Wednesday, December 20, 2017

संग्रहालय की गॅरेज.

आपल्याकडून एखाद्याच्या कामात मोठ्या प्रमाणात त्यातील 'चूका' बघितल्या जातात की त्यातील 'योग्यता' बघितल्या जाते हे परिमाण आपले माईंड कुठल्या क्षमतेचे आहे याचे निदर्शन करते. दुसऱ्याच्या कामात किंवा वागणुकीत किंवा स्वभावात खूप चुका दिसायला लागल्या की तुमच्या साठी 'रेड अलर्ट' आहे हे नोट डाउन करून ठेवा. एखाद्याच्या WBT रचनेत (work, behaviour, treatment) फक्त चुका दिसणे याचा सरळ सरळ अर्थ असा की, आपल्या स्वतःच्या संरचनात्मक कामाकडे आपले दुर्लक्ष. संरचनात्मक मेंदूचे महत्तम लक्ष हे स्वतःच्या व दुसऱ्याच्या कामातुन काय चांगले निघू शकते हे शोधण्यातच गर्क असते. 

एखाद्या गोष्टीसाठी केलेली तक्रार जितकी जास्त तितकी कमी निकाल(result) तुम्हाला ती  देईल. आपण चुका काढतोय म्हणून आपले कोणी कौतुक करेल या भ्रमात जास्त दिवस राहू नका. कारण गाडीचे चाक जास्त आवाज करायला लागले तर एकतर ते दुरुस्त केल्या जाते अथवा बदलल्या जाते. तुमच्या क्षमतेचे चाक पळण्याऐवजी नुसतेच वाजायला लागले आहे, असे लक्षात आले की लगेच सकारात्मक विचारांची ग्रीसिंग आणि ऑइलिंग करा; अन्यथा भविष्य लवकरच गॅरेजमध्ये आहे.. 
म्हणून आयुष्याचा प्रवास संग्रहालयाच्या दिशेने करायचा की गॅरेजच्या याचा निर्णय लगेच घ्या.

सचिन दाभाडे

Tuesday, December 12, 2017

आपल्याला एवढा राग का येतो.




आपल्या मानाच्या, अपमानाचा, अभिमानाच्या समजुती मोठया महत्प्रयासाने आपण जपत जपत मरेपर्यंत वाहून नेत असतो. या सर्व समजुती आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्वपूर्ण भाग घडवत असतात. एवढेच नाही तर या समजुती (परसेप्शन) म्हणजे आपल्या भावविश्वचा आत्मा.

स्वतःबद्दलच्या बऱ्याच समजुती या वास्तवाच्या आधारावरच उभ्या असतील असे नव्हे, तर त्या स्वतःबद्दलच्या अभासातूनही आलेल्या असतात. पण हे सर्व आपल्या प्रत्येकासाठी वयक्तिक पातळीवर मात्र सत्यच असते आणि क्वचितच आपण त्याला आभास मानायला तयार असतो. अचानक एखादी छोटी घटना तुमच्या आभासी जगाला आव्हान देते आणि हा डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळतो. या अभिमानाच्या पडझडीत उडालेली सर्व धूळ म्हणजे राग... जे तकलादू होते ते सर्व पडलेले असते, पण यामध्ये आपले काय नुकसान झालेय किंवा कुठे तडे गेलेय, हे उडालेली धूळ समजू देत नाही. तुमचे विचार ,तुम्ही बांधत आलेल्या स्वतःबद्दलच्या सामर्थ्याच्या कल्पना मातीत मिसळल्या गेल्या आहेत किंवा वास्तवाच्या कसोटीवर घासण्यासाठी येऊन ठेपल्या आहेत, हे तुम्हाला समजायला आणखी बराच वेळ लागणार असतो. कारण तुमच्या इमारतीच्या एकूण उंचीच्या अर्ध्या उंचीपर्यंत अजूनही धूळ आपले अस्तित्व टिकवून असते आणि ती जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत झालेली पडझड पाहणे केवळ अश्यक्य.

यासर्व गोंधळात झालेली पडझड शोधण्याचा प्रयत्न केला तर  नाकातोंडात धूळ जाऊन आपली सर्व यंत्रणाच कोलमडू शकते; म्हणून उडालेली धूळ जमिनीवर येऊ द्या, जमिनीवर पडलेल्या भग्नावशेषातून काय शिकता येईल ते शिका आणि पुन्हा नव्या दमाने वास्तवाच्या जमिनीवर आकांक्षेचे महल बांधने सुरू करा....!


सचिन दाभाडे.