून मग लिहिण्यास त्यांच्याकडे वेळ नसावा.

थोड्या फार अनुभव अनुभवानंतर लगेच यश अपयशाच्या व्याख्या म्हणून त्याचे तत्वज्ञान उभा करून मोकळे होऊन जायचं याची एवढी गडबड का ?.

यात विशिष्ट वयाच्या टप्प्यावर जेवढं समजलं तेवढं परसेप्शन घेऊन त्याला यशाच्या व्याख्येत बसून बाजारात आणण्याचे प्रयत्न फक्त फुटकळ संकल्पना मांडण्या पुरतेच राहतात, पुढे चालून त्याचा रेलेवंस संपला की मग यशाची खरी व्याख्या सांगताना पुन्हा दुसरच काहीतरी लिहावं लागतं. अशी वेळ अनेक लेखकांवर आलेली मी पाहिलेली आहे. 


एखाद्या लेखकाने मांडलेली एक संकल्पना बदलायला किंवा त्यामध्ये बदल समाविष्ट करायला भविष्यातील विचारवंतांना फार काही करायची गरज पडत नाही, कारण मूळ लेखकच स्वतः वीस पंचवीस वर्षानंतर आपण मांडलेल्या संकल्पनेला पुन्हा बदलून मांडतो. 


मुद्दा आहे कुणाचे वाचावे. ज्या लेखकाला आयुष्याकडे समग्र बघण्याची दृष्टी प्राप्त झालेली आहे. आयुष्याच्या विविध अनुभवातून चिंतनातून आणि समग्र जाणीवेतून ज्याचं लिखाण काळाच्या कसोट्यांवर मान्यता पावलं आहे असं लिखाण वाचलं पाहिजे किंवा तस लिहिता यावं अशी अपेक्षा लेखककडून असायला हवी. नाहीतर आयुष्याने पुरवले आणि आयुष्य सुचवू इच्छिणारे हे असले शिफ्ट लेखकालाच बॅलेन्स करता येत नसतील आणि त्याची समग्र व्याख्या करून आपल्या लिखाणाला युनिक आणि समग्रपणे मांडता येत नसेल तर असलं काही लिहून तरुण कर्तुत्ववान आणि जगात सक्षमपणे काहीतरी करू इच्छिणाऱ्या आणि आयुष्याला समग्रपणे पाहू इच्छिणाऱ्या तरुणांचे नुकसान होते. ते तुमचं लिखाण वाचत बसतात आणि जे पटेन्शियली वाचायचं सोडून खूप काहीतरी वाचलं आहे अशा अविर्भावात जगत राहतात. त्यानंतर भविष्यात निर्माण होणाऱ्या  कॉन्ट्रोवर्सीजला  या लिखाणाचा आणि वाचनाचा काही उपयोग होत नाही मग त्या कॉन्ट्रोवर्सीज सोडवण्यासाठी हेच लेखक पुन्हा काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात. 


एकूणच काय तर आपल्या बुद्धीला एकत्वाची समग्रपणाची जाणीव देणारे लिखाण शोधावे आणि तेच वाचावे. असे लिखाण जे कालांतराने आपल्या अनुभवाच्या कसोटीवर खरे उतरत राहील आणि आयुष्यातल्या वेगवेगळ्या आंतरविरोधावर ते एक सम्यक उपाय म्हणून सातत्यपूर्ण मार्गदर्शन करत राहील. असे झाले तर मोजक्या पुस्तकातही आयुष्याला बॅलन्स करण्याचा आणि त्यानुसार सुंदर आयुष्य जगण्याचा समतोल उपाय सापडेल.


सचिन दाभाडे