Friday, July 15, 2022

काही नोंदी..



निसर्ग समजणे एवढे सोपे नाही. रस्त्यावरून तुफान वेगाने धावणाऱ्या आपल्या गाडीच वेग थोडा कमी करावा लागतो आणि गाडी बाजूला घ्यावी लागते. खाली उतरावं लागत. इथून तो सुरू होतो, त्याचे नियम सुरू होतात. एसी मधून उतरल्या उतरल्या सुरवातीला लगेच ते नियम समजायला अशक्यप्राय, पण हळू हळू केंव्हातरी ते उमजायला सुरवात होते. दूर डोंगराच्या माथ्यावर उभं असणाऱ एखाद झाडं दृष्टीस पडत. डोंगरावर झाडांच्या गर्दीत दाट धुक्याची लादी फसलेली असते, पण हे बघून आपल्याला काहीच क्लू मिळत नाही.  

झाडांच्या पानांवर पडणारा थेंब पानावरून खाली घरंगळत जातांना थेंबाचा आकार बदलत बदलत जात असेल की; पानं त्यांना आकार बदलवूच देत नसतील. एवढं सूक्ष्म आकलन एखादा कवी किंवा साहित्यिकच करू जाणे. आपण मात्र मंद असतो बऱ्याच अंशी आणि बऱ्याच वेळेला. कदाचित आशा वेळेला हेन्री थोरो सारखी उमदी माणसं आपल्या संवेदनशील शब्दांनी आपल्यात अनंत पसरलेल्या उल्ल्हासित आणि उस्फुल्लीत निसर्गाला जागृत करतात. त्याच्यासारखे साहित्यिक कदाचित मानव व निसर्गामधील हा दुवा सतत जोडता ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न यासाठीच करत असावेत. थोरो निसर्गात एव्हढा एकात्म झाला होता की त्याने वॉल्डन तळ्याकाठीच आपले छोटेसे झोपडे बनवले व राहिला. आणि तेथेच त्याला त्याचे महान पुस्तक वॉल्डन सुचले, थेरोला समकालीन असलेला महान इमर्सन याला ही थोरो अंगावर आल्यासारखा वाटायचं एव्हढा तो नैसर्गिक होता.

दगडाच्या बाजूला असलेले एक झाड न्याहाळल ज्याची पाने गळाली होती. जोराचा पाऊस, वादळवारं त्याची फांदी आणि बुंध्याला धडका देत असतील. सततच्या पावसानं आणि वादळाच्या भडीमाराने फांद्या सतत ओलसर राहून पोकळ होत जाऊन बहुदा कुजत जातात. ज्या झाडाच्या फांद्या भोवती असलेली पाने गळून गेलेली आहे ती पोकळ होत जाऊन आणि कुजून जातात... थोड पुढे एक छोटा झरा शांत निवांत वाहत होता. त्याच्या बाजूनेच खूप गर्द झाडांची रांग सुरू झालेली दिसली, ती अगदी डोंगर माथ्यापर्यंत गेलेली. या झाडांच्या भोवती पानांची दाटीवाटी होती, यांच्या फांद्या व बुंधे ही मजबूत तजेलदार. पावसात काही काळ त्याच्या जवळ उभा राहिलो, पण त्या झाडाची फांदी आणि बुंधा काही ओला झाला नाही, मी मात्र पावसाच्या सरीत ओला झालो. ज्या झाडांभोवती हिरव्या पानांची लगबग असते ती झाडे कुजत नाही. सगळा पाऊस आणि वाऱ्याशी धडका घेत ते फांद्यांना सुरक्षित ठेवत असावेत. किती हा समतोल. म्हणजे कदाचित समतोल साधण्याचा प्रक्रियेला निसर्ग म्हणावे इतका.

निसर्ग व्यक्त होण्यासाठी मार्ग मोकळे करतो पण व्यक्त होण्याची आगतिकता संपवतो.  फारशी बांधाबांध करावी लागत नाही. हळू हळू तुमच्या डोक्यातील जंगल बाहेरील जंगलाशी एकरूप व्हायला लागले की निसर्ग सगळी गुपित सांगायला सुरुवात करतो.
ही गुपितच मानवाला आनंदमय कोषाकडे घेवून जात असावी.

सागाच्या झाडाच्या पानावर एक चिकटपणा असतो. कितीही पाऊस त्यावर पडला तरी पान झटकले की जसेच्या तसे होवून जाते. जणू काही झालंच नाही. पाण्याला डायरेक्ट पानांत शिरताच येत नाही. 

पानात पोहचायचय तर मुळातूनच जावे लागेल हा स्पष्ट संदेश असतो पाण्याला. 
नो शॉर्टकटस....

.....
सचिन दाभाडे