अक्षय कुमार सुनील शेट्टी हे माझे लहानपणीचे सगळ्यात आवडते हिरो कारण ते अफलातून फाईट करायचे. ते फाईट करायला लागल्यावर कितीही गुंड आले तरी मला त्यांच्या सुरक्षिततेबद्दल कधीच चिंता वाटायची नाही. ते निपटून घेतील असाच फील असायचा त्यांना पडद्यावर पाहतांना. जसा जसा मोठा होत गेलो तसे तसे अक्षय कुमारचे मारधाडीचे चित्रपट तेव्हढेसे अवडेना झाले. त्याच्या पेक्षा अजय देवगणला पाहणं बरं वाटायला लागलं. एक काळ असा आला की त्याचे सिनेमे साधारणतः फ्लॉपच्या कॅटेगिरीत जाणे सुरू झाले होते. मला माहीत होते की हे का होत असेल. त्याला आता सतत फाईट करत पाहणेही प्रेक्षकांना नकोसे झाले असेल. काय वेळ असेल ती जेंव्हा त्याला एक हिरो म्हणून हे अनुभव येत असतील. काही वर्षाने एक मित्रा मला भेटला, तो नुकताच एक सिनेमा पाहून येत होता. मी विचारले काय झाले हसायला. तो हसता हसता म्हणाला, अरे भयंकर भन्नाट सिनेमा पाहून आलोय. माझं प्रश्नचिन्ह तसेच, तो म्हणाला; मी सारख तीन तास पोट धरून हसतोय. एक नवीन सिनेमा आहे "हेरा फेरी" म्हणून, तो बघून येतोय,इतकी तुफान कॉमेडी आहे की बस. मी विचारले कोण आहे हिरो. तो म्हणाला अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी. मला एकदम धक्का बसला..! सुरवातीला विश्वास बसेना अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी, हे कसं शक्य आहे. या दोघांचा आणि कॉमेडीचा काय संबंध. बर केली जरी असेल तरी पोट धरून हसायला लावेल अशी कशी शक्य आहे ?. तो म्हणाला विश्वास नसेल तर आजच बघून घे. अर्थात मी लगेच विश्वास ठेवणार नव्हतोच. 15 दिवस बऱ्याच जणांकडून जेंव्हा हीच प्रतिक्रिया ऐकली तेंव्हा औरंगाबादच्या आंबा अप्सरामध्ये मी शेवटी हेरा फेरी पाहायला गेलोच.
बाहेर आलो तेंव्हा हिंदी चित्रपट सृष्टीतील एक वेगळ्या धाटणीच्या विनोदी सिनेमांचा सुत्रपात करणारा अश्या नव्या प्रकारचा कलाकृतीचा अविभाज्य भाग होऊनच बाहेर आलो. एक भन्नाट कॉमेडी, अफलातून ऍक्टिगं, कुठेही विनोदाचे प्याचप नाही, तर अक्खा सिनेमाचं असा काहीं बांधला होता की विसंगती आणि कॅरेक्टर्सची बेमालूम जुगलबंदी यांनी तुम्ही सतत हसत राहता. जेंव्हा हसत नसला तेंव्हा पुन्हा लगेच हसावे लागणार म्हणून तुमचे तोंड उघडेच राहील अशी संवादाची पेरणी. एकूण काय तर विनोद सिनेमाचा माईल स्टोन.. मैलाचा दगड आणि त्यात आश्चर्य म्हणजे हिरो कोण तर मारधाडीचे माझ्या मनातील आयकॉन अक्षय आणि सुनील. पण आता ते तसे राहिले नव्हते, त्यांना पाहिलं की आता माझ्या मनात हास्याची लकेर उमठायची. वातावरण बदललं होत.
मला लोक ऍक्शन स्टार समजतात म्हणून मी कॉमेडी कारण कसं शक्य आहे असे अक्षय म्हणाला असता तर आता तो आपल्याला पडद्यावर कदाचित दिसला नसता. माझ्या चाहत्यांच्या मनातील माझ्या इमेजला धक्का लागू नये म्हणून तो सतत ऍक्शन मुव्ही करत राहिला असता कदाचित अक्षय काळाच्या गर्तेत केंव्हाच गायब झाला असता. पण त्याने एवढ्या वर्षेपासून निर्माण केलेल्या स्वतःच्या ऍक्शन हिरोच्या प्रतिमेला स्वतःच असा काही सुरुंग लावला की हा ऍक्शन हिरो की कॉमेडी हिरो हा प्रश्नच लोकांना पडू नये. प्रेक्षकांना तो दोन्ही ही रुपात आवडू लागला.
खऱ्या हिरोला माहीत असते, तो एक सामान्य माणूसच आहे. त्याने केलेलं सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नाविन्यपूर्ण कृतीच त्याला प्रेक्षकांच्या मनाचे सम्राटपद बहाल करीत असते. तो मोठ्या सामर्थ्याने त्या प्रतिमा घडवतोही आणि भविष्याचा अंदाज घेऊन त्या प्रतिमेला स्वतः सुरुंग लावायलाही घाबरत नाही. कारण त्याला एक गोष्ट माहीत असते, हे जर त्याने बनवलय, तर ते मोडून दुसरेही तोच बनवू शकतो. आणि हाच भाव त्याला हिरो बनावत असतो, सुपरहीरो बनवत असतो...!
तुमच्या आयुष्याचा एखादा सिनेमा आपटला की गलितगात्र होण्याची गरज नाही. तुमची हिरो प्रतिमा नष्ट होईल याची भीती पण बाळगण्याचे कारण नाही. दुसरी स्क्रिप्ट लिहायला हातात घ्या.
हो दुसरी स्क्रिप्ट...!
...............
सचिन दाभाडे