Monday, April 26, 2021

इकोपॉइंट..!

आपलं शरीर बाहेरून येणाऱ्या इच्छा, ध्वनी, यांनी कार्यान्वित होते, की ते आतूनच निर्माण होणाऱ्या स्वतंत्र इच्छा, भाव यांचे निर्मिती केंद्र आहे. पर्वताच्या कड्यावर उभे राहून मोठ्याने ओरडला तर तोच ध्वनी पुन्हा परत आपल्या कानावर आदळतो. हा काही नवीन निर्माण झालेला ध्वनी नसतो. आपलं शरीर ही असेच इको पॉईंट बनलेला आहे का ?. इको पॉंइंट सारखेच आपण नेहमी कुणाच्यातरी इच्छा ध्येय आणि भावना यांना रिस्पॉन्स करत असतो. आपले शरीर हे याबाबतीत स्वतंत्र क्रिया करण्याऐवजी बाहेरून येणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करत असते व त्यालाच स्वतंत्र क्रिया समजत असते. हा गैरसमज लवकर दूर व्हायला हवा. 

रशियन मानसशास्त्रज्ञ पावलाव्ह, या प्रतिक्रिया देण्याच्या माणसाच्या सवयीवर स्टीम्युलस (स्वतंत्र क्रिया) आणि रिस्पॉन्स (प्रतिक्रिया) ही पद्धत विकसित करतांना म्हणतो मनुष्याचे आयुष्य हे आपल्या शरीराबाहेर तयार झालेले घटनेला (स्टीम्युलस) ला प्रतिक्रिया (रिस्पॉन्स) देण्यामध्ये खर्च होत असते. हे स्टीम्युलस म्हणजेच बाहेरील वातावरणात घडणाऱ्या मुख्य घटना असतात, ज्यात नैसर्गिक, मानवीय दोन्ही प्रकारचा समावेश होतो. प्रत्येक व्यक्ती याला आपल्या कृवतीप्रमाणे रिस्पॉन्स देत असतो. मानवाच्या या कुवतीवर त्याने भाष्य केले, यावरून मानवी वागणुकीची रीत एका नवीन अर्थाने जगासमोर आली.

पण त्याही पुढे जाऊन व्हिक्टर फ्रांकेल याने या बाहेरील प्रभावाला न जुमानता व्यक्ती आपल्या आतमध्ये निर्माण होणारा स्वतंत्र असा रिस्पॉन्स- (स्वतंत्र भाव) निर्माण करू शकतो जो या बाहेरील प्रभावातून मुक्त आहे. या स्वतंत्र भाव निर्माण करण्याच्या मनुष्याच्या शक्तीला फ्रांकेल त्याच्या Man's search for meaning मध्ये 'इंडिपेंडंट विल' असे म्हणतो. बाहेरील घटना किंवा क्रियांना रिस्पॉन्स देत असतांना घटनेच्या प्रभावात न येता स्वतःची एक स्वतंत्र विल प्रत्येक व्यक्तीला निर्माण करता येऊ शकते, जी कुठलाही प्रभावातून मुक्त असते. या विल (will) नुसार केलेली कृती मनुष्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात नाविन्यपूर्ण आणि सकारात्मक रिझल्ट देऊ शकते.

तुमचा आजचा विचार किंवा भाव हा पेपर मधील बातम्यांचा प्रभाव, टीव्हीवरील घटना, बातम्या व विभत्स्य व्हिडीओ, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप युट्युबद्वारे बघितलेल्या स्टिम्युलेट करणाऱ्या घटना व मेसेजेस यातून निर्माण झालाय की तो या पेक्षा स्वतंत्र आहे, वेगळा आहे, तुमचा आहे, की तो विचार तुम्ही या सगळ्या बाहेरील स्टीम्युलसला प्रतिक्रिया देण्यातुन निर्माण झालाय हे बघता आले पाहिजे. 
एक प्रयोग करून बघा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले किती विचार, घटना व भाव हे बाहेरून आलेले आहेत किंवा त्याला प्रतिक्रिया म्हणून आलेले आहेत व किती स्वतः मध्ये तयार झालेले आहेत. एका रकान्यात बाहेरून आलेले आणि दुसऱ्या रकान्यात आतून निर्माण झालेले (इंडिपेंडंट), असे दोन भागात वर्गीकरण करून लिहा. कुठले जास्त भरताय याचे रोज अवलोकन करून बघा. ही कृती प्रामाणिकपणे केली तर बरीच दृष्टी मिळेल.

हीच इंडिपेंडंट विल म्हणजे 'स्वतंत्र इच्छाशक्ती'  सर्जनशीलतेची खरी आधारशीला आहे. ही तीच सर्जनशीलता जी जद्दु कृष्णमूर्तींनां अभिप्रेत आहे, जीला ते आपल्या शिक्षणविषयक सगळ्या विचारात प्रामुख्याने मांडतात. शासनाने मुलांना लहानपणापासूनच सर्जनशील आणि कृतीयुक्त बनवण्यासाठी त्यांच्या या पद्धतीचा प्राथमिक शिक्षणात समावेश केला परंतु तेवढ्याश्या प्रमाणात ती आपल्या शिक्षण पद्धतीत आणखी रूढ होने बाकी आहे.


...............

सचीन दाभाडे

No comments:

Post a Comment